Breaking News

म्हाडाला द्यायचे होते ९८ हजार चौ. फु. जागेचे बांधकामः पण मिळाले ४० हजार चौ.फुट चटई निर्देशांक घोटाळ्यात म्हाडाला १४५ कोटी रूपयांचा विकासकाकडून चुना

दादर येथील लोकमान्य नगर प्रियदर्शनी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकास प्रकल्पात राज्य सरकार आणि पर्यावरण खात्याने निर्धारीत केलेल्या सरप्लस अर्थात अतिरिक्त जागेसह चटई निर्देशांक क्षेत्रफळाचे जवळपास ९८ हजार चौ.फुटाचे बांधकाम देणे अपेक्षित असताना विकासकाने अवघ्या ४० हजार चौ.फुटाचे बांधकाम म्हाडाला हस्तांतरीत केल्याने आणि त्याकडे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने तब्बल १४५ कोटी रूपयांचा फटका म्हाडाला बसला आहे. त्यामुळे या १४५ कोटी रूपयांचा मलिदा कोणाच्या घशात गेला असा सवाल सोसायटीच्या सदस्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

वास्तविक पाहता प्रियदर्शनी सहकारी गृहनिर्माण संस्थेला उपकर प्राप्त इमारतीच्या पुनर्विकासास म्हाडा आणि राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागाने ३३ (७) खाली शीतल सागर बिल्डर्स अॅड डेव्हलपर्स विकासकाला १० हजार १८८ चौरस मीटर जागेच्या पुनर्विकासास परवानगी देताना पर्यावरण विभागाने ना हरकत प्रमाणपत्र देताना अतिरिक्त निर्माण होणाऱ्या ३ हजार ४७ चौरस मीटरच्या जागेवर ३ चटई निर्देशांक क्षेत्रफळाच्या वापरासह जवळपास ९८ हजार चौरस फुट जागेचे बांधकाम केलेली जागा म्हाडाच्या मुंबई इमारत व दुरूस्ती पुर्नरचना मंडळ अर्थात एमबीआरआरबी ला हस्तांतरण करणे बंधनकारक करण्यात आले होते अशी माहिती मराठी ई-बातम्या.कॉम संकेतस्थळाला उपलब्ध झालेल्या कागदपत्रावरून दिसून येत आहे.

मात्र या पुनर्विकास प्रकल्पाचे विकासक शीतलसागर बिल्डर्स यांनी प्रत्यक्षात अतिरिक्त ९८ हजार चौरस फुट जागेच्या सदनिका मुंबई इमारत व दुरूस्ती पुर्नरचना मंडळाला हस्तांतरीत करणे आवश्यक होते. तसेच या प्रकल्पातील २६४ सदनिकाधारकांना समान क्षेत्रफटाच्या सदनिका बांधणेही बंधनकारक कऱण्यात आले होते. या ९८ हजार चौरस फुट क्षेत्रफळाच्या सदनिका देणे आवश्यक असताना शीतल सागर विकासकाने फक्त ४० हजार १५२ चौरस फुटाच्या ८४ सदनिकाच हस्तांतरीत कऱण्यात आल्याचे उपलब्ध कागदपत्रानुसार दिसून येत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्ये गणेश जाधव यांनी सांगितले.

तसेच अतिरिक्त ५८ हजार चौरस फुटाच्या सदनिकांचे काय झाले असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे. जर या सदनिका मिळाल्या असत्या तर म्हाडाकडून मुंबईकरांसाठी परवडणाऱ्या दरातील सदनिका उपलब्ध झाल्या असत्या आणि त्यातून कमीत कमी २५ हजार चौरस फुट बांधकाम दराने १४५ कोटी रूपयांचे उत्पन्नही म्हाडाच्या तिजोरीत जमा झाले असते असा दावाही गणेश जाधव यांनी केला.

यासंदर्भात मुंबई इमारत व दुरूस्ती पुर्नरचना मंडळाचे मुख्याधिकारी अरूण डोंगरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे बंधू मयत झाल्याने रजेवर गेले असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही.

Check Also

उत्तर मध्य मुंबईतून भाजपाकडून अॅड उज्वल निकम यांना उमेदवारी

नुकतीच मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार तथा विद्यमान मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *