Breaking News

काँग्रेस सोबतचे जवळपास दोन पिढ्यांचे संबध मिलिंद देवरा यांनी तोडले एकनाथ शिंदे यांच्या गटात केला प्रवेश

एकेकाळी काँग्रेसच्या वैभवाच्या काळात स्व. मुरली देवरा आणि स्व.गुरुदास कामत यांनी स्वतःचे व्यक्तीमत्व उत्तुंग नेत पक्षाच्या वैभवातही भर घालण्याचा आणि मुंबईतील काँग्रेसच्या ताकदीत भर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे धाडस ना कधी मुरली देवरा यांनी केले ना कधी गुरुदास कामत यांनी त्यांच्या उभ्या ह्ययातीत केले नाही. मात्र मुंबईच्या राजकारणात विशेषतः दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू सोसयटींमध्ये राबता असूनही मुरली देवरा यांचे सुपुत्र असूनही मिलिंद देवरा यांना राजकिय वारसा चालविता आला नाही. त्यामुळे राहुल गांधी यांच्या खास गोटात असूनही मिलिंद देवरा यांना स्वतःचा करिष्मा दाखविता आला नसल्याची चर्चा काँग्रेसमध्ये सुरु झाल्याने अखेर मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा सकाळी राजीनामा देत दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश केला.

मिलिंद देवरा हे उच्च विद्याविभूषित आहेत. तसेच त्यांना राष्ट्रीय राजकारणासह राज्याच्या राजकारणाची चांगली जाण आहे. त्याचबरोबर मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा यांच्या दक्षिण मुंबईतील उच्चभ्रु सोसायटीत राहणाऱ्या आणि उद्योग वर्तुळातील अनेकांशी चांगले संबध होते. सोनिया गांधी यांच्यानंतर काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांचा राजकिय उदय झाल्यानंतर मिलिंद देवरा यांचा समावेश राहुल गांधी यांच्या यंग टीममध्ये करण्यात आला. मात्र दक्षिण मुंबईतून दोन वेळा लोकसभा निवडणूकीत पराभव स्विकारल्यानंतर मिलिंद देवरा हे सातत्याने भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली होती.

त्यातच मागील काही महिन्यापासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि नवे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाकडून पुन्हा एकदा भरारी घेण्यास सुरुवात केली. त्यातच भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले असा सवाल उपस्थित करत जनतेच्या प्रश्नावरून लक्ष्य करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सैरभैर झालेल्या भाजपाला प्रत्येकवेळी नवनव्या मुद्यांच्या शोध घ्यावा लागत आहे. तसेच काँग्रेसचे लोकसभेतील आणि राज्यसभेतील खासदार केंद्रातील सरकारला नीट काम करू देत नसल्याची जाहिर कबुलीही एका प्रचार सभेत मोदी यांना द्यावी लागली.

या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्या राजकिय नेतृत्वाला सक्षम पर्याय काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीकडून उभे करण्यात येत आहे. तसेच नरेंद्र मोदी आणि भाजपाला आगामी लोकसभा निवडणूकीत रोखण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे. त्यातच काँग्रेसनेगी इंडिया आघाडीची मोट बांधल्यानंतर सहकारी पक्षांसाठी परंपरागत काही मतदारसंघावर पाणी सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईची जागा ठाकरे गटाकडे जाणार असल्याचे स्पष्ट होताच या जागेवर आधीपासून दावा केलेल्या मिलिंद देवरा यांनी काँग्रेसकडून ठोस पर्याय मिळत नसल्याने अखेर काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश केला.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक उद्योजक आणि व्यापारी वर्ग राहतो. तसेच काही भागात सर्वसामान्य नागरिकही मोठ्या प्रमाणात राहतो. मागील काही वर्षात येथील उच्चभ्रू उद्योजक आणि व्यापारी वर्गाने भाजपाच्या मागे उभे राहण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे. तर विद्यमान खासदार अरविंद सावंत हे दुसऱ्यांदा निवडणूकीसाठी उभे ठाकरे गटाकडून उभे राहणार आहेत. त्यामुळे सध्याच्या राजकिय वातावरणात दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा यांना काँग्रेसकडून संधी मिळणे अवघड झाले आहे. यापार्श्वभूमीवर मिलिंद देवरा यांना आधी भाजपाकडे चाचपणी केली. मात्र ऐनवेळी भाजपाकडून ही जागा शिवसेनेच्या शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता गृहीत धरण्यात येत आहे. त्यामुळे भाजपामधील एका ज्येष्ठ नेत्याच्या सल्ल्यानुसार शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, ५५ वर्षाचे काँग्रेसबरोबरचे जुने नाते आज तोडत असून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश करत असल्याचे मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश करताना जाहिर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *