राज्यातील आगामी विधानसभा, लोकसभा निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आता येत्या काही दिवसांमध्ये कधीही पार पडू शकतात. त्यामुळे सर्वच जाती-धर्मियांना दुखवायचे नाही असे धोरण भाजपाप्रणित सरकारने स्विकारले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपाप्रणित राज्य सरकार स्थानापन्न झाल्यापासून आतापर्यंत हिंदू धर्मियांचे आणि मुस्लिम धर्मियांचे बहुतेक धार्मिक सण एकाच दिवशी आले. मात्र राज्य सरकारने या दोन्ही धर्मियांना एकाचे दिवशी सुट्टी केंद्राच्या निर्णयानुसार एकच सुट्टी देण्यापेक्षा दोन वेगवेगळ्या दिवशी सुट्टी जाहिर केली. त्यानंतर आता भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबर रोजी कामकाजाच्या दिवशी आल्याने राज्य सरकारने जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीत येणारी सुट्टी जाहीर केली आहे.
गतवर्षीपर्यंत ६ डिसेंबर या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी सुट्टी कधीच जाहिर केली नाही. मात्र यंदाच्या वर्षी राज्य सरकारने मात्र मुंबई आणि उपनगरात राहणाऱ्या आंबेंडकरी अनुयायांसाठी एका दिवसाची सुट्टी जाहिर केली आहे. राज्यातील इतर जिल्ह्यात मात्र अशा पध्दतीची सुट्टी जिल्हाधिकारी कार्यालयांकडून अद्याप जाहिर करण्यात आलेली नाही.
विशेष म्हणजे महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधत देशभरातून आंबेडकरी समाज आणि अनुयायी दादर येथीस चैत्यभूमी मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने मुंबईत येत असतो. तसेच या निमित्ताने मुंबईत निवासाची सोय असो किंवा ओळखीचे कोणी असो नसो असे सर्व आंबेडकरी अनुयायी लाखोंच्या संख्येने आवर्जून येतात. त्यामुळे यंदा ६ डिसेंबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधत विशेष रेल्वेगाड्याही मध्य रेल्वेकडून सोडण्यात आल्या आहेत.
या पार्श्भूमीवर मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालयांना बुधवार ०६ डिसेंबर २०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्थानिक सुटी (Local Holiday) जाहीर करण्यात आला आहे. याबाबतीतचे शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे.