Breaking News

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सरकार बदलले आता मुंबई ही बदलणार

मुंबई तसेच एकूणच महाराष्ट्रात पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून महाराष्ट्राला देशातले प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी आम्ही ठोस पाऊले उचलण्यास सुरूवात  केली आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण होतील यावर भर आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. इकॉनॉमिक टाईम्सच्या आर्किटेक्चर,कन्स्ट्रकशन, इंजिनिअरिंग या गोरेगाव येथील एसटेक प्रदर्शनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले , त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमास महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन, तसेच बांधकाम क्षेत्रातील मनीष गांधी, एसीटेक प्रदर्शनाचे संचालक सुमित गांधी, निरंजन हिरानंदानी, हफिज कॉंट्रॅक्टर, विकास ओबेरॉय, संदीप रुणवाल, आशीष रहेजा, हॅन्सग्रॉव्ह कंपनीचे ख्रिस्तोफी गोरलॅन, पाओलो रोमानी आदींची उपस्थिती होती.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रदर्शनातील काही दालनांना भेट दिली व पाहणी केली. या प्रदर्शनात एकंदर ५०० दालने आहेत अशी माहिती यावेळी आयोजकांनी दिली.

प्रकल्प वेळेत पूर्ण करणार

आम्ही अनेक मोठ्या प्रकल्पांवर काम करत आहोत. सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. केवळ तीन महिन्यांत आम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आम्ही आमच्या कामासाठी पूर्णपणे समर्पित आहोत. महाराष्ट्राला भारतातील सर्वात विकसित राज्य म्हणून बघायचे आहे. त्यासाठी तुमची साथ हवी आहे असे मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले.

आधुनिक भारताचे रचनाकार

आशियातील हे सर्वात भव्य प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो, हे केवळ प्रदर्शन नसून नवीन भारताचे चित्र इथे साकारले जाईल, असा मला विश्वास आहे. बिल्डर्स, इंजिनीअर्स, आर्किटेक्ट्स हे आधुनिक भारताचे आर्किटेक्ट, निर्माते आहेत. आधुनिक भारताचे विकासक आहेत. असे मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्र हे मॅग्नेट

या प्रदर्शनात ग्लोबल ब्रँड्सचाही समावेश आहे. आजही मुंबई आणि महाराष्ट्र या ब्रँडसाठी एकप्रकारे मॅग्नेट आहेत, कारण आज महाराष्ट्रात मोठ्या पायाभूत सुविधांचे काम सुरू होत आहे. हे ब्रँड केवळ व्यवसायासाठी येत नाहीत. त्यांच्या जागतिक दर्जाच्या कामांची खरी दाद इथेच मिळते. राज्य सरकारच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, रिअल इस्टेट क्षेत्र शेतीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतो. त्यामुळेच या क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारने अनेक सुविधा दिल्या आहेत. आमची पंचसूत्री महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याची आहे.

केंद्राच्या मार्गदर्शनामुळे वेगाने प्रगती

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती दिली आहे की, महाराष्ट्रात २ लाख कोटीचे २२५ हून अधिक प्रकल्प मंजूर झाले आहेत. प्रधानमंत्री मोदी यांनी मला आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना केंद्राचा पूर्ण पाठिंबा असेल असे सांगितले आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना नंतर प्रथमच महाराष्ट्र सर्व साखळ्या तोडून विजेच्या वेगाने धावत आहे. लोकं उत्साहात आहेत. उत्सव देखील साजरे झाले आहेत. एकूणच अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे.

नरीमन पॉइंट ते रायगड वीस मिनिटांत

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबईत सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधांच्या कामांची माहिती दिली. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे काम देखील ८४% पूर्ण झाले असून नरीमन पॉईंटहून वीस मिनिटांत रायगड जिल्ह्यात पोहचू शकणार आहोत. रायगड जिल्ह्यातही ग्रोथ सेंटर बांधण्यात येणार आहे. लॉजिस्टिक पार्क, टाऊनशिप आणि रोजगार निर्मिती या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जात आहे आपले सरकार येऊन चार महिने झाले आहेत. आम्ही इन्फ्राला प्रोत्साहन देण्यासाठी बरेच काही करीत आहोत असे ते म्हणाले.

एमएमआरडीएचे एक लाख कोटींपेक्षा जास्त प्रकल्प

एमएमआरडीएचे एक लाख कोटींपेक्षा जास्त प्रकल्प पाइपलाइनमध्ये आहेत. आज दरवर्षी २५ हजार कोटींची कामे होतील, अशी योजना तयार करण्यात आली आहे. पुढील २० वर्षांसाठी एमएमआर प्रादेशिक योजना आणि एमएमआर वाहतूक योजना तयार केली आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य सरकारने एमएमआरडीए ला ६० हजार कोटींचे कर्ज घेण्यास मान्यता दिली आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग या गेम चेंजर प्रकल्पाचा पहिला टप्पा आम्ही लवकरच सुरू करणार आहोत, हा महामार्ग दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, वेस्टर्न डेडिकेटेड कॉरिडॉर, जेएनपीटीशी जोडला जाईल असेही ते म्हणाले.

सरकार बदलले , आता मुंबई ही बदलणार

सरकार बदलले आहे, आता मुंबईचे रूपही बदलणार असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पुढील दोन अडीच वर्षात मुंबईतील रस्ते पूर्णपणे कॉँक्रीटचे करण्यात येतील. रस्ते पूर्णपणे खड्डेमुक्त असतील आणि रस्त्यांमध्ये पाणी तुंबणार नाही असे सांगितले.

आयकॉनिक इमारती उभारण्यात आल्या पाहिजेत असे सांगून मुख्यमंत्र्यांनी मुंबईचा इतिहास आणि वैभव देखील जपण्यात येईल असे सांगितले

५००० किमीचे एक्सेस कंट्रोल रस्ते

राज्यात ५००० किमीचे एक्सेस कंट्रोल रस्ते तयार करण्यात येणार आहेत असे सांगून मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई- गोवा ग्रीनफील्ड महामार्गाच्या कामाचा डीपीआर तयार झाला आहे तसेच क्लस्टर विकासाला गती देण्यात येत आहे, मुंबई झोपडीमुक्त करणार असल्याचे सांगितले.

प्रीमियम, मुद्रांक कर, युनिफाईड विकास नियंत्रण नियमावली या माध्यमातून विकासकांना प्रोत्साहन देण्यात येत आहे असेही ते म्हणाले.

प्रारंभी महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन यांनी देखील आपल्या भाषणात येत्या दोन वर्षात मुंबईत कुठूनही कुठे केवळ एक तासाच्या आत नेणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असे सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नरसी कलारिया यांचा मेक इन इंडिया आणि कौशल्य विकासातील कार्यासाठी सत्कार करण्यात आला. सुमित गांधी आणि मनीष गांधी यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना मानचिन्ह, शाल व श्रीफळ देण्यात आले.

Check Also

घाटकोपर येथे झालेल्या दुर्घटनेतील जखमींना अडीच लाखापर्यंतचे आर्थिक सहकार्य

वादळी पाऊस आणि वाऱ्यामुळे घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेतील जखमी व्यक्तींच्या कुटुंबियांनात पालकमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *