Breaking News

सीडीपीक्यू, बॉम्बार्डिअर राज्यात गुंतवणूक करणार महाराष्ट्र-क्युबेकमध्ये आर्थिक सहकार्याच्या करारावर स्वाक्षऱ्या

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र आणि कॅनडाच्या क्युबेक प्रांतातील आर्थिक सहकार्य अधिक दृढ होणार असून माहिती-तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, एरोनॉटिक्स, ऊर्जा, आर्टिफिशियल इंटिलिजन्स आणि आदिवासी कल्याण आदी क्षेत्रातील व्यापक सहकार्याबाबतच्या महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्यूबेकचे पंतप्रधान फिलिप क्युलार्ड यांनी आज स्वाक्षरी केली. यासोबतच निधी व्यवस्थापनातील सीडीपीक्यू या संस्थेसह बॉम्बार्डिअर या उद्योगाने महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे.

मुख्‍यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे शिष्टमंडळ सध्या कॅनडाच्या दौऱ्यावर आहे. आज मॉन्ट्रिएल येथे मुख्यमंत्र्यांनी क्युबेकचे पंतप्रधान फिलीप क्युलार्ड यांची भेट घेतली. या भेटीत विविध महत्त्वाच्या विषयांवर विस्तृत चर्चा झाली. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तरूणांची संख्या असून पुढच्या काळात त्यांना अधिकाधिक रोजगारसंधी उपलब्ध करून देण्यासाठी बंदर क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटिलिजन्स तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्र आणि क्युबेक प्रांत यांच्यात आर्टिफिशियल इंटिलिजन्स तंत्रज्ञानाच्या व्यापक प्रमाणावरील आदानप्रदानासंदर्भात अतिशय सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेनंतर उभय प्रांतातील आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी क्युबेकच्या आंतरराष्ट्रीय व्यवहार मंत्री क्रिस्टिन सेंट पेरी यांची प्रमुख उपस्थिती होती. कालच क्युबेकच्या उपपंतप्रधान श्रीमती डॉमनिक अँग्लेड यांच्याशीही मुख्यमंत्र्यांची अतिशय उपयुक्त चर्चा झाली होती.

सीडीपीक्यूचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मायकेल साबिया यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. सीडीपीक्यू ही संस्थात्मक निधी व्यवस्थापन कंपनी असून सुमारे २९८ अब्ज डॉलर्सच्या निधीचे ती व्यवस्थापन करते. कॅनडातून अधिकाधिक पेन्शन फंड गुंतवणूक भारतात यावीहा या भेटीमागचा हेतू होता. भारतातील काही संस्थांशी भागिदारी करण्याबरोबरच रिटेल व्यावसायिकांसोबत काम करण्याचा सीडीपीक्यूचा मानस आहे. महाराष्ट्र समृद्धी महामार्गलॉजिस्टिक पार्क इत्यादी क्षेत्रात असलेल्या गुंतवणुकीच्या अमाप संधींची मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती दिली.

राज्याच्या शिष्टमंडळाने सायंकाळी परिवहन क्षेत्रात जागतिक पातळीवरील आघाडीच्या विमान आणि रेल्वे उत्पादक कंपनी असलेल्या बॉम्बार्डिअरच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष आणि कंपनीप्रमुख पिअरी ब्युदाँ यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत महाराष्ट्रातील मेट्रोसह परिवहन विषयक पायाभूत सुविधा क्षेत्रात सहकार्य करण्याची तयारी या कंपनीकडून दाखविण्यात आली. राज्यातील परिवहन क्षेत्राला नवा आयाम देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकणाऱ्या या समुहाच्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी ब्युदाँ यांचे आभार मानले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी आदी उपस्थित होते. 

Check Also

एचडीएफसी म्युच्युअल फंडाबाबत मोठी घोषणा २६ एप्रिलपासून मॅन्युफॅक्चरींग फंड बाजारात

एचडीएफसी HDFC म्युच्युअल फंडाने २२ एप्रिल रोजी HDFC मॅन्युफॅक्चरिंग फंड लॉन्च करण्याची घोषणा केली. ओपन-एंडेड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *