Breaking News

एस टी महामंडळाच्या एलएनजी इंधन रूपांतरण वाहन प्रकल्प

देशातील पहिल्या एलएनजी (लिक्व‍िफाइड नॅचरल गॅस) इंधनावर रूपांतरीत करण्यात येणाऱ्या एस.टी महामंडळाच्या वाहन प्रकल्पाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी करण्यात आले.

कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, महाव्यवस्थापक नंदकुमार कोलारकर, वैभव वाकोडे, मे. किंग्ज गॅस प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मोहम्मद आझम कुरेशी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी एलएनजी रूपांतरणामुळे एसटी बसमधील बदल, डिझेलच्या तुलनेत होणारे लाभ याविषयी माहिती घेतली आणि बसचे निरीक्षण केले.

एसटी महामंडळातील ५००० डिझेल वाहनांचे एलएनजी (लिक्व‍िफाइड नॅचरल गॅस) या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांमध्ये रुपांतरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे आज उद्घाटन करण्यात आले.

महामंडळाकडे डिझेलवर चालणारे सुमारे १६००० प्रवासी वाहने आहेत. महामंडळाच्या एकूण खर्चापैकी सुमारे ३४ टक्के खर्च हा इंधनावर म्हणजेच डिझेलवर केला जातो. डिझेलच्या दरात होणारी वाढ लक्षात घेता व हरित परिवहनाची संकल्पना राबविण्यासाठी डिझेल ऐवजी पर्यायी इंधन वापरणे ही काळाची गरज आहे. यामुळे टप्प्याटप्प्याने पूर्ण एस.टी महामंडळातील वाहने एलएनजी इंधनावर आधारित करण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या उद्योग विभागाने राज्यास एलएनजी या पर्यायी इंधनाचा पुरवठा करण्यासाठी मे. किंग्स् गॅस प्रा. लि. यांच्याबरोबर सामंजस्य करार (MOU) केलेला असून त्यामध्ये परिवहनसाठी सुध्दा एलएनजीचा वापर व पुरवठा याचा समावेश करण्यात आला आहे. डिझेल इंधनाच्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदुषणामध्ये एलएनजीमुळे सुमारे १० टक्के घट होणार आहे. निश्चितच महामंडळाचा इंधनावरील खर्च कमी होणार आहे. महामंडळाच्या सुमारे ९० आगारात एलएनजी वितरण केंद्रही उभारण्यात येणार आहे.

Check Also

रमेश चेन्नीथला यांची खोचक टीका, मोदी ४०० पारच्या घोषणा देत फिरत होते, पण २००…

पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे प्रचारक बनून ४०० पारच्या घोषणा देत देशभर फिरत होते. पण मुळात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *