Breaking News

मणिपूरप्रश्नी अमित शाहंचे बोलणे इंडियाने केले अमान्य, पंतप्रधान मोदीनींच बोलावं अखेर लोकसभेबाहेर विरोधक आणि सत्ताधारी भाजपाच्या खासदारांची परस्पर विरोधी निदर्शने

७० दिवसाहून अधिक काळ झाला एकाबाजूला मणिपूर राज्यात सुरु झालेल्या हिंसाचारामुळे ईशान्य भारतातील एकसंधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या हिंसाचाराच्या काळात आपले चार ते पाच देशांचे परदेश दौरेही करून आले. मात्र सविस्तर निवेदन केले नाही. अखेर काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी संसदेत मणिपूर प्रश्नी चर्चेची मागणी केली. त्यानुसार आज सकाळी लोकसभा अध्यक्ष ओमबिर्ला यांनी अमित शाह यांनी बोलावे अशी सूचना केली. परंतु विरोधकांच्या आघाडीने अर्थात इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच बोलावं अशी मागणी करत ठाम राहिले.

परंतु विरोधकांनी आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच चर्चेला उत्तर द्यावे अशी मागणी करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत चर्चेस नकार दिला. यावेळी सभागृहात असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र मौन बाळगल्याचे दिसून आले.

गेल्या ८० दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर प्रकरणावर केवळ एकदाच बोलले आहेत. गेल्या आठवड्यात संसदेबाहेर येऊन त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयावर लोकसभेत बोलावं, अशी मागणी विरोधकांनी केली असता आज लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गृहमंत्री अमित शाह यांना याविषयी बोलण्याची विनंती केली.

ओम बिर्ला म्हणाले, विरोधी पक्ष गेल्या दोन-तीन दिवसांपासून मणिपूरविषयी चर्चेची मागणी करत आहेत. आज गृहमंत्री येथे उपस्थित आहेत. त्यामुळे मी गृहमंत्र्यांना विनंती करतो की, त्यांनी या विषयावर बोलावं.
अमित शाह म्हणाले, विरोधी पक्षातील सर्व सदस्यांनी आग्रह केला आहे की, मणिपूरसारख्या एका संवेदनशील मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी. सदनातील सदस्यांनी, मग ते सत्ताधारी पक्षातील असतील अथवा विरोधी पक्षांमधील, अनेक खासदारांनी याविषयी चर्चेची मागणी केली आहे. मी सदनात या विषयावर चर्चा करण्यासाठी तयार आहे. परंतु, मला कळत नाही की, विरोधी पक्ष यावर चर्चा का करू देत नाहीत. विरोधी पक्षांच्या सर्व नेत्यांना माझी विनंती आहे की, त्यांनी या विषयावर चर्चा होऊ द्यावी. या संवेदनशील विषयाचं संपूर्ण सत्य देशासमोर आलं पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे.

लोकसभेत यावेळी विरोधी पक्ष मागणी करत होते की, मणिपूरप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावं. यावेळी विरोधी बाकावरील खासदारांनी गोंधळ घातला.

तर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, आम्ही सुद्धा चर्चेसाठी तयार आहोत. परंतु यावर पंतप्रधानांनी त्यांचं म्हणणं मांडावं. जर १४० कोटी जनतेचा नेता बाहेर पत्रकारांशी बोलत असेल आणि १४० कोटी जनतेचे प्रतिनिधी सदनात बसलेले असतील तर तुम्ही इथंही तुमचं मत मांडावं असे आव्हानही नरेंद्र मोदींना दिले.

Check Also

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रासाठी मागितल्या या गोष्टी, पण पंतप्रधान मोदींकडून साधा उल्लेखही नाही

स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस विसर्जित करावी असा सल्ला महात्मा गांधींनी दिला होता. त्यानुसार काँग्रेस विसर्जित झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *