Breaking News

देवेंद्र फडणवीस अखेर म्हणाले, अब्दुल सत्तार बोलले त्याचे समर्थन…

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना ऑन कॅमेरा शिवी दिली. त्यानंतरही सत्तार यांनी सुळे यांच्याबाबत बोलताना मर्यादा सोडली. सत्तार यांच्या या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटले. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत सत्तार यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी करणारे निवेदन दिले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, भाजपाने आता स्पष्ट करावे की, ते अजून कोणाकोणाची ओझी उलचणार आहेत. सत्तार यांचे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांना पटलं असेल तर ते सत्तारांना बडतर्फ करणार नाहीत. नसेल पटलं तर ते त्यांना बडतर्फ करतील असा खोचक टोला लगावला.

तसेच ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह अनेत मविआतील नेत्यांनी या सगळ्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांच्या मौनावर आक्षेप घेतला होता. त्यावर आता देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. चेंबूरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कुणीही महिलांबद्दल अपशब्द काढू नयेत. ते अतिशय चुकीचं आहे. आम्ही त्याचा विरोधच करू. पण जसं आमच्याकडच्यांना ते लागू आहे, तसंच ते त्यांच्याकडच्यांनाही लागू आहे. पण मला आज त्याच्यात जायचं नाहीये. मला वाटतं की राजकारणात आचारसंहिता पाळली गेली पाहिजे. अब्दुल सत्तार जे बोलले, त्याचं कोणतंही समर्थन मी करणार नाही. ते चूकच आहे. पण त्याचवेळी खोके आणि काय काय उलटसुलट बोलणं हेही चुकीचं आहे. हेही समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी आचारसंहिता पाळणं गरजेचं आहे. पातळी खाली चालली आहे. राजकारणाची ही पातळी महाराष्ट्रात असू नये अशी अपेक्षा व्यक्त केली.

जोपर्यंत मोठे नेते आपापल्या लोकांना हे सांगत नाहीत, तोपर्यंत हे शक्य होणार नाही. नाहीतर नेत्यांनी वेगळं बोलायचं आणि नंतर त्यांच्या लोकांनी बोलल्यावर त्याचं समर्थन करायचं असं करणं योग्य होणार नाही. त्यामुळे सगळीकडच्या नेत्यांनी आचारसंहिता पाळली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान, ‘हर हर महादेव’ या चित्रपटाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोध करण्यात येत असून माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील एका चित्रपटगृहात जात तेथील प्रेक्षकांना मारहाण करत चित्रपटाचा शो बंद पाडला. त्याचबरोबर संभाजी ब्रिगेडकडून आक्षेप घेण्यात येत आहे. यावर बोलताना फडणवीसांनी सांगितले की, कुणालाही विरोध करायचा असेल, तर लोकशाही मार्गाने विरोध करावा. त्यासाठी त्यांना पूर्ण परवानगी आहे. मी चित्रपट पाहिलेला नाही. काय वाद आहे, हे मला माहिती नाही. कुणाला काही आक्षेप असतील, तर ते सनदशीर मार्गाने मांडावेत. सिनेमागृहात शिरून तिथल्या लोकांना मारहाण करणं, दादागिरी करणं हे सहन केलं जाणार नाही असा इशाराही दिला.

Check Also

मेहबूबा मुफ्ती यांचे निवडणूक आयोगाला पत्रः कार्यकर्त्यांना अटक करण्याचे थांबवा

जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *