Breaking News

देवेंद्र फडणवीस यांचा उध्दव ठाकरेंना टोला, आता मुख्यमंत्री घरी बसणार नाही… सर्व सण जोरात होणार असल्याचे केले जाहीर

राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत या बंडास भाजपाच जबाबदार असल्याचा आरोप केला. मात्र बंडखोर एकनाथ शिंदे हे जसजसे उध्दव ठाकरे यांना इशारा वजा विनंती करत गेले तसतसे उध्दव ठाकरे हे शांत झाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र दुसऱ्याबाजूला सेना नेते आदित्य ठाकरे यांनी मात्र बंडखोरांवरील टीका मात्र सुरुच ठेवली आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र जेव्हा संधी मिळेल त्यावेळी उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसून येतात.

महाराष्ट्र भाजपाचे नवनिर्वाचित अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची निवड करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर आज भाजपाने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात भाषण करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता निशाणा साधताना म्हणाले, आपण सर्वांनी कालची मुंबई पाहिली का? तोच उत्साह, तोच जल्लोष, तीच संस्कृती दिसून आली. पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर काय घडतं, हे आपण सगळ्यांनी बघितलं. काल दहिहंडी जोरात होती. आता गणपती, नवरात्र असे सर्व उत्सव जोरात करायचे आहेत. आता मुख्यमंत्रीही घरी बसणार नाहीत आणि तुम्हालाही घरी बसू देणार नाहीत.

या वक्तव्यामागे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे सुरुवातीला मातोश्री आणि नंतर वर्षा बंगल्याच्या बाहेर पडत नसल्यावरून हा निशाणा साधला गेला. तसेच त्या काळातही मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याची टीका भाजपाकडून सातत्याने करण्यात येत होती.

यावेळी बोलताना फडणवीस पुढे म्हणाले की, येत्या काळात मुंबई महानगर पालिकेवर भाजपा-शिवसेना युतीचाच झेंडा असेल. मागील काळात आशिष शेलार मुंबईचे अध्यक्ष असताना आपण पालिकेत मोठी मजल मारली. तेव्हाही आपण महापौर बनवून शकलो असतो. आपली पूर्ण तयारी झाली होती. पण आपल्या मित्रपक्षासाठी आपण दोन पाऊल मागे आलो. पण आता मुंबई महापालिकेवर शिवसेना-भाजपा युतीचाच महापौर बसेल अशी ग्वाहीही दिली.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी आणि शिंदेंच्या नेतृत्वाखालची खरी शिवसेना आणि भाजपा मिळून या निवडणुकीत आपला भगवा महापालिकेवर लावल्याशिवाय राहणार नाही असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी आशिष शेलार यांच्याकडे असणाऱ्या विविध प्रकारच्या क्रीडा संघटनांच्या पदभारावरूनदेखील देवेंद्र फडणवीसांनी टोलेबाजी केली. आशिषजी, तुम्ही क्रिकेट खेळणारेही आहात आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षही राहिला आहात. त्यामुळे ट्वेंटी-ट्वेंटी कशी खेळायची आणि जिंकायची हे तुम्हाला माहिती आहे. हा सामना तर तुम्ही जिंकणारच आहात. पण महापालिकेत मुंबई विकास लीग आपल्याला सुरू करायची आहे. मध्ये मध्ये अडचणी येतात. तुम्ही फुटबॉलची अनेक मैदानं तयार केली आहेत. त्यामुळे मध्ये एखादा फुटबॉल आला, तर त्याला किक कशी मारायची, हे तुम्हाला माहिती आहे असे कौतुगोद्गारही त्यांनी काढले.

अनेक उड्या मारणारे लोक आहेत. पण तुम्ही दोरी असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहात. त्यामुळे कुणाला किती उडू द्यायचं आणि कुठे दोरी खेचायची, याचीही कल्पना तुम्हाला आहे. त्यामुळे आता मला विश्वास आहे की गेल्या वेळी तुम्ही दोन स्ट्राईकरेट दाखवला, तो दुपटीहून अधिक होता. आपण थेट ३५ वरून ८२ वर होतो. आता गेल्यावेळचा रेकॉर्ड आपण मोडला पाहिजे असेही ते म्हणाले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *