Breaking News

नाना पटोले म्हणाले, “मोदीजी, शिवजयंतीदिनी क्षमा मागा आणि प्रायश्चित करा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना काँग्रेस हजारो पत्र पाठवणार

मराठी ई-बातम्या टीम

महाराष्ट्राने कोरोना पसरवला असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत करुन महाराष्ट्राची बदनामी केली. हा महाराष्ट्राचा घोर अपमान आहे, या अपमानाबद्दल पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राची माफी मागावी या मागणीसाठी काँग्रेस आपल्या आंदोलनाचा पुढील टप्पा सुरू करणार आहे. त्या आंदोलनाचा भाग म्हणून शिवजयंतीदिनी मोदींना महाराष्ट्राची माफी मागायला सांगून आपल्या पापाचे प्रायश्चित करावे, अशा आशयाची हजारो पत्र काँग्रेस कार्यकर्त्यांतर्फे देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत मोदींना पाठवणार असल्याची माहिती महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

गांधी भवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना पटोले म्हणाले की, कोरोना काळात केंद्रातील भाजपा सरकारने अचानक लॉकडाऊन लावला. या कठीण प्रसंगी राज्यातील लोकांना केंद्र सरकारने मदत केली नाही, पण काँग्रेस पक्षाने व महाराष्ट्र सरकारने लाखो लोकांना मदत केली. अडचणीच्या काळात मदत करणे ही काँग्रेसची परंपरा आहे. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून हजारो लोकांना आम्ही मदत केली असताना कोरोना पसरवला, असा आरोप पंतप्रधानांनी करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा व महाराष्ट्राचा अपमान केला आहे. याप्रकरणी पंतप्रधान मोदींनी माफी मागावी या मागणीसाठी महाराष्ट्र काँग्रेसने भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांच्या आणि खासदारांच्या घरासमोर आंदोलन सुरु केले आहे. याच आंदोलनाचा पुढील भाग म्हणून आता पंतप्रधानांनी शिवजयंतीच्या निमित्ताने माफी मागावी या मागणीची पत्र पाठवली जाणार आहेत.

या पत्रात असे म्हटले आहे की, “छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र दिल्लीचे तख्त आणि अहंकारी इंग्रजांसमोर झुकला नाही याचा इतिहास साक्षी आहे. तुमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगा की शेतकऱ्यांचा अपमान केल्याबद्दल देशाची माफी मागावी लागली, तशी महाराष्ट्राच्या अपमानाबद्दल माफी मागणे चांगले राहिल. दिल्लीच्या सत्तेसमोर गुडघे टेकून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी खेळू नका, महाराष्ट्राची जनता कधीही माफ करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त क्षमा मागून तुमच्या पापाचे प्रायश्चित करा.”

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थानासमोर आंदोलन करत असताना प्रदेश सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांना पोलिसांनी दिलेली वागणूक अत्यंत अपमानास्पद आहे. ज्या पोलिस अधिकाऱ्याने लोंढे यांचे तोंड दाबले होते, त्यावर कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे ते म्हणाले.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या चार टप्प्यात ६६.९५ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात एकूण मतदान ६६.९५% इतके नोंदवले गेले आहे, निवडणूक आयोगाने गुरुवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *