Breaking News

शेतकऱ्यांच्या आत्महत्या लपवून अपघात दाखविणाऱ्यांवर ३०२ चे गुन्हे दाखल करा आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबियांना १ लाखाची मदत देत मुलांच्या शिक्षणाची विखे-पाटील यांनी घेतली जबाबदारी

यवतमाळ : प्रतिनिधी

कर्जमाफी व बोंडअळीची मदत न मिळाल्यामुळे स्वतःची चिता रचून आयुष्य संपवणारे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी माधवराव रावते यांच्या आत्महत्येचे पुरावे दडवून तो एक अपघात सिद्ध करण्याचा खटाटोप भाजप-शिवसेनेचे सरकार करते आहे. खून करून पुरावे दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या इंद्राणी मुखर्जी, अभय कुरूंदकर, युवराज कामटे आणि आत्महत्येचे पुरावे दडपणाऱ्या या सरकारमध्ये काहीही फरक नाही. मुखर्जी, कुरूंदकर, कामटे आणि हे सरकार एकाच माळेचे मणी आहेत, अशी घणाघाती टीका  विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी करत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेत असल्याचे त्यांननी जाहीर केले.

यवतमाळ जिल्ह्यातील सावळेश्वरचे शेतकरी माधवराव रावते, राजूरवाडीचे शंकर चायरे आणि टिटवीचे प्रकाश मानगावकर यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटीत त्यांनी या आत्महत्यांच्या घटना आणि सरकारकडून त्यांच्यावर होत असलेल्या दडपशाहीची माहिती घेतली. त्यानंतर यवतमाळ येथे पत्रकार परिषदेत बोलताना विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर आसूडच ओढला.

ते म्हणाले की, या सरकारने सावळेश्वर येथील शेतकरी माधवराव रावते यांची आत्महत्या दडपण्यासाठी क्रौर्याची परिसीमा गाठली आहे. शासनाच्या निष्क्रियतेमुळे ही आत्महत्या असल्याची कबुली दिली जात नाही. उलटपक्षी आत्महत्येचे पुरावे दडपण्याचे प्रयत्न केले जात आहेत. कर्जमाफी व बोंडअळीची मदत न मिळाल्याने झालेल्या शेतकरी आत्महत्या एकप्रकारे सरकारने केलेल्या हत्याच आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात असे असंवेदनशील आणि कोडगे सरकार कधीही झाले नव्हते. या सरकारला शेतकऱ्यांच्या जीवाची अजिबात किंमत राहिलेली नाही.

माधवराव रावतेंच्या आत्महत्या प्रकरणी सकृतदर्शनी दिसणारी वस्तुस्थिती आणि तलाठी-तहसिलदारांचा अहवाल नाकारून सरकार हा अपघातच असल्याचे सांगते आहे. त्यासाठी या आत्महत्येचे पुरावेही दडपले जात आहेत. खून पाडून पुरावे दडपण्यासाठी जी कारवाई अभय कुरुंदकर, युवराज कामटे, इंद्राणी मुखर्जीवर झाली, ती कारवाई रावते आत्महत्या प्रकरणात करावी. सरकार व उमरखेडच्या विभागीय अधिकाऱ्याविरूद्ध ३०२ आणि पुरावे दडपण्याचे गुन्हे दाखल करावे, अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केली.

नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दाभडीला येथे ‘चाय पे चर्चा’ करताना केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना ‘ना भूतो, ना भविष्यती’अशी मदत करण्याची घोषणा केली होती. मागील ४ वर्षांपासून केंद्रात भाजपचे सरकार आहे. साडेतीन वर्षांपासून राज्यात भाजपचे सरकार आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. तरीही ज्या दाभडीत मोदींनी शेतकऱ्यांना शब्द दिला होता, त्या दाभडीपासून १०४ किलोमीटर अंतरावर झालेली सावळेश्वरच्या माधवराव रावतेंची आत्महत्या,५३ किलोमीटरवरील टिटवी येथील प्रकाश मानगावकर यांची आत्महत्या आणि ४९ किलोमीटरवरील राजूरवाडीतील शंकर चायरे यांची आत्महत्या, या तीनही आत्महत्यांसह इतरही असंख्य शेतकरी आत्महत्या या पंतप्रधानांना आपला शब्द न पाळता आल्यामुळे झालेल्या आत्महत्या आहेत, असे टीकास्त्र विखे पाटील यांनी सोडले.

भाजप-शिवसेना सरकारची यवतमाळ जिल्ह्याशी वैयक्तिक ‘दुश्मनी’ आहे का? असा बोचरा प्रश्न त्यांनी यावेळी केला. यवतमाळमधील एकूण ७ पैकी ५ जागांवर भारतीय जनता पक्षाचे आमदार असताना या जिल्ह्यावर भाजप सरकारने सातत्याने फक्त अन्यायच केला आहे. किटकनाशकांच्या फवारणीत यवतमाळ जिल्ह्यातील २४ शेतकरी-शेतमजुरांचा मृत्यू झाला. पण सरकारने गुन्हे दाखल करण्यापलिकडे काहीही कारवाई केली नसल्याचा आरोप करत यवतमाळ जिल्ह्यातील भीषण परिस्थितीचे वास्तव विधानसभेत मांडून या मुद्यावर सरकारला घाम फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी सरतेशेवटी दिला.

विखे पाटील यांची संवेदनशीलता !

या दौऱ्यामध्ये विखे पाटील यांनी केवळ सरकरावर टीका केली नाही तर संवेदनशीलतेची प्रचितीही करुन दिली. सावळेश्वर येथे दिवंगत शेतकरी माधवराव रावते यांचा मुलगा गंगाधर यांना काँग्रेस पक्षाच्यावतीने एक लाख रुपयांचा धनादेश सोपवला. त्याचप्रमाणे राजूरवाडी येथे दिवंगत शेतकरी शंकर चायरे व प्रकाश मानगावकर यांच्या कुटुंबाशी चर्चा करताना या दोन्ही दिवंगत शेतकऱ्यांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांची, पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे विरोधी पक्ष नेत्यांच्या निदर्शनास आले, त्यावेळी या दोन्ही शेतकऱ्यांच्या पत्नींना विखे पाटील यांनी भक्कम दिलासा देत या मुलांची शैक्षणिक जबाबदारी घेण्याचे जाहीर केले. संबंधित कुटुंबांची परवानगी असेल तर या दोन्ही कुटुंबातील विद्यार्थांची पदवीपर्यंतची शैक्षणिक जबाबदारी उचलण्याची घोषणा त्यांनी केली.

Check Also

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन वयाच्या ७२ व्या वर्षी कर्करोगामुळे घेतला शेवटचा श्वास

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांचे सोमवारी वयाच्या ७२ व्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *