Breaking News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घरचा आहेर देशातील समुद्र नसलेल्या राज्यात रिफायनरी प्रकल्प मग विदर्भात का नाही ? भाजप आमदार देशमुख यांचा सवाल

नागपूर : प्रतिनिधी

समुद्र जर विदर्भात स्थलांतरीत करता आला असता तर नाणार येथील रिफायनरी प्रकल्पही विदर्भात स्थलांतरीत केला असता असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. तोच त्यांच्याच पक्षाचे आणि नागपूरचे जिल्ह्यातील कटोलचे आमदार डॉ.आशिष देशमुख यांनी हरियाणा, पंजाब, दिल्ली, मध्यप्रदेश, बिहार व आसाम या राज्यांमध्ये समुद्र किनारे नसताना रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारले गेले. त्या राज्यांमध्ये असे प्रकल्प उभारता येणे शक्य आहे, तर विदर्भात का नाही? असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्र्यांनाच घरचा आहेर दिला.

२८ एप्रिलला महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समुद्र किनारा नसल्यामुळे रिफायनरी प्रकल्प विदर्भात येऊ शकत नाही, असे वक्तव्य केले होते. त्यावर आ.डॉ. देशमुख यांनी प्रतिप्रश्न उपस्थित केला आहे.

पानिपत, भटिंडा, दिल्ली, बिना, बरौनी व गुवाहाटी इत्यादी ठिकाणी इनलँड रिफायनरी प्रकल्प आहेत. राज्य शासनातर्फे नागपूर-मुंबई समृद्धी मार्गाची निर्मिती केली जात आहे. याच मार्गावर पेट्रोल वहन करणारी नागपूर ते मुंबई वाहिनी टाकल्यास समुद्र किनाऱ्यापासून क्रूड ऑईल विदर्भात सहज येऊ शकते. देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने महाराष्ट्राला तरुण नेतृत्व लाभले आहे. विदर्भातील तरुणांच्या बेरोजगारीचा गंभीर प्रश्न ते जाणतात. या रिफायनरीच्या माध्यमातून ते हा प्रश्न सहज हाताळू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचेशी मुख्यमंत्री व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे सलोख्याचे संबंध आहेत. ठाम निर्धार केल्यास, या संबंधांच्या माध्यमातून ते विदर्भाच्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी हा प्रकल्प विदर्भात आणू शकतात, असा विश्वासही त्यांनी यावेळी प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून केला.

रत्नागिरीच्या नाणार येथील रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्पाला शिवसेना व स्थानिक लोकांचा प्रचंड विरोध आहे. या प्रकल्पासंबंधी शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी दि. २३ एप्रिलला नाणार येथे आयोजित जाहीर सभेत हा प्रकल्प विदर्भात हलविण्यास सहमती दर्शविली होती. शिवसेनेने ना हरकत प्रमाणपत्र दिल्यामुळे नाणारचा रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प आता विदर्भात आणावा अशी मागणीही त्यांनी केली.

३ लाख कोटींचा रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल हा महत्वाकांक्षी प्रकल्प विदर्भात आल्यास उद्योगधंद्यांना एक नवी गती मिळेल तसेच रोजगार निर्मितीला चालना मिळेल. या प्रकल्पातून विदर्भातील ५० हजार युवकांना प्रत्यक्ष व १ लाख युवकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करत वाणिज्य आणि उद्योग विभागांकडून विदर्भात येत असलेल्या गुंतवणूकीचा वाटा अत्यंत कमी आहे. गेल्या ४ वर्षात विदर्भात केवळ १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. परंतु हे सर्व केवळ कागदावर असल्याचा आरोप करत विदर्भातील युवक कुठे जातील, हा सर्वात गंभीर प्रश्न आहे. भरभराटीसाठी, उद्योगासाठी वीज सर्वात आवश्यक आहे. छत्तीसगढ आणि तेलंगना स्वस्त वीज देत असताना विदर्भात उद्योग कसे येतील? विदर्भात एमआयडीसीमधील बंद असलेले उद्योगधंदे जिवंत करण्यासाठी मोठ्या गुंतवणुकीचे ‘पॅकेज’ देण्याची गरज असून  “मॅग्नेटिक महाराष्ट्र” च्या धर्तीवर “व्हायब्रन्ट विदर्भ”  योजना राबविण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *