Breaking News

नाना पटोले यांची खंत, ‘एक ही भूल कमल का फुल’च्या पश्चातापाने…. बोट कापण्याचा…. सत्ताधारी पक्षाची दादागिरी जनतेच्या जीवावर उठली

जनतेला खोटी स्वप्ने दाखवून २०१४ साली सत्तेवर आलेल्या भाजपाचा खरा चेहरा जनतेला उमगला असून आपली फसवणूक झाल्याने जनतेला पश्चाताप होऊ लागला आहे. ‘एकही भूल कमल का फुल’ अशी प्रतिक्रीया लोकांमधून उमटली होती, आता तर, ज्या बोटाने भाजपाला मतदान केले ते बोटच कापून टाकण्याचा प्रकार मनाला सुन्न करणारा आहे. भाजपाला मतदान करून आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली अशी लोकांची भावना वाढली असून याची मोठी किंमत भाजपाला चुकवावी लागेल, असा इशारा काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भय आणि भ्रष्टाचार हेच भारतीय जनता पक्षाचे चाल व चलन आहे. केंद्रातील भाजपा सरकारप्रमाणेच महाराष्ट्रातील भाजपाप्रणित सरकारही जनतेला नकोसे झाले आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार, खासदार खुलेआम दादागिरी करत आहे. मुंबईतील शिंदे गटाच्या आमदार पुत्राने एका अधिकाऱ्याचे अपहरण करून त्यांना मारहाण केली, दुसऱ्या आमदाराने गोळीबार केला, एक आमदार महाशय अधिकाऱ्यांचे डोळे काढण्यापर्यंतची भाषा करत आहे. केंद्रातील मंत्री तर औकात दाखवण्याची भाषा करत आहेत. सत्ताधारी पक्षाच्या आमदार, खासदार व त्यांच्या सहकाऱ्याच्या जाचाला कंटाळून उल्हासनगर मधील नंदकुमार ननावरे यांनी १ ऑगस्ट रोजी पत्नीसह तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली पण पोलिस मात्र तपासात चालढकल करत होते.

आरोपींना अटक होत नसल्याने नंदकुमार यांचा भाऊ धनंजय ननावरे यांनी, ज्या बोटाने भाजपला मतदान केले होते, ते बोटच सुऱ्याने कापून टाकले. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दर आठवड्याला शरीराचा एक भाग कापून पाठवणार असल्याचा इशारा दिला आहे. हा प्रकार मन सुन्न करणारा व संताप आणणारा आहे. गृहखात्यावर फडणवीस यांचा वचक नाही, राजकीय पक्ष फोडण्याच्या व्यस्त कार्यक्रमातून त्यांना गृहविभागाकडे लक्ष देण्यास वेळही मिळत नाही. भाजपा व फडणवीस यांच्या राजकीय साठमारीत महाराष्ट्राची जनता मात्र भरडली जात आहे, हे दुर्दैव आहे.

उल्हासनगरच्या ननावरे दाम्पत्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्यांना तात्काळ बेड्या ठोकून कठोर शिक्षा होईल याकडे मुख्यमंत्री व गृहमंत्री लक्ष घालतील अशी अपेक्षा आहे. ननावरे प्रकरणात छोटा-मोठा आरोपी असा भेदभाव न करता कारवाई करण्याची हिम्मत सरकारने दाखवली पाहिजे. केवळ विरोधी पक्षांच्या लोकांवर कारवाई करण्यात आपली मर्दुमकी दाखवणाऱ्या फडणवीस व शिंदे यांनी त्यांच्या पक्षातील सत्तेचा माज आलेल्या आमदार-खासदारांवर कारवाई करून लगाम घालावा, असेही पटोले म्हणाले.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *