Breaking News

भाजपा म्हणते, राज्याच्या बदनामीचे कारस्थान कधीही यशस्वी होणार नाही

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणांतर्गत महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर करून राज्याला मोठी भेट दिल्याबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी व्यक्त केली.

शिंदे – फडणवीस सरकारच्या नेतृत्वात राज्यात येणारी गुंतवणूक रोखण्यासाठी राज्याची बदनामी करण्याचे महाविकास आघाडीचे कारस्थान कधीही यशस्वी होणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने राज्यात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर केल्यामुळे २००० कोटी रुपयांची गुंतवणूक येणार असून ५००० रोजगार निर्मिती होईल. राज्यात शिंदे – फडणवीस सरकारमुळे पुन्हा एकदा गुंतवणुकीस अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. आगामी काळात राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होऊन महाराष्ट्र देशातील पहिल्या क्रमांकाचे गुंतवणूक आकर्षित करणारे राज्य ठरेल, असा आपल्याला ठाम विश्वास आहे.

त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्या अडीच वर्षात वसुलीमुळे आणि टक्केवारीमुळे राज्यात नवी गुंतवणूक येणे अवघड झाले. उलट राज्यात प्रस्तावित असलेले मोठे प्रकल्प अन्यत्र गेले. वेदांता फॉक्सकॉनचा सेमिकंडक्टर प्रकल्प, टाटा एअरबसचा प्रकल्प आणि सॅफ्रानचा प्रकल्प हे प्रकल्प आघाडीच्या वसुली व टक्केवारीमुळे महाराष्ट्रात होण्याच्या ऐवजी अन्य राज्यात झाले. तथापि, आता शिंदे फडणवीस सरकारच्या बुलेट ट्रेनच्या वेगाने कामामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्याबरोबर महाविकास आघाडीचे नेते त्यांच्या अपयशाचे खापर नव्या सरकारवर फोडून खोट्याचा नॅरेटीव्ह चालवत आहेत.

महाराष्ट्रात उद्योग येऊच नये, यासाठी तर महाविकास आघाडीकडून ही बदनामीची मोहीम चालवली जात आहे, असा आरोप करून ते म्हणाले की, खोट्याचा नॅरेटीव्ह चालविण्याची ही मोहीम कधीही यशस्वी होणार नाही. भारतीय जनता पार्टी – बाळासाहेबांची शिवसेना युती सरकार राज्याला गुंतवणुकीत पुन्हा पहिल्या क्रमांकावर आणेल.

Check Also

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *