Breaking News

उध्दव ठाकरेंचा इशारा, आमच्याकडेही बरेच बॉम्ब, फक्त वाती पेटविण्याचा अवकाश विधान परिषदेत पहिल्यांदाज कामकाजात सहभागी होण्यापूर्वी दिला इशारा

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांबाबत मोठे बॉम्ब फोडणार असल्याचा सूचक इशारा शिंदे-फडणवीस सरकारला दिला. यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत विचारलं असता त्यांनीही आमच्याकडे बरेच बॉम्ब आहेत. त्यांच्या वाती काढल्या आहेत, फक्त त्या वाती पेटवण्याचा अवकाश आहे, असा सूचक इशारा दिला. ते सोमवारी २६ डिसेंबर रोजी नागपूरमध्ये विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, बॉम्ब बरेच आहेत, वाती काढल्या आहेत, फक्त त्या वाती पेटवण्याचा अवकाश आहे. मात्र, मला वाटतं आधी ताबोडतोबीने सीमाभागातील काही लाख मराठी माणसांचं आयुष्य बरबाद होणं थांबवण्यासाठी ठराव केला पाहिजे. त्या भागातील मराठी माणसांनी निवडणुका जिंकून दाखवल्या आहेत. आंदोलनं केली आहेत.

आता काहीजण म्हणतात की, तुम्ही कुठे लाठ्याकाठ्या खाल्ल्या आहेत, तुमच्या अंगावर कुठे केस आहेत. या गोष्टीला काहीही अर्थ नाही. असं म्हणणाऱ्यांनी लाठ्याकाठ्या तेव्हा खाल्ल्या होत्या, जेव्हा ते आमच्यात होते. मात्र, त्याचा अर्थ त्यांनी आता गप्प बसावं असा नाही असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता लागवला. तसेच जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत हा विवादास्पद भाग केंद्रशासित झाला पाहिजे, अशी आमची आग्रही मागणी आहे, असेही त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे सीमावादावर बोलताना म्हणाले, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. एवढाच काळ किंवा यापेक्षा जास्त काळ सीमाभागातील माणसं मराठीत बोलत आहेत. त्यांनी आंदोलनासह विविध मार्गांनी आम्हाला महाराष्ट्रात जायचं आहे असं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी लोकशाही मार्गाने निवडणुका जिंकून दाखवल्या आहेत. त्यावर ठरावही मान्य झाला आहे.

मी तुम्हाला एक पेन ड्राईव्ह देणार आहे. कारण विरोधी पक्षात आलं की पेन ड्राईव्ह द्यायला लागतात, अशी एक पद्धत झाली आहे. या पेन ड्राईव्हमध्ये ७० च्या दशकात महाराष्ट्र सरकारनेच केलेली ‘केस फॉर जस्टीस’ ही फिल्म दिली आहे. ती फिल्म मी मुद्दामहून आणली असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, त्या फिल्मचा उद्देश स्पष्ट आहे. साधारणतः १८ व्या शतकापासून तिकडे मराठी भाषा कशी वापरली जाते हे दाखवलं आहे. त्यात जुन्या मराठी पाट्या, प्रशासकीय कामकाजाचे मराठीतील कागदपत्रं आहेत. शाळा मराठी होत्या, महिला मंडळ आणि इतर संस्थाही मराठी होत्या हेही त्यात दाखवलं आहे. हे सगळे पुरावे त्यात आहेत. परंतु त्या फिल्मच्या अर्ध्या भागात ऑडिओच नाही.
मी तुम्हाला हा पेन ड्राईव्ह देऊ इच्छितो. आपण तो पेन ड्राईव्ह घ्यावा. माझी विनंती आहे की, या पेन ड्राईव्हमधील फिल्म दोन्ही सभागृहातील सदस्यांना दाखवावी. जेणेकरून नव्या पिढ्यातील लोकप्रिय सदस्यांना हा ठराव म्हणजे काय, तो कशासाठी केला जातो आहे, आपण का सीमाभागातील जनतेच्या पाठिशी उभं राहायचं हे कळेल, असे मतही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केले.

Check Also

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *