Breaking News

राज ठाकरे म्हणाले, ‘हे पोट्टं काय करणार?’, एके दिवशी वरवंटा फिरविणार नागपूर येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पत्र वाटप करताना दिला इशारा

मागील काही दिवसांपासून विविध प्रश्नी मनसे प्रमुख राज ठाकरे हे आपल्या पक्षाची भूमिका कधी दौऱ्यातून तर कधी जाहिर सभांमधून मांडत आहेत. मात्र त्यांना घेतलेल्या भूमिकेच्या नेमकी उलट घडत असल्याने राज ठाकरेंचा मनसे यंदातरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भोपळा फोडणार का? अशी उपाहासात्मक चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली. यापार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनीच या चर्चेला उत्तर नागपूरात दिले.

यावेळी नागपूरात आलेले राज ठाकरे म्हणाले, आज आमच्या शाखाध्यक्षांना बघून लोकं म्हणतील ‘हे पोट्टं काय करणार?’ मात्र, काही दिवसांनी हे पोट्टं तुमच्यावर वरवंटा फिरवेल, असा इशारा राज ठाकरे यांनी पक्षाची खिल्ली उडवणाऱ्यांना दिला. राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते पक्षातील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी मनसेची खिल्ली उडवणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला.

राज ठाकरे म्हणाले, गेल्यावेळी मी दौऱ्यावर आलो, तेव्हा मनसेला पदाधिकारी मिळत नाही, अशा बातम्या आल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात अंजन घालावं यासाठी पदाधिकाऱ्यांना आज पत्र वाटप करण्यात आले. काही पत्रकार एखाद्या पक्षासाठी वाहलेले असतात. काही जणांनी इतके वर्ष पक्षांची दलाली केली असेल, तर त्यांना दुसरा पक्ष वाढत असताना त्रास होणारच आहे. मात्र, नागपूरमधील काही पत्रकार मनसेला प्रोत्साहन देत असल्याचेही स्पष्ट केले.

एखाद्या पक्षाचा विजय आणि पराभव होत राहतो. आधी विदर्भ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्यानंतर तो भाजपाचा बालेकिल्ला झाला. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष यातून गेला आहे. आज आमच्या शाखाध्यक्षांना बघून लोकं म्हणतील ‘हे पोट्टं काय करणार?’ मात्र, काही दिवसांनी हे पोट्टं तुमच्यावर वरवंटा फिरवेल, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.

जनसंघ १९५२ साली जन्माला आला. पुढे आणीबाणी लागू झाली. त्यानंतर मोरारजी देसाईंचे राज्य आले. त्यांची सत्ता गेली आणि इंदिरा पुन्हा निवडून आल्या. त्यानंतर १९८० ला जनसंघाचा भारतीय जनता पक्ष झाला. १९९६ ला अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. मात्र, भाजपाला खऱ्या अर्थाने बहूमत हे २०१४ साली मिळाले. १९५२ ते २०१४ कितीही मतभेद असले तरी काम करण्याच्या सातत्यातून त्यांना हे यश मिळाले आहे. काँग्रेसचा संघर्षही मोठा आहे. १९६६ साली बाळासाहेबांनी सुरू केलेली शिवसेनेच्या हातात १९९५ मध्ये सत्ता आली. १९६६ ते १९९५ हा संघर्षाचा काळ होता. मात्र, आजचं राजकारण बघितलं, तर सर्वांना लगेच यश हवं आहे. पण त्यासाठी जिवाचं रान करावं लागलं, मेहनत करावी लागले, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं.

येत्या काही दिवसांत नागपूरममध्ये कार्यकर्त्यांसाठी शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. या शिबीरात सर्वांना पक्षाच्या कामाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सांगत कोणत्याही पदावर पोहोचल्यावर कार्यकर्त्यांना तुच्छ लेखू नका, असा सल्लाही त्यांनी मनसैनिकांना दिला.

त्यानंतर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही त्यांच्या शासकिय निवासस्थानी जावून भेट घेतली.

Check Also

राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या बरोबरील चर्चेचे निमंत्रण स्विकारले

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत लोकसभा निवडणुकीच्या जाहीर चर्चेचे निमंत्रण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *