Breaking News

वर्षपूर्तीच्या सभेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात आमदारांचा श्वास गुदमरू लागला… शिवसैनिकांच्या मनातील उद्रेकाला वाचा फोडण्याचं काम केलं

राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालं. यानिमित्त ठाण्यातल्या टेंभी नाका येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक वर्षभरापूर्वी (महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या काळात) शिवसेना आणि भाजपाच्या गोटात काय घडलं याबाबत बरीच माहिती उलगडून सांगितली.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात राज्यातल्या जनतेचं जगणं असहाय्य झालं होतं. लोकांचा श्वास गुदमरू लागला होता. आपल्या आमदारांचा श्वास गुदमरू लागला होता. आपले शिवसेनेचे सगळे आमदार, त्यांच्या भावना, त्यांच्या मतदार संघातले विषय, महाविकास आघाडीत होणार त्रास सहन करत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होता खरा, परंतु राज्यात शिवसेनेचं आणि शिवसैनिकांचं खच्चीकरण होत होतं. त्यामुळे शिवसेना वाचवण्यासाठी, शिवसैनिकांचं, शिवसेनेच्या आमदारांचं खच्चीकरण थांबवण्यासाठी मला त्यावेळी भलतंच धाडस करावं लागलं. ते धाडस सोपं नव्हतं. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात, शिवसैनिकांच्या मनात, आमदारांच्या मनात जे काही घडत होतं, या सगळ्यांचा मनात जो उद्रेक होता त्याला वाचा फोडण्याचं काम त्यावेळी या एकनाथ शिंदेने केलं. हे धाडस संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने, देशाने आणि जगानेही पाहिलं आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही मोठं धाडस केलं. मग हे सरकार स्थापन झालं. सरकार स्थापन झाल्यापासून गेल्या वर्षभरात आपल्या सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले. यशस्वीपणे सर्वांसाठी कामं केली. सुरुवातीच्या मंत्रिमंडळात मी आणि देवेंद्र फडणवीस आम्ही दोघेच होतो, तरीदेखील लोकहिताचे निर्णय घेतले. तो धाडसी निर्णय घेतला तेव्हाचा प्रसंग बाका होता. काही लोक आपल्या पाठिशी अगदी मनापासून होते. तर काही जण विचार करत होते की, आता पुढे काय होणार, एकनाथ शिंदेंचं काय होणार, त्या ५० आमदारांचं काय होणार? परंतु मी त्याची फिकीर केली नव्हती. मी माझ्या राजकीय जीवनात कुठलाही निर्णय घेताना कधीही मागचा पुढचा विचार केला नाही. सगळे निर्णय धाडसाने घेतले. कारण हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद माझ्याबरोबर होते, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं पाठबळ होतं.

एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, त्या काळात तुम्हाला माहिती आहे की लोकांच्या मनात अनेक प्रश्न होते. कोणाला वाटलं नव्हतं, अगदी मलाही वाटलं नव्हतं की, राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मला जबाबदारी पार पाडावी लागेल. परंतु बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन गेल्यानंतर आणि असं धाडस केल्यावर, त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी मला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली. मी त्यांना धन्यवाद देतो. या काळात भाजपाने खूप सहकार्य केलं. देवेंद्र फडणवीस पाठिशी उभे राहिले. त्यांचे आभार मानतो.

यावेळी एकनाथ शिंदेंनी शरद पवारांचं नाव घेऊन अजित पवारांना लक्ष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेत्याचं काम काय असतं? सरकारला चांगलं म्हणण्याचं काम असतं का? विरोधी पक्षनेत्याचं काम त्यांना करू द्या. सरकार म्हणून आम्हाला आमचं काम करू द्या. विरोधी पक्षनेते मनातून बोलत नाहीयेत. त्यांना विरोधी पक्षनेते म्हणून बोलावं लागतंय म्हणून ते बोलतायत. कारण सत्तास्थापनेवेळी शरद पवारांनी काय केलं याची आठवण त्यांना आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांना क्लीन बोल्ड वगैरे केल्याचं शरद पवार म्हणाले. पण त्यांनी क्लीन बोल्ड अजित पवारांनाच केलंय. हे अजित पवारांना माहितीये. अजित पवार ते विसरणार नाहीत. तेव्हा एकाच वेळी अनेकांशी बोलणी सुरू होती, हेच शरद पवारांनी मान्य केलंय, असंही म्हणाले.

२०१९ ला शिवसेना भाजपाची अधिकृतपणे युती झाली होती. दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणुका लढवल्या, बाळासाहेब ठाकरेंचे फोटो, त्यांचे विचार घेऊन आम्ही पुढे गेलो. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही फोटो होता. मोदींचा फोटो दाखवून आम्ही घराघरांत मतं मागितली. आमचं सरकार पुन्हा येणार असं वाटलं होतं, तसं बहुमतही मिळालं. परंतु दुर्दैवाने निवडणुकीचे निकाल घोषित झाले आणि तात्काळ लोकांचे काही खुलासे बाहेर येऊ लागले. माध्यमांसमोर ते वेगवेगळी भाष्य करू लागले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ज्यांच्या मनात पाप होतं, ज्यांच्या मनात काही काळंबेरं होतं ते म्हणाले आमच्यासाठी सगळे दरवाजे उघडे आहेत. त्यानंतर दुर्दैवाने नको होतं तेच झालं. महा आघाडी आघाडी स्थापन झालं. परंतु याच महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या नावाखाली आधीच्या सरकारच्या काळातल्या म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या योजना आणि प्रकल्प बंद केले. मंत्रिमंडळात मी सुद्धा होतो. देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातही मी होतो, त्यामळे मला सगळं माहिती आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

अजित पवार यांचा शरद पवारांवर आरोप, फसवणूक असे म्हणणार नाही, पण…

२०१४ पर्यंत आपल्याला भाजपासोबत जायचं आहे. हे यांच्या गावीही नव्हतं. का तर तो पर्यंत ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *