Breaking News

फोन टॅपिंगच्या मुद्याला शिंदे-फडणवीसांकडून दिक्षा सालियन प्रकरणाचे प्रत्युत्तर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी मुद्दा उपस्थित केल्याने सभागृहात गोंधळ

शिंदे-फडणवीस सरकारने फोन टॅपिंगच्या मुद्यावरून आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना अभय दिल्याप्रकरणी विरोधकांकडून आक्रमक पवित्रा घेत आज विधानसभेत सभात्याग करत आपला विरोध दर्शविला. मात्र विरोधकांच्या या आक्रमक पवित्र्याला प्रत्युत्तर म्हणून स्व.अभिनेता सुशांत सिंह रजपूत याची व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या आत्महत्येचे प्रकरण शिंदे गटाचे प्रतोद आणि आमदार भरत गोगावले आणि भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला. त्यामुळे सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्याने सभागृहाचे कामकाज जवळपास ५ वेळा तहकूब करावे लागले.

सुशांत सिंग राजपूत यांची व्यवस्थापिका दिशा सालियन हिने आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरुवातीला मुंबई पोलिस आणि नंतर सीबीआयने केला. या दोघांच्याही तपासात कोणताही संशयास्पद प्रकार आढळून आला नाही. त्यामुळे हे प्रकरणी मुंबई पोलिस आणि सीबीआयकडून जवळपास बंद केले. मात्र यात भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याकडून सातत्याने शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा सहभाग असल्याचा आरोप सातत्याने करण्यात येत आहे. दरम्यान आज विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधकांनी फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित करत शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यास प्रत्युत्तर म्हणून शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी दिशा सालियन आत्म हत्या प्रकरणाचा तपास पुन्हा सुरु करावा आणि तीचा शवविच्छेदन अहवाल सादर करण्याची मागणी केली.

त्यांच्या मागणी पाठोपाठ भाजपाचे आमदार नितेश राणे यांनीही हाच मुद्दा लावून धरत याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे नसून मुंबई पोलिसांकडेच आहे. तरीही ज्या दिवशी सालियनने आत्महत्या केली, त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आले. त्यादिवशी कोणता मंत्री, वजनदार राजकिय व्यक्ती तेथे उपस्थित होता याची चौकशी झाली पाहिजे, त्याशिवाय सालियनने रजपूत यास पाठविलेला फोटो कोणाचा होता याचीही चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली.

आमदार नितेश राणे यांच्या आरोपानंतर ठाकरे गटाचे आमदारांसह महाविकास आघाडीचे सर्व आमदारांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर सत्ताधारी बाकावरील आमदार ही विरोधकांच्या आमने-सामने येत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे अखेर सभागृहाचे कामकाज तालिका अध्यक्ष संजय शिरसाट यांनी सुरुवातीला १० मिनिटासाठी तहकूब केले. त्यानंतर पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरु झाले त्यावेळी नितेश राणे यांनी चौकशी मागणी केली. त्यामुळे पुन्हा तीन ते चार वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

यावेळी भाजपाच्या आमदार मनिषा चौधरी, डॉ. भारती लव्हेकर यांच्यासह अन्य महिला आमदारांनीही याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर पु्हा सभागृहाचे कामकाज पुन्हा स्थगित केले. त्यानंतर सुरु झाल्यानंतर पुन्हा हाच मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावेळी अखेर राहुल नार्वेकर यांनी काही सदस्यांना बोलण्याची मुभा दिली. परंतु गोंधळ थांबेनासा झाल्यानंतर सभागृहाचे कामकाज परत एकदा तहकूब केले.

Check Also

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रासाठी मागितल्या या गोष्टी, पण पंतप्रधान मोदींकडून साधा उल्लेखही नाही

स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस विसर्जित करावी असा सल्ला महात्मा गांधींनी दिला होता. त्यानुसार काँग्रेस विसर्जित झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *