Breaking News

नाना पटोले यांचे सूचक वक्तव्य, …कोण कोणाला भेटतो यांच्याशी आमचे देणेघेणे नाही अदानी-मोदींचे संबंध काय? आणि २० हजार कोटी कुठून आले? हे प्रश्न आजही कायम

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी दोन दिवस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहे. आगामी निवडणुकीत मोठा विजय कसा संपदान करायचा यावर या बैठकीत विचारमंथन केले जाणार आहे. प्रत्येक जागेचा आढावा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. काँग्रेस पक्षाची राज्यातील प्रत्येक मतदारसंघात संघटनात्मक ताकद आहे. काँग्रेस पक्ष सर्व मतदारसंघाचा आढावा घेणार असला तरी त्याचा आघाडीच्या जागा वाटपावर काही परिणाम होणार नाही. भाजपाचा पराभव करणे हेच आमचे लक्ष्य असून या बैठकीनंतर मविआच्या बैठकीत पुढची रणनिती निश्चित केली जाईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

टिळक भवन येथे होत असलेल्या दोन दिवसांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले प्रसार माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कर्नाटकात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव झाला. ३० मतदारसंघात भाजपाच्या महत्वाच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. देशभर काँग्रेस हाच पर्याय असून भाजपाविरोधात जनतेत मोठा असंतोष आहे. महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशनंतर सर्वात जास्त ४८ जागा असणारे राज्य आहे. या प्रत्येक जागेवर विजयी होण्यासाठी काय करता येईल याची व्यूहरचना या बैठकीत ठरवली जाणार आहे. मविआचे घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्ष, शेकाप, कम्युनिस्ट पक्षालाही जागा वाटपावेळी विचारात घेतले जाईल.

उद्योगपती अदानी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, कोण कोणाला भेटतो याच्याशी आमचे काही देणेघेणे नाही. अदानी पवारांच्या घरी रहायला गेले तरी आम्हाला त्याचे काही नाही. ते कोणाला भेटतात हा आमच्यासाठी महत्वाचा प्रश्न नाही. अदानी व काँग्रेसची वयैक्तिक दुश्मिनी नाही. परंतु आमचे नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेले प्रश्न महत्वाचे आहेत. मोदी-अदानी यांचा संबंध काय? आणि अदानीच्या कंपनीत २० हजार कोटी रुपये कुठून आले? सर्व कंपन्या अदानीलाच काय विकल्या जात आहेत? अदानी घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करावी ही काँग्रेसची मागणी कायम आहे. मोदी सरकार ही मागणी मान्य का करत नाही? हा जनतेच्या पैशाचा प्रश्न आहे म्हणून काँग्रेस जाब विचारत राहणार, कोणाला व्यक्तिगत संबंध ठेवायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे.

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या विधानावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, सरदाराच्या पोराला राजा बनण्याची वेळ आली त्यावेळी याच लोकांनी महाराजांची गत काय केली होती हे महाराष्ट्रातील जनता विसरलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन जाणारे होते. कोण त्याचा राजकीय फायदा उठवत असेल तर छत्रपतींच्या मावळ्यांना त्यातील बारकावा कळतो. महाराजांना ज्यांनी त्रास दिला तो त्रास मावळे विसरलेले नाहीत, सरसंघचालकांच्या विधानावर यापेक्षा जास्त चर्चा करण्याची गरज वाटत नाही, असेही पटोले म्हणाले.

Check Also

इंडोनेशियाच्या शिष्टमंडळाने घेतली लोकसभा निवडणूकीच्या कामकाजाची माहिती

इंडोनेशिया देशाच्या निवडणूक आयोगातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयातील राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला भेट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *