Breaking News

कॅबिनेटमध्ये गँगवॉर सुरू आहे का? सुप्रिया सुळे यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

सर्वच आरक्षणांबाबत महाराष्ट्र आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड आमच्या भूमिकेत सातत्य आहे. आम्ही जुमलेबाज, भ्रष्ट पक्षांसारखे नाही, जिथे महाराष्ट्रात धनगरांना आरक्षण द्या, म्हणतात आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड नाही म्हणतात. त्यामुळे या खोके सरकारवर आमचा विश्‍वास नाही असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांवर केला. सुप्रिया सुळे मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना राज्य सरकार आणि भाजपावर हल्लाबोल केला आहे.

हिंगोलीतील सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाबाबत नेमण्यात आलेली शिंदे समिती बरखास्त करावी याबाबत खा. सुप्रिया सुळे यांचे लक्ष वेधले असता त्या म्हणाल्या, भुजबळ हे वयाने आणि मानाने मोठे आहेत. त्यांनी व्यासपीठावरुन त्यांच्या मागण्या न सांगता त्यांच्या मागण्या कॅबिनेटच्या बैठकीत मांडाव्यात, वा कमराबंद चर्चेत सांगाव्यात. तो त्यांचा अधिकार आहे. भाजपाचे १०८ आमदार आहेत. त्यापैकी कोणी बोलत नाही. त्यातील आठच आमदारांना मंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे बाकीचे आमदार कॅबिनेटमध्ये बसत नाहीत. महाराष्ट्रातील गलिच्छ राजकारणामध्ये हा जो गोंधळ सुरु आहे, याच राजकारणामध्ये भुजबळ यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे भुजबळ यांनी त्यांचे प्रश्‍न कॅबिनेटमध्ये मांडावेत. खोके सरकारने महाराष्ट्राचे राजकारण दूषित केले आहे. २०० आमदार असताना तुमच्या कॅबिनेट मंत्र्याला बाहेरचे व्यासपीठ कशाला लागते? जी चर्चा कॅबिनेटमध्ये झाली आहे, ती चर्चा यांचे मंत्री बाहेर येवून बोलतात. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. याचाच अर्थ असा की, या ट्रिपल इंजिन सरकारमध्ये समन्वय नाही. एखादी खासगी बाब आपण बाहेर उघड करुन दाखवतात. ही खूपच चिंताजनक बाब आहे. जर मंत्री बाहेरील व्यासपीठावरुन मागण्या करत असतील तर कॅबिनेटमध्ये कसली चर्चा होते? असा सवालही उपस्थित केला.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्रामध्ये काम करीत असलेल्या खोके सरकारला अधिकार आहेत. मात्र त्याबाबत ठामपणे मुख्यमंत्री आणि त्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करायला हवी. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर आम्ही पूर्ण ताकदीने त्यावर बोलू. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम समाजाच्या ज्या-ज्या मागण्या आहेत, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, यात शंकाच नाही. महाराष्ट्र आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड आमच्या भूमिकेत सातत्य आहे. आम्ही जुमलेबाज, भ्रष्ट पक्षांसारखे नाही, कॅबिनेट मंत्र्यांमध्ये भांडणे चालली आहेत. महाराष्ट्रात दुष्काळ, महागाई, बेरोजगारी, अवकाळी सारखे प्रश्‍न उभे आहेत. मात्र या मंत्र्यांची भांडणे संपतील, तेव्हाच महाराष्ट्राचे प्रश्‍न सोडवले जातील ना, असाही टोला लगावला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने करीत असलेल्या विधानांबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझे देवेंद्रजींशी कोणतीच भांडणे नाहीत. माझी आणि त्यांची लढाई वैचारिक आहे. देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू नेते आहेत. त्यांनी पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. ते मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृहमंत्रीपदही होते. पण असे असताना नेमका राज्यातील क्राईम रेट त्यांच्याच कारकीर्दीत कसा वाढत होता? नागपूर हे क्राईमचे हब झाले आहे, असे माध्यमांनीच लिहिले आहे. हे त्यांच्याकडे गृहमंत्रीपद असतानाच कसे घडले? याबाबी अनाकलनीय आहेत, असेही सांगितले.

अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसानसंदर्भात सुप्रिया सुळे म्हणाल्या, लोकसभेत शेतकऱ्यांचा मुद्दा मांडणार आहे. आमचे सगळे पदाधिकारी सर्व राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्याला आणि काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहली. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *