Breaking News

मोदी सरकारचे अपयश लपवण्यासाठी भाजपाची ‘बुस्टर सभा’ पुरोगामी महाराष्ट्रातील जात्यांध्य व धार्मिक विचार थांबवा !: नाना पटोले

महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराने वाटचाल करणारे राज्य आहे. हा पुरोगामी विचारच राज्याला प्रगतीपथावर घेऊन गेला व तोच विचार राज्याच्या हिताचा आहे परंतु मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात जात्यांध्य व धार्मिक विचाराला पुढे करून राज्यात अशांतता निर्माण करण्याचे काम केले जात आहे, हा जात्यांध विचार थांबवण्याची गरज आहे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, मुनाफ हकिम, जो. जो. थॉमस, श्रीरंग बरगे, राजाराम देशमुख, गजानन देसाई आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, राज्यात पुरोगामी विचार रुजलेला आहे, त्याला छेद देण्याचे काम काही लोक करत आहे. हा विचार राज्याच्या प्रगतीसाठी घातक आहे. केंद्रातील भाजपा सरकारने कामगार हिताच्या कायद्यामंध्य़े मोठे बदल करुन त्यांना देशोधडीला लावण्याचे काम केले आहे. मुठभर भांडवलदारांच्या दावणीला बांधून कामगारांचे हक्क व अधिकार हिरावण्याचे काम केले आहे. पण कामगारांचे हक्क व अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आपण काम करू.
केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार सर्व आघाड्यांवर सपशेल फेल झालेले आहे. महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था, शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नावर मोदी सरकारकडे सांगण्यासारखे काहीही नाही. मोदी सरकारचे हे अपयश लपवण्यासाठी भाजपाला बुस्टर सभा घ्याव्या लागत आहेत. पण जनतेवर त्याचा काहीही परिणाम होणार नसल्याची टीका त्यांनी केली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Check Also

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *