Breaking News

महाराष्ट्र विधानसभेवर शिवसेना स्वबळावर भगवा फडकविणार राज्यासह देशभरात निवडणूका लढविण्याची शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी

मागील काही वर्षे केवळ हिंदू मतांमध्ये फाटाफूट नको म्हणून शिवसेना महाराष्ट्राच्या बाहेर निवडणूका लढवित नव्हती. मात्र यापुढील काळात महाराष्ट्रासह देशातील प्रत्येक निवडणूक शिवसेना लढविणार असून त्यासाठी सर्व शिवसैनिकांनी सज्ज रहावे असे आवाहन करत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूका स्वबळावर लढवित महाराष्ट्राच्या विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकविणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शपथ घेत केली.

वरळी येथील एससीआयच्या सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आयोजित शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे सर्व नेते, पदाधिकारी यांच्यासह सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते.

दररोज पाकिस्तानकडून भारतीय जवावांनावर गोळ्या झाडल्या जात आहेत. मात्र हे सत्ताधारी  फक्त लिमलेटच्या गोळ्या मारायच्या असल्यासारख्या गोष्टी करत आहेत. गुजरातमधल्या निवडणूकीत पाकिस्तानचा उल्लेख करत संबध जोडण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र पाकिस्तानचा संबध गुजरातच्या निवडणूकीशी काय? असा सवाल उपस्थित करत अप्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. गुजरातमध्ये कॉंग्रेस वाढली अथवा भाजप कमी झाली याविषयी मला आनंद वा दु:ख झाले नाही. मात्र त्या ठिकाणी एखादा प्रादेशिक पक्ष असता तर तेथे हा प्रादेशिक पक्ष निश्चित विजयी झाला असता असे भाकितही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

जम्मू काश्मीर मध्ये हे सत्तेत आहेत. त्याच्याच सहयोगी पक्षाचा मीर नवाज हा अतिरेक्यांना भाऊ सांगत असल्याचे वक्तव्य करतो. एकाबाजूला दहशतवाद्यांना आपण गोळ्या घालत असताना त्यांचा सहयोगी पक्षाचा पदाधिकारी मात्र भाऊ म्हणत असल्याने त्या सत्तेतून भाजपने राजीनामा देवून बाहेर पडायला हवे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केल्याचे सांगते, विविध लाभ दिल्याचे जाहीरातीतून सांगते. मात्र प्रत्यक्षात गावागावात जावून प्रत्येक शेतकऱ्याला आणि महिला लाभार्थ्यांना जावून विचारले पाहिजे की खरचं त्यांना लाभ मिळाला आहे का? प्रत्येक शिवसैनिकांनी गावातील प्रत्येकाला विचारावं असे सांगत या सरकारकडून विकास कामांपेक्षा जाहीरातीवरच जास्त खर्च केल्याची टीका करत आताच्या सरकारपेक्षा पूर्वीचे सरकारच चांगले म्हणायची पाळी आल्याची उपरोधिक टीका राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारवर केली.

भीमा कोरेगांव येथील प्रकार लाजीरवाणा

काही दिवसांपूर्वी पुणे येथील भीमा कोरेगाव येथे झालेला प्रकार लाजीरवाणा आहे. ज्या छत्रपती संभाजी राजांना दिल्लीतील औरंगजेबाने त्यांचा देह छिन्नविचिन्न अवस्थेत करून वढू बद्रुक येथे फेकून दिला. त्या मृतदेहाला शिवून त्याचे अंत्यसंस्कार गोविंद महाराने केले. स्वराज्यात असलेल्या त्यावेळच्या मावळ्यांनी हे का केले नाही? असा सवाल केला. तसेच भीमा कोरेगांव येथील दंगलप्रकरणी जे कोणाचे अदृष्य हात असतील त्यांना अटक करून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणीही शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली.

मग सर्जीकल स्ट्राईकचे श्रेय तुम्ही का घेता?

काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नेव्हीच्या अधिकाऱ्यांना आम्ही सरकार असल्याचे सांगत तुमचे इथे काय काम असा सवाल केला. गडकरींच्या या वक्तव्याने माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली असल्याचे सांगत ते मग सीमेवर जे काही सर्जीकल स्टाईक करतात मग त्याचे श्रेय का घेता? असा सवाल करत एकाबाजूला त्यांच्या शहीद होण्याची वाहवा करायची आणि दुसऱ्याबाजूला त्यांचे इथे काय काम म्हणून विचारणा करायची असा दुटप्पीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा सज्जड इशाराही त्यांनी यावेळी दिला.

कर्नाटकचा अभिमान बाळगणाऱ्यांनी तिकडेच जावे

राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तिकडे कर्नाटकात जावून जे काही कर्नाटकी प्रेम दाखविले आहे. त्यांनी तिकडेच जावे असा उपरोधिक सल्ला देत मी सर्व भाषांचा आदर करत मात्र इतर भाषिकांकडून मराठी भाषिकांवर अत्याचार करत असतील तर त्याचा मी निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले.     

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *