Breaking News

संजय राऊतांचे “शहेनशाह” स्टाईल सोमय्यांना इशारा…बाप काय असतो ते दिसेल पालघरच्या वेवूर मधील प्रोजेक्टमध्ये ईडी अधिकाऱ्याची भागीदारी

मराठी ई-बातम्या टीम

शिवसेना आणि भाजपातील आऱोप-प्रत्यारोपांचा सामना दिवसेंदिवस चांगलाच रंगत चालला असून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर नव्याने आरोप करत शहेनशाह स्टाईल मध्ये रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप लगते है और बाप काय असतो ते रोज दिसेल असा इशारा देत पालघरमधील वेवूर येथे निकॉन इन्फ्राचा एक मोठा प्रोजेक्ट सुरु असून तो २६० कोटी रूपयांचा प्रोजेक्ट आहे. हा प्रोजेक्ट राबविणाऱ्या कंपनीवर किरीट सोमय्या यांचा मुलगा निल सोमय्या आणि त्यांची पत्नी मेधा सोमय्या या संचालक आहेत. हे बेनामी मालमत्ता एका ईडी अधिकाऱ्याची असून इतके कोट्यावधी रूपये यांच्याकडे येतात कसे असा खळबळजनक सवाल केला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेकडून आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनीही किरीट सोमय्या यांच्या गुंतवणूकीबाबत नव्याने आरोप करत इशारा दिला. यावेळी महापौर किशोरी पेडणेकरही उपस्थित होत्या.
निल सोमय्या यांच्या या २६० कोटींच्या प्रकल्पात ईडीचे एक संचालक आहेत, त्यांचे किती पैसे आहेत हे मी विचारलं. ही बेनामी मालमत्ता ईडीच्या एका संचालकाची आहे. हे कोट्यवधी रुपये यांच्याकडे येतात कुठून? असा सवाल करत आम्हाला कुंडल्या काढण्याच्या धमक्या देऊ नका. तुम्हाला तुरुंगात बसून तुमच्याच कुंडल्या बघाव्या लागणार आहेत. यांच्या कुंडल्या आहेत, त्याच्या कुंडल्या आहेत. तुमच्या कुंडल्या नाहीयेत का आमच्याकडे? हे महाराष्ट्र सरकार आहे. तुमचे असेल केंद्रात सरकार. पण महाराष्ट्र सरकार मजबूत आहे आणि आमच्या हातात देखील बरंच काही आहे. त्यामुळे उगीच पोकळ धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नका, त्यात तुम्हीच फसणार आहात असा इशाराही त्यांनी सोमय्या यांना दिला.

तसेच ही नौटंकी बंद करा. तुमच्या भ्रष्टाचाराचे हिशोब तुम्हीच करत बसा आता. माझं तर स्पष्ट आव्हान आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स लावा आमच्या मागे. आम्ही नाही घाबरत तुम्हाला. तुम्ही कितीही धमक्या दिल्या, तरी रिश्ते में हम आपके बाप लगते है. बाप काय असतो, हे तुम्हाला यापुढे रोज दिसेल असा अशा शब्दात भाजपाला आव्हान देत पुढच्या आठवड्यात ईडीचा सगळ्यात मोठा घोटाळा आम्ही बाहेर काढणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारे नवे महात्मा जन्माला आले आहेत. आम्ही त्यांना आव्हान करतो. तुम्ही जो केंद्रीय मंत्र्यांचा हजारो कोटींचा भ्रष्टाचार काढलाय, ती लढाई पुढे घेऊन जा. आमच्याकडे देखील काही कागदपत्रे आहेत. ती आम्ही तुम्हाला देतो. तुमच्यात हिंमत असेल आणि तुम्ही सच्चे असाल, तर तुम्ही ही लढाई पुढे न्याल. नाहीतर जसे या विषयावर तुम्ही शेपूट घालून बसला आहात, ती तुमची शेपूट आम्ही ओढून काढू असा इशारा देत खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली.

Check Also

अमित शाह यांचे आवाहन, … राहुल गांधी यांना सत्तेपासून दूर ठेवा

गेल्या दहा वर्षांची यशस्वी कारकीर्द आणि पुढील पंचवीस वर्षांच्या देशाच्या प्रगतीचा स्पष्ट आलेख असलेल्या भारतीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *