Breaking News

नाना पटोले यांची टीका, … पण अहिल्यादेवींसारखा कारभारही करुन दाखवा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी कधीच द्वेषाचे राजकारण केले नाही

शिंदे-फडणवीस सरकारने अहमदनगरचे नामकरण अहिल्यादेवीनगर करण्याची घोषणा केली, त्याचे काँग्रेस पक्ष स्वागतच करत आहे. पण मुळात या सरकारकडे जनतेला सांगण्यासारखे काहीच नाही म्हणून शहरांची नावं बदलण्याचे काम सुरु आहे. शहराचे नाव तर बदलले पण राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी ज्या पद्धतीने समाजकार्य केले, सर्वधर्म समभावाला घेऊन पुढे गेल्या, त्या विचारांवर शिंदे-फडणवीस सरकारने काम करावे, असा उपरोधिक टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला.

प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, केवळ शहरांची नावे बदलून काहीच उपयोग होणार नाही. औरंगाबाद व उस्मानाबाद शहरांचे नामकरण झाले तरी अजून घोळ आहेच. आता अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यादेवीनगर ठेवल्याची घोषणा सरकारने केली. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तीने धनगर समाजाला खूष करून श्रेय लाटण्याचा हा प्रयत्न दिसतो. याच धनगर समाजाला भाजपाच्या देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी समाजाचे आरक्षण देऊ असे आश्वासन दिले होते पण अद्याप फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण दिलेले नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांसाठी हे सर्व सुरु आहे. अहिल्यादेवींनी कधीच द्वेषाचे राजकारण केले नाही, सर्वांना सोबत घेऊन राज्य कारभार केला. भाजपा मात्र जाती-धर्मांमध्ये वाद निर्माण करण्याचे राजकारण करत आहे.

दोन दिवसांपूर्वीच दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील राजमाता अहिल्यादेवी व सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवून त्यांचा अपमान करण्यात आला आणि आता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव शहराला दिले हा भाजपाचा दुतोंडीपणा आहे. महाराष्ट्र सदनात अहिल्यादेवी व सावित्रीबाईंच्या झालेल्या अपमानावर सरकारने स्पष्टीकरण दिले पाहिजे. जनतेला फसवणारे, लुटणारे, जनतेचे खिसे कापणारे भाजपा सरकार सर्व स्तरावर नापास आहे, त्यामुळे जनतेनेच भाजपाला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार केला आहे.

आरक्षणाच्या नावाखाली मराठा व कुणबी यांच्यात भांडण लावण्याचे भाजपाचे षडयंत्र

आरक्षणाबदद्ल भारतीय जनता पक्षाची भूमिका सर्वांना माहित आहे, भाजपा हा आरक्षण विरोधी आहे. २०१४–१९ मध्ये राज्यात फडणवीस सरकार होते. त्यांच्याच सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता, सुप्रीम कोर्टाने त्यावर ताशेरे ओढले. फडणवीस सरकरला अधिकार नसतानाही त्यांनी गायकवाड आयोग नेमला होता.

भाजपा आरक्षणाच्या नावाखाली मराठा समाजाची दिशाभूल करून कुणबी व मराठ्यांमध्ये भांडण लावण्याचे काम करत आहेत. भाजपाच्या या कुटनितीला मराठा व कुणबी समाज ओळखून आहे, समाज जागरुक आहे. तसेच भाजपाच्या कथनी व करनीला ओळखून आहेत. केवळ आपली राजकीय पोळी भाजपण्याचे काम भाजपा करत आहे असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *