Breaking News

शरद पवार यांचा मोदींवर हल्लाबोल, गरज शेतकऱ्यांची… कर्जमाफी मात्र उद्योजकांची

देशातील लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर होण्यास आता काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. मात्र भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मुख्य विषयावरून लक्ष हटविण्यासाठी भलत्याच प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करत देशातील शेतकरी आजही कर्जबाजारी आहे. शेतकऱ्याला कर्जबाजारीपणातून मुक्त करण्याची गरज आहे. या विषयांवर आम्ही संसदेत आवाज उठवित असताना मात्र केंद्र सरकारने शेतकऱ्यांएवजी देशातील जे उद्योगपती आहेत त्यांचे १ लाख ३ हजार कोटी रूपयांचे कर्ज माफ केल्याचा आरोप करत देशातील उद्योपतींची संख्या १ हजाराच्या आत आहे. तर शेतकरी मात्र झगडत आहे. त्यांच्या दुखण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन या सरकारचा नसल्याचे सांगत या सरकारला बाजूला सरकविण्याची वेळ आल्याच आवाहन केले.

शरद पवार पुढे म्हणाले की, कर्नाटकच्या जनतेने हा निकाल घेतला, सबंध देशाच्या अन्य राज्यांसमोर एक त्यांनी आदर्श केला, त्यामुळे साहजिकच आहे, आज कर्नाटकच्या जनतेचा हा निर्णय देशातल्या अन्य विरोधी पक्षांच्या मनामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास वाढवणारा आहे. आम्ही लोकांनी आता एक नवी संघटना उभी केली आहे, ज्याचे इंडिया असे नाव आहे. या संघटनेमध्ये कर्नाटक, बिहार, बंगाल, झारखंड, दिल्ली, पंजाब व केरळ अशा अनेक राज्यांचे मुख्यमंत्री व अनेक पक्षांचे नेते आहेत. आम्ही एकच विचार करत आहोत की, सामान्य माणसाच्या हितासाठी राजकारण कसे करता येईल ? सरकारी धोरणे कसे आखता येतील ? त्यासाठी जे काही करता येईल ते करण्यासाठी आज त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केलेला आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, इंडियाच्या वतीने जी सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करणाऱ्या धोरणांना तुम्हा सर्वांचा पाठिंबा मिळण्याची आवश्यकता आहे. हे सगळे प्रश्न आज खूप महत्वाचे आहेत, पण आजचे केंद्र सरकार या प्रश्नांऐवजी दुसऱ्या धार्मिक प्रश्नांवर लोकांचे मन वळवण्याचे प्रयत्न करत आहे असा आरोपही केला.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, अयोध्यातील मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्याबद्दल देशातील सर्व लोकांना आदर आहे, त्यांचा कोणी अनादर करत नाही. त्यांच्याबद्दलच्या आदराच्या भावना या देशातल्या कोट्यावधी लोकांच्या मनात आहेत, देशाबाहेरचे सुद्धा जे भारतीय आहेत त्यांच्याही मनामध्ये आहे, पण आज लोकांचे प्रश्न हे बाजूला ठेवायचे. मंदिर त्या ठिकाणी उभे करायला कोणाचेही विरोध नाही. खरे सांगायचे म्हणजे या मंदिराचा इतिहास जर बघितला तर, तो मंदिर बाबरी मस्जिद पाडल्यानंतर बांधण्याचा ज्यावेळी विचार झाला त्यावेळेला त्याची परवानगी ही राजीव गांधी पंतप्रधान असताना झाली. त्याला शिला न्यास हा जो झाला तो राजीव गांधींच्या कालखंडामध्ये झाला. नंतरच्या काळामध्ये काही लोक कोर्टामध्ये गेले आणि कोर्टात ती केस अनेक वर्षे चालली, अलीकडेच त्या केसचा निकाल लागला व मंदिर बांधण्यासाठी कोर्टाने मान्यता दिली आणि त्याचे काम सुरू करण्याचा विचार आज या ठिकाणी आलेला आहे. ही पार्श्वभूमी असताना हे मंदिर व्हावं यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक जे काही योगदान देता येईल ते देण्याचे काम करतात, पण त्या रामभक्तांचा विचार राहिला बाजूला आणि रामाच्या नावावर राजकारण करण्याचे काम आज या ठिकाणी भाजपा आणि आरएसएस यांनी सुरुवात केलेली आहे, ही गोष्ट आपण गांभीर्याने घेतली पाहिजे असा इशाराही दिला.

पंतप्रधान मोदी १० दिवस उपवास करणार, गरिबी हटावचा कार्यक्रम घेतला असतं तर….

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले, आज धर्माच्या नावावर, मंदिराच्या नावावर समाजा- समाजामध्ये एक प्रकारचे अंतर कसे निर्माण करता येईल ? हा राज्यकर्त्यांचा दृष्टिकोन आहे. राज्यकर्ते या देशातला जो उपाशी शेतकरी आहे, मजूर आहे, कष्टकरी आहे त्यांच्यासाठी प्रयत्न करत नाहीत. काल देशाच्या पंतप्रधान यांनी सांगितलं की, मी रामासाठी १० दिवस उपवास करणार आहे. त्यांच्या रामाबद्दलच्या श्रद्धेचे मी आदर करतो, पण या देशातली गरिबी हटवण्यासाठी असाच काही कार्यक्रम घ्यावा हे त्यांनी सांगितलं असतं, तर लोकांनी त्यांचे कौतुक केले असते, पण या सर्व गोष्टी व मूलभूत प्रश्नांकडून लक्ष विचलित करून धार्मिक प्रश्नांवर काम या देशात सुरू झाले आहे, म्हणून आपल्याला जागरूक व एक राहावे लागेल आणि हे प्रश्न सोडविण्याची खबरदारी घेतली पाहिजे. मला आनंद आहे की, या ठिकाणी पराभव झाल्यानंतर सुद्धा उत्तमरावांनी आपले काम, जनतेची सेवा ही चालू ठेवलेली आहे असे सांगत उत्तमरावांचे कौतुकही केले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, मी राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, विधान परिषद याच्या एकूण १४ निवडणुका लढलो व त्या सर्व जिंकलो, पण एका निवडणुकीत माझा पराभव झाला व ती निवडणूक वेगळी होती म्हणजेच क्रिकेटची. क्रिकेटच्या निवडणुकीमध्ये मी मुंबईचा अध्यक्ष होतो आणि त्यानंतर ऑल इंडिया BCCI आहे त्याचा अध्यक्ष मी झालो, त्यानंतर मी आशिया खंडाचा अध्यक्ष झालो आणि त्या ठिकाणी एका निवडणुकीमध्ये माझा पराभव कलकत्त्याच्या एका माणसाने केला. माझ्या डोक्यात ती बाब होती, पण नाउमेद व्हायचे नाही हे संस्कार होते आणि ते ठरल्यानंतर BCCI चा अध्यक्ष झालोच, पण आशिया खंडातील क्रिकेटचा अध्यक्ष झालो आणि एक दिवशी जगातील क्रिकेट संघटना जी आहे त्याचा मी अध्यक्ष झालो. सांगायचं तात्पर्य असं, धीर सोडायचा नाही, काम सोडायचे नाही, लोकांची आणि विषयाची बांधिलकी ही सोडायची नाही, अखंड कष्ट करायचे, यश आपले असते, लोक त्याची नोंद घेतात असे सांगत भाजपाला गर्भित इशाराही दिला.

Check Also

पंतप्रधान मोदी यांच्या सातारा आणि सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जयराम रमेश यांचे प्रश्न

महाराष्ट्रातील पहिल्या दोन टप्प्यात लोकसभा निवडणूकीसाठी मतदान पार पडल्यानंतर पुढील महिन्याच्या ७ मे रोजी तिसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *