Breaking News

भाजपाच्या वक्तव्यावर संजय राऊत यांचा उपरोधिक टोला, आधी तुमचा पक्ष शिल्लक….

आगामी लोकसभा निवडणूकांचे वारे सध्या देशात जोरात वाहु लागले आहे. त्यातच भाजपाकडून ४०० पारचा नारा दिला आहे. यापार्श्वभूमीवर नुकतेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांना आवाहन करत जिल्हास्तरावरील छोटे पदाधिकारी- पक्षांना भाजपात सामावून घेत संपवून टाका. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आवाहनावर शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी उपरोधिक टोला लगावत खोचक टीका केली.

संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, आगामी निवडणूका जिंकण्यासाठी भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा आणि त्यांच्या पक्षाला दुसऱ्यांचे पक्ष फोडावे लागत आहेत. तसेच लहान सहान पक्षांना सोबत घेत पुन्हा एकदा त्यांना एनडीएची उभारणी करावी लागत आहे. तुम्ही कितीही म्हणालात याला संपवू त्याला संपवू तरी हे शक्य होणार नाही. कारण देशात अद्याप लोकशाही आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना सांगा २०२४ नंतर तुमचा पक्ष शिल्लक राहतोय का बघा सगळा भाजपा काँग्रेसमय झालाय असा उपरोधिक टोला लगावत तुमच्या पक्षात आलेल्यांनी किंवा आमच्या सारख्यांनी तिकडे गेलेल्यांनी जर ठरवलं तर एका रात्रीत तुमचा पक्ष नामशेष होईल. त्यांनी ठरवलं भाजपा सोडायचीच तर तुमचं अस्तित्व संपेल. तुमच्या ३३० खासदारांपैकी ११० खासदार हे मुळ भाजपाचे आहेत आणि बाकिचे आलेले काँग्रेस आणि इतर पक्षातून आलेले आहेत. त्यामुळे देश भाजपामुक्त होईल हे कदाचीत बावनकुळे यांना माहित नसावं अशी टीकाही केली.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, भाजपावाल्यांना त्यांचा पक्ष टिकविण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या पक्षातील प्रमुख नेत्यांची गरज भासते. मग इतके वर्षे काय करत बसला होतात? असा सवाल करत ही तुमची ताकद परावलंबी आहे. लहान पक्ष संपवू ही तुमची भूमिका हुकूमशाहीकडे नेणारी आहे. लहान पक्षांना संपवणं, मोठ्या पक्षांना फोडणं ही बावनकुळे छाप भाजपा नेत्यांची एक भूमिका आहे. ही भूमिका देशाला घातक असल्याचे टीकास्त्रही यावेळी भाजपावर सोडले.

संजय राऊत पुढे म्हणाले की, आगामी निवडणूकीत कोण कोणाला गाडतेय हे लवकरच समजेल. देशातील जनता लोकशाही मार्गाने कोणाला मैदानात गाडतेय आणि कोणाला ठेवतेय हे लवकरच कळेल. पण आताची भाजपा लालकृष्ण अडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांची नाही तर अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्या विचारांची आहे. त्यामुळेच आम्ही समविचारी पक्ष त्या विचाराच्या विरोधात एकत्र आल्याचेही सांगितले.

प्रकाश आंबेडकर यांच्या मागणीवर संजय राऊत म्हणाले….

प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख तिन्ही पक्षांनी जागा वाटपासंदर्भात पहिल्यांदा चर्चा करावी आणि त्यानंतर आम्ही प्रत्येक पक्षाशी स्वतंत्र चर्चा करून जागा मागू अशी मागणी केल्याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता संजय राऊत म्हणाले, जगाच्या इतिहासात अशा पध्दतीने कधी जागा वाटप झाले नाही. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या इच्छेनुसार त्यांना महाविकास आघाडीत समाविष्ट करण्यात आलेले आहे. तसेच २७ तारखेच्या बैठकीला त्यांना निमंत्रितही करण्यात आले आहे. ते येथील अशी आशाही यावेळी व्यक्त केली.

तसेच संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, सध्या आम्ही सर्वजण लोकशाही वाचविण्यासाठी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना वाचविण्यासाठी एकत्र आलो आहोत. तसेच या गोष्टींची सर्वाधिक जाणीव प्रकाश आंबेडकर यांना आहे. त्यामुळे राज्यघटना वाचविणं आमच्या इतकीच जबाबदारी त्यांचीही आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी म्हणून बाहेर काही वेगळी भूमिका मांडत असतील तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु ते मायावती यांच्या मार्गाने जाणार नाहीत अशी आशाही यावेळी व्यक्त केली.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *