Breaking News

मनोज जरांगे पाटील यांच्या खळबजनक आरोपावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

राज्यात आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पुढील महिन्यापासून निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच उद्या सोमवार २६ फेब्रुवारीपासून राज्याचे अंतरिम अर्थसंकल्पिय अधिवेशनही सुरु होणार आहे. त्यातच राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीवरून जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे आंदोलन करत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपला बळी घेण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप केला. यावरून राज्याच्या राजकारणात एकच गदारोळ निर्माण झाला. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अगदी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली.

मागील दोन तीन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मराठा आऱक्षणाच्या मागणीवरून त्यांचे सहकारी अरूण बावसकर यांनी वेगळी चूल मांडली. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्यावर सातत्याने आरोपही करत आहेत. त्यातच संगीता वानखेडे यांनीही पुढे येत मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले. अरूण बावसकर आणि संगीता वानखेडे यांनी केलेल्या आरोपांना मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरावली सराटी येथे पत्रकार परिषद घेत उत्तरेही दिली. परंतु या आरोप करणाऱ्यांमागे आणि औषधोपचाराच्या माध्यमातून माझा बळी घेण्याचा डाव देवेंद्र फडणवीस यांचा असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

तसेच मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करताना पुढे म्हणाले की, राज्यात मराठ्यांशिवाय पान हलत नसल्याने भाजपातील विनोद तावडे, एकनाथ खडसे आणि काँग्रेसमधील अशोक चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांना जेलची भीती दाखवित भाजपामध्ये नेले. त्यात धर्तीवर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मला फोडण्याचे अनेक प्रयत्न केले. पण मी फुटत नसल्याने आता मला संपविण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच पोलिस लाठी हल्ल्यात माझा बळी देण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर जालन्याला देशाचे गृहमंत्री अमित शाह येणार होते. परंतु मी त्यांना येऊ दिले नसल्याने माझा बळी घेण्याचा डाव आखला आहे असा आरोप केला.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, जर माझा बळी हवाच असेल तर मी सागर बंगल्यावर येतो एकतर तुम्ही माझा बळी घ्या नाहीतर मी तरी तुमचा घेतो असे आव्हान देत येत्या निवडणूकीत तुमचा सुफडा साफ झालाच म्हणून समजा असा गर्भित इशाराही दिला.

याबाबत सध्या सातारा दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपावर बोलताना म्हणाले की, मला माहित नाही ते काय बोललेत ते. पुन्हा एकदा प्रश्न केला असता देवेंद्र फडणवीस पुन्हा म्हणाले, अरे खरेच मला माहित नाही काय बोललेत ते. मी त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर बोलेन असे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *