Breaking News

पंतप्रधान मोदींचा सलग २ऱ्या दिवशी काँग्रेसवर हल्ला, “…तर हे झालं नसतं” राज्यसभेतील चर्चेला मोदींचे उत्तर

मराठी ई-बातम्या टीम

अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या संयुक्त सभागृहासमोर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण झाले. संसदेच्या दोन्ही सभागृहात यावर चर्चा झाली. लोकसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना देशात कोरोनाचा प्रसार हा महाराष्ट्र काँग्रेसमुळे झाल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर आज राज्यसभेतील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधानांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधत देशाच्या डोक्यावर आणीबाणीचा कलंक काँग्रेसमुळे असल्याचे सांगत दिल्लीत शिखांचे शिरकाण झाले ते काँग्रेसमुळे त्यामुळे महात्मा गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे काँग्रेसचे विसर्जन झाले असते तर हे सगळं झालं नसतं अशी टीका केली.
काँग्रेस जर नसती तर ही लोकशाही घराणेशाही पासून मुक्त राहिली असती. हा देश विदेशी ऐवजी स्वदेशीच्या संकल्पावर चालला असता, आणीबाणीचा कलंक लागला नसता, देशात जातीयवाद राहिला नसता, शिख लोकांचे हत्याकांड झाले नसते, तिथे दहशतवाद नसता, काँग्रेस जर नसती तर पंडितांना काश्मीर सोडावं लागले नसते. काँग्रेस जर नसती तर सर्वसामान्य माणसांना मुलभूत सोईसुविधांसाठी वाट पहावी लागली नसती अशी उपरोधिक टीका त्यांनी केली.

काँग्रेसने घराणेशाहीच्या पुढे कधी विचार केला नाही. देशाला सर्वात मोठा धोका हा घराणेशाही असलेल्या पक्षांपासून आहे. पक्षात जेव्हा एक कुटुंब प्रभावशाली बनते तेव्हा सर्वात पहिलं गुणवत्तेला लक्ष्य केले जाते. सर्व पक्षांनी त्यांच्या त्यांच्या पक्षात लोकशाही अंमलात आणली पाहिजे असे आवाहन करत काँग्रेसने याचा सर्वात आधी याचा विचार केला पाहिजे अशी टीका त्यांनी काँग्रेसवर केली.

यांचा विचार म्हणजे इंडिया इज इंदिरा आणि इंदिरा इज इंडिया हाच यांचा विचार असल्याचे सांगत संसदेच्या इतिहासात पहिल्यादाच एका पंतप्रधानाने दुसऱ्या पंतप्रधानांचे नाव घेवून टीका केल्याचा नवा पायंडा पंतप्रधान मोदी यांनी पाडला.

मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो तेव्हा माझ्यावर किती अन्याय झाला, गुजरातवर पण झाला. गुजरातमध्ये मी नेहमी म्हणायचो देशाच्या विकासासाठी गुजरातचा विकास करा. काँग्रेस तर याआधी साध्या साध्या गोष्टींमुळे मुख्यमंत्र्यांना हटवत होते. काँग्रेसने आत्तापर्यंत जवळपास १०० वेळा निवडुन आलेल्या विविध राज्य सरकारला फेकून दिलं होतं, तेव्हा तुम्ही कोणत्या तोंडाने लोकशाहीबद्दल बोलत आहेत. एका पंतप्रधानांनी ५० राज्य सरकारला फेकून दिले. याचे उत्तर जनतेला द्यावे लागेल. आज त्याची ते शिक्षा ते भोगत आहेत. काँग्रेसच्या सत्तेच्या नशेमुळे आज तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये कटुता आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

वास्तविक पाहता संसदेत विरोधकांनी पंतप्रधान यांना देशाच्या प्रश्नावरून किंवा अन्य कारणावरून कितीही लक्ष केले तरी पंतप्रधान पदावरील व्यक्तीकडून कधीही कलुषित पध्दतीची आणि आधीच्या पंतप्रधानांचा उपमर्द होईल अशी टीका कधीच कोणी केली नाही ना तसा प्रयत्न केला. तशी अलिखित परंपरा आता पर्यतच्या सर्व स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह पाळली. परंतु नरेंद्र मोदी यांनी या परंपरेला धुडकावून लावत पहिल्यांदाच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नाव घेवून टीका केली.

Check Also

संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्त्ये एकमेकांसमोर

लोकसभा निवडणूकीच्या चवथ्या टप्प्यासाठी १३ मे ला मतदान होत आहे. महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघातही मतदान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *