Breaking News

महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेल्या एअरबस प्रकल्पाचे मोदींच्या हस्ते भूमिपूजन

महाराष्ट्रातून गुजरात येथे नेण्यात आलेल्या टाटा-एअर बस सी-२९५ या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं आहे. गुजरातमधील बडोदा येथे हे भूमिपूजन करण्यात आलं. एअरबस- टाटा यांचा हवाई दलासाठी विमाननिर्मितीचा सुमारे २२ हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर राज्यात सध्या वाद निर्माण झाला आहे. हा प्रकल्प नागपूरमधील मिहानमध्ये सुरू व्हावा, हा शिंदे-फडणवीस सरकारचा प्रयत्न असफल ठरला.

भुमीपूजनावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी लवकरच भारतात ‘मेड इन इंडिया’ प्रवासी विमानं दिसतील असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, बडोदा येथे उत्पादित होणारी ही विमानं फक्त लष्करालाच सामर्थ्य देणार नाहीत, तर विमान निर्मितीची एक नवी परिसंस्था विकसित करेल. भारतात लवकरच ‘मेड इन इंडिया’ टॅग असणारी विमानं दिसतील.

विमान क्षेत्रात भारत वेगाने विकास करत आहे. हवाई वाहतुकीच्या बाबतीत आपण लवकरच पहिल्या तीन देशांमध्ये येणार आहोत. आगामी १० ते १५ वर्षांत आपल्याला २ हजार प्रवासी आणि वाहतूक विमानांची गरज लागणार आहे. यावरुनच आपण किती वेगाने विकास करत आहोत हे दिसत आहे असेही ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले, बदलती विचारसरणी विकासाचं एक महत्त्वाचं कारण आहे. गेली काही वर्षं फक्त सरकारलाच सगळं माहिती असून, त्यांनीच सर्व केलं पाहिजे अशा विचाराने काम होत होतं. या विचारामुळे देशातील प्रतिभा पुढे येत नव्हती आणि खासगी क्षेत्रही विकसित होत नव्हती. गेल्या आठ वर्षांत आम्ही कुशल विकासावर लक्ष केंद्रीत केलं असून, तसं वातावरण तयार केलं आहे. या सर्व बदलांमुळेच देशातील उत्पादन क्षेत्रातील विकासाचा प्रवास इथपर्यंत पोहोचला असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय हवाई दलासाठी सी-२९५ मालवाहू विमानांच्या निर्मितीसाठीचा २२ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातमधील बडोदा येथे उभारण्यात येईल, अशी घोषणा संरक्षण सचिव अजयकुमार यांनी गुरुवारी नवी दिल्लीत केली होती. ‘या प्रकल्पातून भारतीय हवाई दलासाठी विमानांची निर्मिती होईल. तसेच तेथे तयार झालेल्या विमानांची निर्यातही होणार आहे. यामुळे भारतीय विमाननिर्मिती क्षेत्राला चालना मिळणार आहे असेही सचिवांनी सांगितले.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारताने एअरबस कंपनीशी २१ हजार कोटींचा करार केला होता. त्याअंतर्गत जुन्या अ‍ॅवरो-७४८ विमानांची जागा सी-२९५ ही अत्याधुनिक विमाने घेणार आहेत. बडोद्यातील हा प्रकल्प २१,९३५ कोटी रुपयांचा असून येथे तयार होणारी विमाने प्रवासी वाहतुकीसाठीही वापरली जाऊ शकतात. विमानाच्या ९६ टक्के भागांची निर्मिती भारतात होणार आहे. सी-२९५ विमानांचा पहिला ताफा (१६ विमाने) सप्टेंबर २०२३ ते ऑगस्ट २०२५ या काळात स्पेनच्या सेविले येथील कारखान्यातून मिळणार आहे. उर्वरित ४० विमाने ही टाटा अ‍ॅडव्हान्स सिस्टीम्स या कंपनीच्या भागीदारीतून भारतात तयार केली जातील. भारतात बनलेले पहिले विमान सप्टेंबर २०२६मध्ये वायूदलाच्या ताफ्यात येईल. युरोपच्या बाहेर सी-२९५चे उत्पादन होण्याचीदेखील ही पहिलीच वेळ आहे.

Check Also

संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्त्ये एकमेकांसमोर

लोकसभा निवडणूकीच्या चवथ्या टप्प्यासाठी १३ मे ला मतदान होत आहे. महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघातही मतदान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *