Breaking News

प्रकाश आंबेडकर यांचा मोदींना इशारा, आम्ही १५० च्या वर जाऊ देणार नाही

राजकीय दृष्टिकोनातून आज आपण पाहिलं की, जो ओबीसी, धनगर, साळी, माळी, लोहार, सोनार इत्यादी जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे जागृत झाला. त्याच्या हक्काची आणि अधिकाराची त्याला जाणीव झाली. आज तो स्वतःच्या अधिकारांची सुरक्षा करायला निघाला आहे. म्हणून महाविकास आघाडीला सांगितलं की, जर आपली युती झाली, तर त्यामध्ये किमान १५ उमेदवार हे ओबीसींचे असले पाहिजेत, असे स्पष्टीकरण वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी रामटेक येथील बहुजन सत्ताधिकार सभेत बोलताना केले.

लोकसभेच्या निवडणुकीबाबत आणि युतीबाबत चर्चा सुरू आहे. असे असताना याबाबत उलटसुलट बातम्या यायला लागल्या आहेत. या सगळ्या बातम्या खऱ्या आहेत असे मी मानत नसल्याचे असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, फुले शाहू आंबेडकरी समुहामधला शिकलेला वर्ग आहे, त्याच्यावर मोठी जबाबदारी आली आहे. आरक्षणाचा तो लाभार्थी आहे, आरक्षणातला तो हुशार आहे म्हणून त्याला नोकरी लागली. हा जो लाभार्थी आहे त्याने आता संविधान वाचवण्यासाठी सज्ज झालं पाहिजे असे सांगत फुले -शाहू -आंबेडकर समूहाला माझे आवाहन आहे की, एकास पाच म्हणजे आपले स्वतःचे मत आणि आपल्याला जो मत देत नव्हता, अशी पाच मते आपण घेतली पाहिजेत. आरक्षणवादी, मानवतावादी, लोकशाहीवादी असणाऱ्यांची मते आपण घेतली पाहिजे. अशी पाच मते प्रत्येक आंबेडकरवाद्यांनी गोळा केली, तर विजय आपला आहे असे विजयाचे सूत्र सांगून त्यांनी जनतेमध्ये विश्वासही निर्माण केला.

प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले, संविधानाचं राज्य म्हणजे संताचे राज्य आहे. आरएसएस आणि भाजपला मनुवाद्यांचे आणि वैदिक धर्माचे राज्य आणायचे आहे हे लक्षात घ्या. ही लढाई मनुवादी विरुद्ध फुले- शाहू – आंबेडकरवादी अशी आहे हे लक्षात घ्या. महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांना जाऊन १५० वर्षे होऊन गेली. चार पिढ्या गेल्या. तरीही आपण पाहतो की, महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांना आजही शिव्यांची लाखोली वाहिली जाते. कारण, ते आधुनिक काळाच्या बदलाचे जनक आहेत, त्यांनी मनुवादी व्यवस्थेला आग लावली आणि बाबासाहेबांनी त्या मनुस्मृतीला जाळून टाकली.ती मनुस्मृती पुन्हा आणायची नसेल, तर सर्वांच्या बरोबरीने किंवा स्वतःहून हा लढा पुन्हा आपल्याला उभा करावा लागेल.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, इथल्या विरोधी पक्षाची बोलण्याची हिम्मत नाही, ताकद नाही. त्यालाही भीती वाटते की, आपल्यामागे ईडी लागेल काय ? ज्याच्यावर धाडी घातल्या जात आहेत, तो व्यापारी असेल, राजकीय नेता असेल किंवा कारखानदार असेल.अशाच नेत्यांवर धाडी घातल्या जातात, जे संविधानाला मानतात. मानवतेला मानतात आणि निधर्मी पक्षाला मानतात. त्यामुळे ही विचारांची सुद्धा लढाई सुरू झालेली आहे, हे ध्यानात घ्या असे सांगितले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, फुले-शाहू -आंबेडकरी विचारांचे राज्य राहणार की, मनुस्मृतीचे राज्य राहणार याचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. पुन्हा मनुस्मृतीचे राज्य आले, तर याचा पहिला बळी हा आरक्षणवादी आणि आरक्षणाचा लाभार्थी होणार आहे हे लक्षात घ्या. तेव्हा, स्वतःच्या सुरक्षिततेसाठी या लाभार्थ्यांनी कंबर कसली पाहिजे, असेही आवाहन केले.

भाजपा १५० च्या वर जाणार नाही

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, २०२४ नंतर निवडणुका होणार नाहीत, असेही म्हटले जाते. आरएसएस- भाजपाचे सरकार पुन्हा आले तर ते निवडणुका घेणार नाहीत. पंतप्रधान म्हणत आहेत की, आम्ही ४०० च्या वर जागा घेणार. पण आम्ही म्हणतो की, आम्ही तुम्हाला १५० च्या वर जाऊ देणार नाही. हे आम्ही मतदारांच्या जोरावर म्हणत असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.

मोदींचा घेतला खरपूस समाचार

प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, ज्यांची चौकशी सुरू आहे, ते मोदींच्या विरोधात बोलत नाहीत. त्यांची हिंमत नाही. आरएसएस भाजपा म्हणतेय की, हे हिंदूंचे राज्य आहे. तसा प्रचारही केला जात आहे. अखलाखचा खून करून तसे चित्रणही केले. राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना हेच मोदी सरकार उत्तर देते की, या देशात २४ लाख कुटुंबे जे हिंदू आहेत, ज्यांची मालमत्ता ५० कोटींच्या आसपास आहे. ते भारताचे नागरिकत्व सोडून परदेशात गेल्याची माहिती देत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राम मंदिराचे उद्घाटन करताना शंकराचार्यांनी मोदींना जो सल्ला दिला की, अरे बाबा या महिन्यात एकही शुभ दिवस नाही. पुढच्या महिन्यात उद्घाटन करू. मोदी जर खरेच धार्मिक असते, तर हा सल्ला त्यांनी मानला असता, अशी टीकाही केली.

Check Also

शरद पवार यांचा टोला, नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हे तर आठवडा मंत्री

सध्या मे महिना सुरु असतानाच बाहेरील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *