मागील अनेक महिन्यांपासून इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन देशात युध्द सुरु आहे. मात्र या दोन देशांमध्ये फक्त युध्द असल्याचे समजून कोणीही शांत राहू नये. परंतु हे युध्द सुरु राहिल्याने अनेक चुकीची माहिती पसरत असून या दोन देशातील युध्द थांबविण्यासाठी केंद्रातील भारत सरकारने पुढाकार घेऊन आपला आंतरराष्ट्रीय प्रभाव वापरून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड प्रकाश आंबेडकर यांनी केली.
तसेच वंचित बहुजन आघाडीच्यावतीने ८ डिसेंबर रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर इस्राईल – पॅलेस्टाईन येथे सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शांती सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
प्रकाश आंबेडकर यांनी म्हणाले की, आपण आंतरराष्ट्रीय राजकारण करत आहोत, त्यामुळे केंद्र शासनाने पॅलेस्टाईन- इस्राईल बाबत शांततेची भूमिका घेतली पाहिजे. गाझावरील इस्रायलच्या युद्धाबद्दल भारताने ताबडतोब आणि निःसंदिग्धपणे चिंता व्यक्त करावी, पॅलेस्टिनी लोकांसाठी एकता व्यक्त करावी आणि कायमस्वरूपी युद्धबंदीचे आवाहन करावे, ही माझी विनंती आणि मत असल्याचे स्पष्टपणे सांगितले.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, युद्धाच्या आक्रमकतेने गाझा पट्टीमध्ये राहणा-या पॅलेस्टाईनच्या लोकांनी सहन केलेला सर्वात घातक काळ बनवला आहे. गाझावरील प्राणघातक बॉम्ब फेकीच्या ५० दिवसांत १०,००० महिला आणि मुलांसह सुमारे १५,००० लोक मारले गेले आहेत. बॉम्बस्फोटांमुळे हजारो लोक विस्थापित झाले आहेत आणि पाणी, अन्न, औषध, इंधन आणि वीज पुरवठा प्रतिबंधित करण्यात आला आहे. पॅलेस्टाईनच्या जनतेला सामूहिक शिक्षा झालेल्या या हत्याकांडाचे कोणतेही समर्थन होऊ शकत नाही, असेही सांगितले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षात यथास्थिती राखणे हा एक आव्हानात्मक प्रयत्न आहे, पॅलेस्टिनी हक्क आणि कारणांना पाठिंबा देण्यासाठी सक्रिय भूमिका बजावण्याची भारताची प्रदीर्घ परंपरा आहे असे सांगत आंबेडकरांनी इतिहासाचा दाखला देखील दिला. जागतिक दक्षिणेचा नेता म्हणून भारत दोन राष्ट्रांच्या समाधानावर आधारित शांततापूर्ण ठरावाला चालना देऊन, शांतता आणि सुरक्षिततेत शेजारी राहून महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, ज्याचा भारताने वारंवार पुनरुच्चार केला असल्याची आठवणही यावेळी करून दिली.
प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, भारताने आपले राजनैतिक प्रयत्न सुरू ठेवावे आणि इस्रायल आणि पॅलेस्टाईन दोघांनाही वाटाघाटीच्या टेबलावर परत येण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आपला आंतरराष्ट्रीय प्रभाव वापरावा. भारताने मध्यस्थ म्हणून काम करणे सुरू ठेवले पाहिजे आणि पॅलेस्टिनी लोकांना तात्काळ गरजा पूर्ण करण्यासाठी आणि संघर्ष-प्रभावित भागातील दुःख कमी करण्यासाठी मानवतावादी सहाय्य प्रदान केले पाहिजे, असा सल्लाही केंद्र सरकारला दिला.
तसेच यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ही शांती सभा ना इस्त्रायलच्या बाजूने आहे ना पॅलेस्टीनी देशासाठी आहे. फक्त दोन देश रहावेत या भूमिकेतून ही सभा आयोजित करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यामुळे परवानगी देण्याची मान्य केले असून ही राजकिय सभा नव्हे तर सर्वधर्मियांची सभा असल्याचेही यावेळी नमूद केले.