राज्यातील राष्ट्रीय आणि प्रादेशिकस्तरावरील राजकिय पक्षांसोबतच्या आघाडीत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर कधी अडकून नाहीत. परंतु प्रत्येक निवडणूकीत त्यांनी नेहमीच स्वतःचे अस्तित्व दाखवून दिल्याचे दिसून आले आहे. काल संध्याकाळी नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील लोकसभा मतदारसंघातील जाहिर सभेत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आणि महाविकास आघाडी यांच्यात मतभेद निर्माण झाल्याच्या बातम्या खोट्या असल्याचे आपण मानतो, असे सांगत महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात कोणतेही मतभेद नसल्याचे अप्रत्यक्ष जाहिर केले. त्यास २४ तासांचा कालावधी उलटून जात नाही तोच प्रकाश आंबेडकर यांनी मविआच्या बैठकांना जाऊ नका असे जाहिर केल्याने राजकिय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
२०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीने औवेसी यांच्या एमआयएम पक्षाशी आघाडी केली. परंतु एमआयएमबरोबरील युतीचा फायदा एमआयएमला होत त्यांचा एक खासदारही निवडूण आला. परंतु वंचित बहुजन आघाडीला मात्र मतांची टक्केवारी वाढली. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास १५ ते १६ जागा पाडण्यात वंचितला यश आले. मात्र भाजपाच्या लोकप्रियतेचा उधळलेला वारू रोखण्यात मात्र यश आले नाही. त्यामुळे वंचितच्या राजकिय ताकदीचा अंदाज पहिल्यांदा आला तो मुळी राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाला. त्यावेळी प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यात असलेले एक छुपे कोल्डवॉर. तरीही वंचितच्या वाढलेल्या ताकदीचा अंदाज शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी अभेद्य राहिलेल्या राष्ट्रवादीला आला. परंतु नंतरच्या कालावधीत राज्यातील राजकारणाच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले.
या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीकडे असलेली राजकिय आणि सामाजिकदृष्ट्या वंचित राहिलेली मते अद्यापही एकगठ्ठा आहेत. तर दुसऱ्याबाजूला ओबीसी, मुस्लिम आणि काही प्रमाणात दलितांची काठावर असलेली मते काही प्रमाणात राष्ट्रवादीकडे, काही प्रमाणात शिवसेना उबाठा गटाकडे तर उरलेली सर्व ओबीसी आणि उच्चवर्णीय हिंदूत्ववादी मते भाजपाकडे आहेत.
परंतु मागील काही वर्षात स्त्रियांच्या मतांची टक्केवारीही मोठ्याप्रमाणावर वाढलेली आहे. परंतु महाराष्ट्रातील स्त्रियांची मते स्वतंत्ररित्या राजकिय पक्षांना न पडता ती एकगठ्ठा पध्दतीने अर्थात पुरुषसत्ताक पध्दतीचा पुरस्कार करणाऱ्या राजकिय पक्षांकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सध्याच्या प्रस्तापित राजकारणात स्त्रियांची मते ही पूर्ण विचारांती न पडता ती अपुऱ्या विचारांती पडत असल्याचे दिसून येत आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत अजूनपर्यंत युती पूर्ण झालेली नाहीये.
तेव्हा इतर पक्षांकडून पक्ष बैठक किंवा कार्यक्रमाला बोलावत असतील तर त्या बैठकी, कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू नये.
ॲड. प्रकाश आंबेडकर व पक्षाच्या… pic.twitter.com/6Y8jrM9qgp
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) March 2, 2024
त्यातच राष्ट्रवादीतील अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील आणि शिवसेनेतील विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या आमदार-खासदारांसोबतच जिल्हा आणि शहर कार्यकारणीतील प्रमुख कार्यकर्त्यांचा संच या आधारे परंपरागत मतदार हा ही त्यांच्यासोबत गेल्याचे म्हणणे अगदी चुकीचे ठरेल. मात्र पक्षातील फुटीनंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे ज्या पक्षाच्या सोबत गेले आहेत त्या पक्षाची राजकिय भूमिका सध्या समाजातील अनेकस्तरावर अडचणीची ठरत आहे. त्यामुळे सुरवातीला या दोन्ही नेत्यांच्या सोबत राहिलेला मतदार हा त्यांच्या सत्तेतील स्थानावर नाहीतर त्यांच्या राजकिय निर्णय प्रक्रियेतील सहभागावर मतदार विचार करणार आहे.
या अनुषंगाने प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला दिलेल्या प्रस्तावामुळे नव्याने काही प्रस्थापित पक्षांच्या राजकिय खेळींना अटकाव निर्माण होत आहे. त्यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ज्या दलित नेत्यांच्या राजकिय पक्षाशी युती केली त्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांनाच सोबत खेचून घ्यायचे आणि नंतर नेत्यांनाही खेचायचे या धोरणात अद्याप बदल केला नसल्याचे दिसून येत नाही. त्यामुळेच प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील पक्षकार्यकर्त्यांना चुचकारण्याचे प्रयत्न शिवसेना आणि राष्ट्रवादी गटाकडून सुरु असल्याचे दिसून येत असल्यानेच कदाचीत पुढील सूचना येईपर्यंत वंचितच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या बैठकांना आणि पक्षाच्या कार्यक्रमाला जाऊ नये असे जाहिरपणे प्रकाश आंबेडकर यांनी जाणीवपूर्वक सांगितले.
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मागील दोन दिवसात राज्यातील भाजपाच्या नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याची दखल घेणेही क्रमप्राप्त ठरत आहे. काल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की प्रकाश आंबेडकर महायुतीसोबत येतील असे वाटत नाही. तर आज सकाळपासून सुधीर मुनगंटीवार आणि शिंदे गटाचे मंत्री दिपक केसरकर यांनी महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा योग्य प्रमाणे सन्मान ठेवला जात नसल्याचे वक्तव्य करणे याविषयीचा संबध कुठेतरी असेल अशी चर्चाही राजकिय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.