Breaking News

उध्दव ठाकरे म्हणाले, हातातला आसूड सरकारला घाम फोडण्यासाठी वापरा औरंगाबादेतील दहेगाव, पेंढापूर येथील शेतकऱ्यांच्या बांधावर उध्दव ठाकरे

ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. तसेच राज्य सरकारकडूनही तातडीने मदत उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे दिवाळीच्या सणातही शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंनी भरलेले आहेत. या शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आज रविवारी औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी औरंगाबादमधील दहेगावात जाऊन शेतीच्या नुकसानीची पाहणी केली व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवादही साधला. तसेच त्यांनी पेंढापूर येथील शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत बोलताना त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.

यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे म्हणाले, परतीच्या पावसामुळे जगाचा पोशिंदा असलेला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. दिवाळीचा सण सर्वजण साजरा करत असताना शेतकऱ्यांना हा सण साजरा करायचा अधिकार नाही का? असा सवाल करत तुमच्या हातात जो आसूड आहे. त्याचा वापर करा. असे म्हणतात की दगडालाही पाजर फुटतो तुम्ही सरकारला घाम फोडा असे आवाहन केले.

सततच्या पावसामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहिर करण्याची आवश्यकता आहे. परंतु राज्य सरकार ओला दुष्काळ जाहिर करायला तयार नाही. शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज असताना ती ही दिली जात नाही. त्यामुळे या गोष्टी करा अथवा नका करू पण या जगाच्या पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रूपयाची मदत करा अशी मागणीही राज्य सरकारकडे त्यांनी यावेळी केली.

शेतकऱ्यांवर ज्या आपत्ती येतात त्या दोन प्रकारच्या असतात, एक कोरडा दुष्काळ असतो तर एक अतिवृष्टीची आपत्ती असते. हे आपल्या हातात नसतं, परंतु ही अस्मानी संकटं आल्यानंतर सरकारचं कर्तव्य असतं की शेतकऱ्याला उघड्यावर पडू द्यायचं नाही, त्याचं घरदार उघड्यावर पडता कामा नये. परंतु आज एकूणच घोषणांची अतिवृष्टी सुरू आहे आणि अंमलबजावणीच नव्हे तर मी म्हणेण या निर्दयी सरकारकडे भावनांचा दुष्काळ आहे अशी टीकाही त्यांनी केली.

आजची माझी भेट ही प्रतिकात्मक आहे. एका विचित्र अवस्थेत आपण सर्वजण आहोत. एकाबाजूला दिवाळी सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचं दिवाळं निघालेलं आहे. दिवाळी साजरी तर सोडून द्या पण दिवाळीत कपडे कोणते घालायचे, घरात अन्न काय शिवजवायचं? हा मोठा प्रश्न आपल्या अन्नदात्याला पडलेला आहे. मी का मुद्दाम आलो. केवळ आज विरोधी पक्षात आहे म्हणून मी आलेलो नाही. तर या शेतकऱ्यांचं ऋण आपल्यावर आहे, नेहमीच असतं. महाविकास आघाडीच्या काळात साधारण दोन-अडीच वर्षे कोरोनाने आपली खाल्ली, सर्वत्र लॉकडाउन असताना, आपल्या अर्थव्यवस्थेला जर कोणी आधार दिला असेल तर आपल्या अन्नदात्याने, कृषी क्षेत्राने दिला. कारण तिथे लॉकडाउन करता येणं शक्य नव्हतं. जर शेतकरी तेव्हा राबला नसता, तर आपल्या आर्थिक परिस्थितीचं सुद्धा दिवाळं निघालं असतं असेही ते म्हणाले.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या चार टप्प्यात ६६.९५ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात एकूण मतदान ६६.९५% इतके नोंदवले गेले आहे, निवडणूक आयोगाने गुरुवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *