Breaking News

नाना पटोले यांचा सवाल, …नवाब मलिक देशद्रोही तर मिर्चीशी संबंधित प्रफुल्ल पटेल कोण?

माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे आहेत त्यांची साथ महायुतीत नको ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका दुटप्पीपणाची आहे. नवाब मलिक चालत नाहीत तर मग कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्चीशी संबंधीत प्रफुल्ल पटेल फडणवीसांना कसे चालतात? असा सवाल करुन फडणवीस यांचे देशप्रेम नकली आहे, अशा नकली देशप्रेमाची नौटंकी महाराष्ट्रात चालणार नाही, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्ष व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली. ते पुढे म्हणाले की, नवाब मलिकांना दाऊदशी संबंधीत असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी आपण किती देशप्रेमी आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, त्यासंदर्भात त्यांनी दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून ते पत्र ट्वीटही केले पण दाऊदचा साथीदार इक्बाल मिर्चीचा पार्टनर खासदार प्रफुल्ल पटेल देवेंद्र फडणवीस यांना कसे चालतात ? ईडीने प्रफुल्ल पटेल यांचे घरही जप्त केलेले आहे मग प्रफुल्ल पटेलांबद्दल फडणवीस यांची भूमिका काय? ते फडणवीसांनी जाहीर करावे. कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमशी संबंधित एक व्यक्ती देशद्रोही तर मग दुसरा व्यक्ती देशप्रेमी आहे का ?

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळच्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला, त्यानंतर चार दिवसातच हे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झाले, भ्रष्टाचाराचा आरोप असलेले अजित पवार फडणवीसांना कसे चालतात? छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात अशी नौटंकी चालत नाही. जनताच अशा नकली देशभक्तांना धडा शिकवेल, असेही म्हणाले.

https://twitter.com/NANA_PATOLE/status/1733064473525829935/photo/1

 

Check Also

सभागृहात दादाजी भुसे म्हणाले ते थोरवे माझे मित्र; थोरवे म्हणाले, भुसे अॅरोगंट

कल्याण आणि दहिसर येथील गोळीबाराच्या घटनेनंतर राज्याचे मंत्री दादाजी भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *