राज्यातील २० वर्षे झालेल्या जमिनीच्या खरेदी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन मंत्री तथा आमदार नवाब मलिक यांना काही महिन्यांपूर्वीच जामीन मिळाला. त्यानंतर विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावत सत्ताधारी बाकावर जाऊन बसले. मात्र नवाब मलिक यांनी शरद पवार यांच्या समर्थक गटात प्रवेश केला की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला याबाबत दस्तुरखुद्द नवाब मलिक यांनी अद्याप कोणतेही भाष्य केले नाही. मात्र विधानसभेत मलिक यांची आसन व्यवस्था सत्ताधारी बाकावर करण्यात आल्याने न सांगताही पाठिंबा कोणाला याचे उत्तर राजकिय वर्तुळात मिळाले.
परंतु ज्या भाजपा नेत्याचे गुपित फोडण्यात नवाब मलिक यांनी पुढाकार घेतला त्याच नेत्याला नवाब मलिक यांच्या बचावासाठी लंगडा युक्तीवाद विधिमंडळात करावा लागल्याचे चित्र काल विधिमंडळात दिसून आले. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहीत नवाब मलिक यांच्या महायुतीतील सहभागावरून प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांचा समावेश करायचा की नाही याचा निर्णय अजित पवार यांच्यावर सोपविला.
परंतु आज विधिमंडळ परिसरात नवाब मलिक यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांनी थेट विधानसभेत जाऊन कामकाजात सहभाग नोंदविला. यावरून भाजपाच्या आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांचे पत्र किती योग्य आहे यावरून नवाब मलिक यांच्या महायुतीतील समावेशावरून प्रश्नचिन्ह उभे करत त्यांना मिळालेला जामीन रद्द करण्याची काही जणांनी मागणी केली.
तर अजित पवार गटाच्या दिलीप वळसे पाटील, अमोल मिटकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना लिहिलेले पत्र असे पत्र जाहिर करायला नको पाहिजे होते अशी भूमिका मांडली. तसेच अजित पवार यांना एखादा फोन केला असता किंवा भेटून याबाबत चर्चा केली असती तर त्यातून मार्ग निघाला असता अशी भूमिका मांडली.
तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत विचारले असता म्हणाले की, नवाब मलिक यांनी कोणाला पाठिंबा द्यायचा किंवा आमच्यासोबत येण्यासंदर्भात आमची कोणाची चर्चा झाली नाही. तसेच विधिमंडळात अधिवेशनात त्यांची आसन व्यवस्था कोठे करावी या अनुषंगानेही पत्र दिल्याचे आपणाला माहित नाही. नवाब मलिक यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्याबाबत बोलणे उचित होईल असे सांगत देवेंद्र फडणवीस यांचे पत्र आपल्याला मिळाल्याचेही सांगितले.
तर विधिमंडळ अधिवेशनात नवाब मलिक हे सहभागी झाल्याने त्याचे पडसाद सभागृहाबाहेरही उमटत असल्याचे पाहुन अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी विधिमंडळ आवारात येत भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत चर्चा केली. या चर्चेचा तपशील काही अद्याप पुढे आला नाही.
परंतु या चर्चेसंदर्भात प्रफुल पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. आमचा पक्ष सर्वांना घेऊन चालणारा पक्ष आहे. तसेच ते आता विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी झाले आहेत. त्यामुळे त्यांचे पक्षातील मित्र त्यांना भेटले आणि त्यांच्याबरोबर बोलले. तसेच फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्रासंदर्भात विचारले असता पुढे म्हणाले की, आताच आमची भेट झाली आणि या विषयी चर्चा झाली असे सांगत अधिक बोलण्याचे टाळले.