Breaking News

शिंदे गटाचे खासदार ठाम, आपण २२ जागांचीच भाजपाकडे मागणी करायची ठाकरे गटाच्याही जागांवर दावा करणार

शिवसेना कोणाची यावरील निर्णय अद्याप सर्वोच्च न्यायालय आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे प्रलंबित असताना लोकसभा निवडणूकीला आता काही महिन्यांचा अवधी राहिला आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या गटाच्या खासदारांची बैठक झाली. या बैठकीत शिंदे गटाच्या खासदारांबरोबरच विद्यमान ठाकरे गटाच्या खासदारांच्या जागा भाजपाकडे मागणी करायच्याच अशी भूमिका घेतल्याची माहिती शिंदे गटातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

वास्तविक पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या समर्थक खासदारांची बैठक वर्षा या शासकिय निवासस्थानी बोलविली होती. त्यावेळी शिंदे गटाचे १३ खासदार उपस्थित होते. त्यावेळी या १३ खासदारांच्या मतदारसंघातील विविध रखडलेली विकास कामांबाबत चर्चा झाली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी संबधित अधिकाऱ्यांना खासदारांच्या मतदारसंघातील कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

त्यानंतर शिंदे समर्थक खासदार असलेल्या मराठवाडा आणि विदर्भातील खासदारांनी आगामी लोकसभेत त्या जागा शिंदे गटाच्यावतीनेच लढविण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच सध्याच्या विद्यमान शिंदे गटाच्या १३ आणि ठाकरे गटाच्या ५ आणि पराभूत झालेल्या ४ जागाही भाजपाकडे मागण्याबाबत आग्रही भूमिका घेतली.

त्यातच अजित पवार यांचाही गट महायुतीत आल्याने अजित पवार गटाकडूनही लोकसभेच्या काही जागा मागण्याची शक्यता शिंदे गटाच्या खासदारांनी गृहीत धरली आहे. तसेच भाजपाकडूनही तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी यांना बसविण्यासाठी स्वतंत्ररित्या तयारी सुरु केली आहे. त्यामुळे २०१९ च्या निवडणूकीत शिवसेनेच्या शिंदे गटाच्या खासदारांच्या विरोधात थोडक्या मतांनी भाजपा उमेदवारांचा पराभव झाला त्या जागांवर भाजपावर पुन्हा दावा करून भाजपाच्या चिन्हावर निवडणूकीला सामोरे जाण्याचा विचार भाजपाचा असल्याचेही त्यांनी सांगितले.

या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपाशी २०२४ च्या निवडणूकांसाठी युती करण्याआधी ठाकरे गटाच्या खासदारांच्या जागा आणि शिंदे गटाच्या खासदारांचे जागांबाबत आधीच बोलणी करून त्यादृष्टीने तयारी करण्याच्या भूमिकेवर शिंदे गटाच्या खासदारांनी या चर्चेत भर दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपा या मागणीला तयार होईल का? अजित पवार गटाशी चर्चा केल्यानंतर अजित पवार तयार होतील का? या सगळ्या गोष्टींबाबत साधक बाधक चर्चा झाल्याचे शिंदे गटाच्या अन्य एका खासदाराने सांगितले.

Check Also

तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रासह देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पाडले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातील मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *