Breaking News

मनिषा कायंदेचे जाणे राष्ट्रवादीच्या पथ्यावर? अजित पवार म्हणाले, आता आम्ही निश्चित विचार करू

भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत आलेल्या मनिषा कायंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मनिषा कायंदे यांच्यावर पक्ष प्रवक्त्ये पदाची जबाबदारी सोपवित विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्त केले. शिवसेनेतील फुटीनंतरही कायंदे या उध्दव ठाकरे यांच्या गटात राहिल्या. मात्र आता पुढील राजकिय गणितातील फायदे तोटे बघत नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. परंतु मनिषा कायंदे यांच्या जाण्याने शिंदे गट आणि ठाकरे गटाचा फायदा न होता राष्ट्रवादी काँग्रेसचा होताना दिसत असून ठाकरे गटाच्या अंबादास दानवे यांच्या विरोधी पक्षनेते पदावर गडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विधान परिषदेत भाजपानंतर शिवसेनेकडे सर्वाधिक अर्थात ११ आमदार होते. त्यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद ठाकरे गटाच्या अंबादास दानवे यांच्याकडे आले. परंतु शिवसेनेतील फुटीनंतर सुरुवातीला ठाकरे गटा सोबतच हे ११ आमदार होते. त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार विप्लव बजौरिया यांनी सर्वात आधी शिंदे गटात प्रवेश केला. त्यातच नुकतेच मनिषा कायंदे यांनीही शिंदे गटाची वाट धरल्याने ठाकरे गटातील आमदारांची संख्या ९ वर आली. तर राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्य संख्या विधान परिषदेत ९ इतकी आहे. तसेच विधान परिषदेच्या उपसभापती पदावरील अॅड. नीलम गोऱ्हे यांच्याकडे आहे. मात्र पीठासीन अधिकारी असलेल्या व्यक्तीला पक्षाचा सभागृहातील सदस्य म्हणून गृहीत धरता येत नाही. त्यामुळे विधिमंडळाच्या नियमानुसार सर्वाधिक आमदार ज्या पक्षाचा त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता किंवा सभागृह नेता होत असतो.

सध्या विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. तर विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाकडे आहे. परंतु मनिषा कायंदे यांच्या जाण्याने ठाकरे गटाचं विधान परिषदेतलं संख्याबळ कमी झालं आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रश्न विचारला की, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार का? यावर अजित पवार स्मितहास्य करत म्हणाले, तुम्ही हे आमच्या लक्षात आणून दिल्यामुळे आम्ही निश्चितपणे यावर विचार करू.

अजित पवार म्हणाले, आमची राष्ट्रवादीची बैठक आधीच ठरली आहे. जयंत पाटील आणि मी फार आधीच ती ठरवली आहे. या बैठकीचा आणि विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा कसलाही संबंध नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिना निमित्त आम्ही ९ जूनला जी सभा घेणार होतो, ती पावसामुळे घेता आली नाही. ती निमंत्रितांची सभा २१ जूनला आयोजित केली आहे. स्वतः पवारसाहेबांनी ती सभा ठेवली आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, आमची महाविकास आघाडी आहे. लगेच तुम्ही काहीतरी बातम्या चालवू नका. विधानसभा, विधान परिषदेत ज्या वेळेस विरोधी पक्षनेते पद देण्याची वेळ येते, त्यावेळी ज्यांच्या सर्वाधिक जागा त्यांना ते विरोधी पक्षनेतेपद दिलं जातं. २०१४ च्या निवडणुकीनंतर आम्ही (राष्ट्रवादी काँग्रेस) ४१ आमदार होतो, काँग्रेसचे ४२ आमदार होते. तेव्हा शेतकरी काँग्रेस पक्षाचे तीन सदस्य होते, ज्यांना आम्ही म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला होता. आमची आघाडी होती. म्हणजेच आमच्याकडे ४४ आमदार होते. तरी देखील ५ वर्ष ते पद काँग्रेसकडे होतं.

अजित पवार म्हणाले, त्यावेळचे (२०१४) विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी सांगितलं ज्या पक्षाचे सर्वात जास्त सदस्य त्यांचा आमदार मी विरोधी पक्षनेता म्हणून जाहीर करणार. तुम्ही (प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी) सांगताय त्याबद्दल आम्ही कोणताही विचार केलेला नाही. परंतु तुम्ही हे लक्षात आणून दिल्यामुळे आम्ही निश्चितपणे यावर विचार करू.

Check Also

माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आता एकांगी की चुरसीची ?

लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरु झालेली असतानाच काही लोकसभा मतदारसंघातील लढती या फारच रंजक होणार असल्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *