Breaking News

मलिकांच्या अटकेवर चंद्रकांत पाटील म्हणाले, आता नवाब मलिकांनी… ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप झाले त्यांनी राजीनामे दिले

पहाटेच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या घरी पोहचत त्यांच्या घराची झडती घेत मलिक यांना ताब्यात घेवून ईडी कार्यालयात आणले. त्यानंतर तब्बल आठ तास ईडीने चौकशी करून नवाब मलिक यांना अटक केली. त्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खोचक प्रतिक्रिया व्यक्त करत, आता मलिकांनी नैतिकतेला धरून राजीनामा द्यायला हवा अशी मागणी केली.

नवाब मलिक यांच्या घरी आज सकाळी ५ वाजता ईडीनं छापा टाकत सकाळी ७ वाजता मलिक यांना ईडी कार्यालयात आणल्यानंतर तब्बल ८ तास चौकशी करत अटक केली.

ज्या ज्या मंत्र्यांवर असे आरोप होऊन अटक होईल, त्या प्रत्येकाला राजीनामा द्यावा लागेल. या राज्याची तशी परंपरा आहे. नवाब मलिकांना सरते शेवटी ईडीनं अटक केली आहे. आता नवाब मलिक यांनी राजीनामा द्यायला हवा. ही नैतिकता आहे. दोन मुख्यमंत्री अशाच प्रकारे पायउतार झाल्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.

मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायला हवा. राज्याचे मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरेंसारख्या परखड नेतृत्वाची परंपरा असणारे आहेत. ते तातडीने हा निर्णय घेतील. अन्यथा भाजपाच्या नेत्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा देत प्रत्येक गोष्ट हे सरकार आंदोलन केल्याशिवाय मान्य करत नाही. अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावेळीही हेच झाल्याचे त्यांनी सांगितले.

कशाची वाट पाहाता आहात? एक मंत्री तुमचे एका मुलीने आत्महत्या करण्याच्या प्रकरणात पायउतार झाले. एक मंत्री जेलमध्ये आहेत. ते राज्याचे गृहमंत्री होते. तुमचे मुंबईचे आयुक्त काही काळ परागंदा होते. त्यानंतर आता त्यांच्यावर केसेस सुरू आहेत. सचिन वाझे जेलमध्ये आहेत. एक मंत्री ईडीची नोटीस आली, त्याला अजून हजर होत नाहीत. ईडीला त्यांना सक्तीने हजर करावं लागेल. एका मंत्र्याचं अलिबागमधील १०० कोटींचं रिसॉर्ट तोडण्याची ऑर्डर काढावी लागली. एका नेत्याचा बंगला तोडणार होते, तर त्यांनी स्वत:च तोडला. औरंगाबादच्या एका मंत्र्याच्या मुलावर जमीन लुबाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. एका मंत्र्याच्या दोन बायका आहेत जे हिंदू कोडमध्ये, निवडणूक कायद्यात बसत नाही. ही यादी वाचताना मला दम लागला. यानंतरही तुम्हाला असं वाटत नाही की हे कोलमडत चाललंय? असा प्रतिप्रश्न करत त्यांनी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या कृत्यांची यादीच वाचून दाखविली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *