Breaking News

बावनकुळेंच्या टीकेवर अजित पवार यांचा खोचक टोला, मी नागपूरला जाऊन टिप्स घेणार… त्यांच्याकडून माहिती घेऊन तसे काम करेन

राज्याचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी लोकसंख्येच्या मुद्द्यावरून जोरदार टोलेबाजी केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं उदाहरण देत लोकसंख्येबाबत लोकांच्या वर्तनावर एक खंतही व्यक्त केली. त्याचबरोबर पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होणार या जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ते आज रविवारी पुण्यातील मावळ येथे बोलत होते.

पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. त्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीने विकासकामे केली नसल्याचा पलटवार करत लोकांमध्ये जाऊन विकासाची कामे करावी लागतात. लोकांना जोडावे लागते. त्यानंतर पक्षाचा मुख्यमंत्री होतो असे सांगत उशीच कोणाच्या बोलण्याने मुख्यमंत्री होता नसते असा खोचक टोलाही राष्ट्रवादीला लगावला.

भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या टीकेबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीनी अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीसाठी मी लवकरच नागपूरला जाणार आहे. तेथे जाऊन त्यांना कामे कशी करायची, मुख्यमंत्री पद मिळविण्यासाठी काय काय करावं लागतं, तिकीट कापलं जाऊ नये म्हणून काय करावं लागते याची सगळी माहिती घेऊन मी पुढे काम करेन असे खोचक प्रत्युत्तर दिले.

तसेच जयंत पाटील यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, जयंतराव पाटील जे बोलले त्यासाठी त्यांच्या तोंडात साखर पडो आणि पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होवो अशी प्रतिक्रियाही व्यक्त केली.

अजित पवार म्हणाले, आपल्या देशाचा जगात पहिला क्रमांक लोकसंख्येत आला आहे. त्यात आपण चीनलाही मागे टाकलं आहे. हे चीनबीन सगळे पाठीमागे गेले. लोकसंख्येत आपला पहिला क्रमांक आहे. आपण काय करतोय? मलाही वाईट वाटतं. मी ३० वर्षे या जिल्ह्याचं प्रतिनिधीत्व करतो. १९६९ मध्ये शरद पवार एका मुलीवर थांबले आणि आम्ही आपले वंशाचा दिवा वंशाचा दिवा करतोय.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, वंशाचे दिवे काय करत आहेत हे आपणच आपल्या उघड्या डोळ्याने बघतो आहे. हे गांभीर्याने घ्या. जमीन आहे तेवढीच आहे. जमीन आहे तेवढीच आहे, पाणी आहे तेवढंच आहे. त्यात पर्यावरणाचा ह्रास होत चालला आहे. मावळकरांना कधी एप्रिलमध्ये पाऊस पाहिला आहे का? आता शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे की, जागतिक हवामान बदलामुळे (ग्लोबल वॉर्मिंग) मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडणार आहे.

ग्लोबल वार्मिंगवर बोलताना अजित पवार म्हणाले, गारपीट होते आहे, वादळ सुटत आहे, पत्रे उडून जात आहेत. झाडं मोडत आहेत, अतोनात नुकसान होत आहे. बारमाही पिकं उद्ध्वस्त होत आहेत, फळबागा उद्ध्वस्त होत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मावळमध्ये लागवडीखाली असलेली शेती आणि आता २०२३ मध्ये स्वातंत्र्याला ७५ वर्षे झालीत. या काळात रस्त्यांसाठी किती जमिनी गेल्या. सगळीकडे नागरिकरण प्रचंड सुरू आहे, अशी काळजीही व्यक्त केली.

Check Also

मेहबूबा मुफ्ती यांचे निवडणूक आयोगाला पत्रः कार्यकर्त्यांना अटक करण्याचे थांबवा

जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *