मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्याच्या घटनेला २० जून रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. १९ जून २०२२ रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे २५ आमदारांसह सुरतला रवाना झाले. त्यानंतर, राज्यातील राजकारणात नाट्यमय घडामोडी घडल्या. परिणामी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावरून अजित पवारांनी सरकारला काही सवाल विचारले आहेत.
अजित पवार म्हणाले, सरकार सत्तेवर आलं तेव्हाच सांगितलं होतं की ७५ हजार मुला मुलींची भरती करतो. उद्याच्या २० तारखेला त्यांनी बंड करून एक वर्ष होईल. त्यांचं सरकार येऊन जवळपास एक वर्ष झालं आहे. त्यांनी वर्षभरात किती लोकांना नोकऱ्या दिल्या? किती महागाई कमी केली? किती शेतकऱ्यांना आधारभूत किंमत मिळवून दिली. किती शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या? त्याबाबत बोला आधी, असंही सांगितले.
यामध्ये कोणताही घटक आजच्या घडीला या सरकारच्या कामाबाबतीत समाधानी नाहीय, असंही सांगितले.
तसेच अजित पवार म्हणाले की, राज्यात सुरू असलेली प्रचंड बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या समस्यांवर बोला. आज पावसाने ओढ दिली आहे. अमरावती, कोकणात पाऊस नाही. धरणातील साठे संपत चालले आहेत. प्यायला पाणी नसल्याने प्रश्न उपस्थित राहिले आहेत. दुबार पेरणीचं संकट आहे. खतांच्या किंमती वाढत आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्याची अवस्था झाली आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या घरात माल साठवून पडला आहे. उत्पादनाला भाव मिळत नाही. जळगावातील काही शेतकरी उपोषणाला बसले होते. या सर्व समस्या आहेत. यावर बोला ना. राज्यात आणि केंद्रात तुम्ही आहात, या प्रश्नांची उत्तरे तुम्ही दिली तर समाजाला दिलासा मिळेल, असंही ते म्हणाले.