Breaking News

जयंत पाटील यांची टोला, … पण सत्तेसाठी लाचारी पत्कारणे योग्य नाही

लोकांनी उमेदवाराला खांद्यावर घेतले आणि निवडणूक लोकांनी हातात घेतली तर कोणतीही शक्ती त्या उमेदवाराचा पराभव करू शकत नाही. निलेश लंके हे स्थानिक आहेत, लोकप्रिय आहेत, सतत फिरतीवर असतात. त्यांच्या विधानसभा मतदारसंघात त्यांनी प्रचंड काम केले आहे आणि लोकप्रतिनिधी कसा असावा याचा आदर्श घालून दिला आहे. या लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न सुटलेले नाहीत त्यामुळे हा उमेदवार आपण पुढे केला आहे. लंके इथल्या लोकांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

जयंत पाटील म्हणाले की, आज देशात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत तरी काही जण म्हणतात आम्ही काम करण्यासाठी सत्तेत जात आहोत. सत्तेसाठी लाचारी स्वीकारणे योग्य नाही अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली तसेच कोणत्या विचारामागे राहून आपण काम करतोय हे पाहणे गरजेचे आहे. राजकारणात विचार आणि आचार फार महत्वाचे असतात. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या मागे लोक मोठय़ा ताकदीने उभे आहेत. शरद पवार , उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी ही परिस्थिती बदलू शकतात यावर लोकांचा ठाम विश्वास आहे असेही यावेळी स्पष्ट केले.

एकीकडे ‘न खाऊंगा न खाने दुंगा’ म्हणायचे आणि दुसरीकडे ‘जो भी है वो मैंही खाऊंगा’

जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, आज टिव्हीद्वारे जाहिराती प्रसारित केले जात आहे. सर्वत्र सत्ताधारीच दिसतील अशी व्यवस्था केली जात आहे. जाहिरातींवर एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असेल तर विचार करा यांची मिळकत किती असेल ? या सरकारने इलेक्टोरल बाँड्स नावाची व्यवस्था मध्यंतरी सुरू केली. विविध संस्थांच्या माध्यमातून यांनी पैसे घेतले त्याची माहिती गुप्त ठेवण्यात आली. लोक कोर्टात गेल्यावर सुप्रीम कोर्टाने सांगितले की सर्व व्यवहार जाहीर करा. हे जाहीर झाल्यावर कळले की निम्म्याहून अधिक पैसे हे भाजपाला मिळाले. ज्यांनी पैसे दिले त्यांच्यावर ईडी, आयटी या संस्थांद्वारे कारवाई सुरू होती. पैसे दिले तेव्हा सुटका झाली. हा उघड उघड भ्रष्टाचार आहे, भ्रष्टाचार कसा करावा याची नवी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रकार मागच्या पाच वर्षांत झाला. एकीकडे ‘न खाऊंगा न खाने दुंगा’ म्हणायचे आणि दुसरीकडे ‘जो भी है वो मैंही खाऊंगा’ असे केले जात आहे असा टोलाही यावेळी लगावला.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, टिव्हीवरील जाहिरातींच्या माध्यमातून काँग्रेसने ७० वर्षांत काय केले नाही हे सांगितले जात आहे. हे १० वर्षे सत्तेत आहेत, यांनी १० वर्षात काय केले याचीही एखादी जाहिरात करा. ७० वर्षांत काम केले म्हणून देश आज इथपर्यंत आला आहे. मागच्या १० वर्षात यांनी देश अधोगतीकडे नेला. आज देशातील तरुणांना रोजगार नाही. पीएच.डी झालेली मुले आज शिपायाच्या नोकरीसाठी अर्ज भरत आहेत. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये आपल्या देशाचा नंबर १११ वा लागतो. भाजपा यावर उत्तर देईल का ? का देश पुढे गेला नाही? यांचे उत्तर काय असेल तर तुम्ही साठ वर्षात काय केले? आम्ही फक्त १० वर्षांचा हिशोब मागतोय तर यांची ही परिस्थिती आहे. टिव्हीवर जे दाखवले जाते ते फक्त दिसायला चांगलं आहे, खरी परिस्थिती तुम्ही आम्ही भोगतोय अशी टीकाही यावेळी केली.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *