Breaking News

पंतप्रधान मोदी म्हणाले, बँकिंग सेक्टर समस्या आणि आव्हानांशी झगडत होती पण..

मागील १० वर्षात देशात मोठे परिवर्तन आणणे सोपे नव्हते. पण आमचे धोरण, नियत आणि निर्णयांमध्ये स्पष्टता असल्यामुळेच हे बदल झाले. गेल्या १० वर्षांत जे झाले तो फक्त ट्रेलर होता, अजून बरेच काम बाकी आहे. आपल्याला देश अजून पुढे न्यायचा आहे. पुढील १० वर्षांचे लक्ष्य निश्चित करताना आपल्याला तरुणांच्या आकांक्षावर लक्ष केंद्रित करावे लागेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

भारतीय रिझर्व्ह बँकेचा ९० व्या वर्धापनदिनानिमित्ताने मुंबईतील नरिमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) येथे एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. तसेच आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, राज्यपाल रमेश बैस, अर्थमंत्री निर्मला सीतारमन हे मान्यवरही उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेला ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. भारतीय रिझर्व्ह बँक ही संस्था म्हणून स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरची साक्षीदार आहे. व्यावसायिकता आणि बांधिलकीमुळे आज आरबीआयची संपूर्ण जगभरात ओळख आहे. सध्या जे आरबीआयशी निगडीत आहेत ते खूप भाग्यवान आहेत. आज तुम्ही जे काम कराल, जी धोरणे आखाल , त्या अनुषंगाने आरबीआयच्या पुढील दशकातील दिशा ठरणार आहे. हे दशक या संस्थेला शताब्दी वर्षापर्यंत घेऊन जाणारे दशक आहे आणि विकसित भारताच्या संकल्प प्रवासासाठी हे दशक तितकेच महत्त्वाचे आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ८० व्या वर्षाच्या कार्यक्रमासाठी २०१४ साली जेव्हा आलो होतो, तेव्हा परिस्थिती खूप वेगळी होती. भारताचे संपूर्ण बँकिग सेक्टर अनेक समस्या आणि आव्हानांशी झगडत होते. एनपीएबाबत भारताच्या बँकिंग सिस्टीमची स्थिरता आणि त्याचे भविष्य याबाबत प्रत्येकाच्या मनात शंका, भीती होती. पण आज भारताची बँकिंग व्यवस्था ही जगात एक मजबूत आणि टिकाऊ सिस्टीम म्हणून ओळखली जाते. बुडणारी बँकिंग सिस्टीम आता नफ्यात आली आहे आणि विक्रम करतेय. जेव्हा हेतू योग्य असतो तेव्हा धोरण योग्य असते. धोरण योग्य असते तेव्हा निर्णय योग्य असतात. आणि निर्णय योग्य असतात तेव्हा परिणाम योग्य असतात, हे आज देश पहात आहे, असे पंतप्रधान म्हणाले. मागील १० वर्षात मोठे परिवर्तन आणणे सोपे नव्हते. पण आमचे धोरण आणि निर्णयांमध्ये स्पष्टता होती, त्यामुळे हे बदल झाले. आमचे प्रयत्न दृढ आणि प्रामाणिक होते. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सुधारणा करण्याच्या दिशेने सरकारने मोठी पावले उचलली आहेत.

देशात गेल्या १० वर्षांत जे झाले तो फक्त ट्रेलर होता, अजून बरेच काम बाकी आहे. आपल्याला देश अजून पुढे न्यायचा आहे. पुढल्या १० वर्षांचे लक्ष्य स्पष्ट असणे हे खूप गरजेचं आहे. पुढील १० वर्षांचे लक्ष्य निश्चित करताना आपल्याला आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. ती म्हणजे- भारतातील तरुणांच्या आकांक्षा. भारत आज जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक आहे. तरुणांच्या या आकांक्षा पूर्ण करण्यात रिझर्व्ह बँकेची महत्त्वाची भूमिका आहे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

आपल्याला कॅशलेस अर्थव्यवस्थेतून होणाऱ्या बदलांवर लक्ष ठेवावे लागेल. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या बँकिंग गरजा या देखील वेगवेगळ्या असू शकतात. अनेकांना फिजिकल बँकिंग आवडते तर काहींना डिजिटल बँकिंग आवडते. लोकांना सोयीसुविधा देणारे धोरण देशाने बनवण्याची गरज आहे, असे पंतप्रधान म्हणाले. कोरोना आणि युद्धात देखील आपण महागाई दर आटोक्यात आपण ठेवला. ज्यांचे व्हिजन व्यवस्थित आहे, त्यांची प्रगती होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. जगातील मोठे-मोठे देश कोरोनातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतायत, त्यातच भारतीय अर्थव्यवस्था नवे किर्तीमान स्थापित करत आहे. रिझर्व्ह बँक भारताला वैश्विकस्तरावर घेऊन जाऊ शकते, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

Check Also

महाराष्ट्र लोकसेवा आयोग लवकरच ‘या’ परिक्षांच्या तारखा जाहीर करणार

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षण निश्चिती करून लवकरच सुधारित परिक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *