Breaking News

उध्दव ठाकरे म्हणाले, छप्पन वर्षात ५६ पाहिले… शिवसेना आघात करणाऱ्याला गाडून पुढे गेली

अंधेरी पोट निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गट आणि उध्दव ठाकरे यांच्यातील कुरघोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. तसेच दोन्ही गटात प्रवेश कऱणाऱ्यांची संख्याही वाढतानाही दिसत आहे. यापार्श्वभूमीवर आज उरण येथील शिवसैनिकांनी मातोश्रीवर जात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. त्यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, शिवसेनेला छप्पन वर्षे झाली. या छप्पन वर्षात छप्पन पाहिले, त्यांना गाडून शिवसेना पुढे गेली असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपाचे नाव न घेता निशाणा साधला.

यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, शिवसेनेला कुणीही संपवू शकत नाही. शिवसेनेला छप्पन्न वर्षे झाली. या छप्पन्न वर्षांत असे छप्पन पाहिले, त्यांना गाडून शिवसेना पुढे गेलीय. शिवसेनेवर आघात करण्याचा ज्या-ज्या वेळी प्रयत्न झाला तेव्हा शिवसेना आघात करणाऱ्याला गाडून शिवसेना चौपटीने वाढली असल्याचेही आवर्जून सांगितले.

मातोश्री निवासस्थानी उरण येथील शिवसैनिकांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी राज्यात पुन्हा आपलीच लाट येणार आणि पुन्हा शिवसैनिक मुख्यमंत्री होणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला.

रायगड जिल्ह्यातील उरण येथील शेकडो शिवसैनिकांनी आज मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मशालीही आणल्या होत्या. त्याचप्रमाणे अनेक शिवसैनिकांनी आपल्या छातीवर मशाल हे नवे चिन्ह तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नवे नाव गोंदले होते.

शिवसैनिकांनी आणलेल्या मशालींकडे पाहून उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांनी आपले चिन्ह गोठवले, नाव गोठवले पण रक्त पेटवले आहे आणि हे सळसळते रक्त त्यांना राजकारणातून गाडल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे. उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवसैनिकांना जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करा, कागदाच्या लढाईत आपण हरता कामा नये, असे आवाहनही केले.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी दसरा मेळाव्याच्या यशाबद्दल शिवसैनिकांना धन्यवाद दिले. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे जगाचे लक्ष होते असे ते म्हणाले. कॅनडा, ब्रिटनमधील मराठी माणसांनीही तिथे बसून दसरा मेळावा पाहिला. इतकेच नव्हे तर तेथील स्थानिक लोकांना आपल्या भाषणाचा अनुवाद करूनही ते सांगत होते आणि ही माहिती त्यांनी स्वतच फोन करून शिवसैनिकांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *