Breaking News

त्या जाहिरातीवरून अजित पवार यांचे खुले आव्हान, तुम्ही जर इतके लोकप्रिय आहात तर…मैदानात या

आता शिवसेना आमचीच अशाप्रकारचा दावा करणाऱ्यांनी जाहिरातीमध्ये मोदींचा आणि स्वतः चा फोटो टाकला. परंतु बाळासाहेबांचा फोटो मात्र सोयीस्कररित्या त्यांनी वगळला आहे. हा बाळासाहेबांचा अपमान नाही का? असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

अजित पवार पुढे म्हणाले की, तुम्ही जनतेला आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनीच शिवसेना पुढे घेऊन चाललो आहे आणि उध्दव ठाकरे यांनी त्या विचारांपासून फारकत घेतली असे सांगता, मात्र यांनीच राज्याचा विकास आणि लोकांचे प्रश्न पध्दतशीरपणे बाजुला ठेवले आहेत असा थेट हल्लाबोलही केला.

जवळपास अनेक वर्ष सरकारमध्ये किंवा सरकारच्या बाहेर राहून खासदार आणि आमदार म्हणून ३२ वर्ष काम करतोय. सकाळी पेपर उघडले तर पहिल्या पानावर जाहिरात पहायला मिळाली. मात्र अशी जाहिरात कधी पाहिली नाही असा उपरोधिक टोलाही अजित पवार यांनी लगावला.

शिंदे गटाची ही जाहिरात असून त्या गटाचे लोक इतक्या लवकर बाळासाहेब ठाकरे यांना कसे विसरले अशी शंका उपस्थित करतानाच बाळासाहेबांच्या विचारांचे, आनंद दिघे यांच्या विचारांचे आहात म्हणून शिवसेना खेचून घेतली मग जाहिरातीमध्ये हिंदूहदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे फोटो का नाहीत असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला.

या जाहिरातीमध्ये स्वतः च ठरवून सर्वेक्षण केलेले आहे. नेमके कुठे सर्वेक्षण केले, कुणी सांगितले, कुणाला किती टक्के, याचा थांगपत्ता नाही. एक्झिट पोल येतात ते कुणी केले ते सांगतात. मध्यंतरी सकाळने एक सर्व्हे केला तो सर्व्हे आम्ही केला असे त्यांनी सांगितले. मात्र तसा हा सर्व्हे छापून राज्याच्या प्रमुखाने एक विश्वविक्रम केला आहे असा टोलाही अजित पवार यांनी यावेळी लगावला.

जाहिरात आपण केलेले काम लोकांपर्यंत पोचावे किंवा जाहिरातीवर मोठा खर्च वेगवेगळ्या एजन्सी का करतात की, लोकांना माहीत होण्यासाठी, जर यांचे काम एवढे चांगले असेल तर अशापध्दतीच्या पानभर जाहिराती आणि तीपण जाहिरात करत असताना त्या जाहिरातीमध्ये जो सर्व्हे दाखवला आहे त्यात एक नंबर एकनाथराव शिंदेंना मुख्यमंत्री पदाकरीता लोकांनी कौल दिला आहे. अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत लोकांना एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री पुढे व्हावेत असे वाटायला लागले आहे याबद्दल आनंद वाटला असेही अजित पवार म्हणाले.

इतक्या लोकांचा पाठिंबा आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का घेत नाही. पंधरा दिवसाने एक वर्ष पूर्ण होईल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणूक घ्या सांगत आहोत. तरी निवडणूका घेत नाही. यांना निवडणूक घेण्याची भीती वाटते आहे असा हल्लाबोलही अजित पवार यांनी केला.

त्या जाहिरातीमध्ये राज्याच्या विकासाचे सांगितले असते, इतकी बेरोजगारी कमी केली, जीडीपी वाढला आहे तो कमी केला, शेतकर्‍यांना मदत पोचवली, इतक्या लाभार्थ्यांना या या योजनेत लाभ दिला आहे. हे प्रश्न बाजुलाच राहिले परंतु मी स्वतः कसा लोकप्रिय याचीच स्पर्धा सरकारमधील महत्वाच्या पदावर असणाऱ्या लोकांमध्ये चाललेली दिसते असा आरोपही अजित पवार यांनी केला.

गेल्या विधानसभा निवडणुकीत ‘केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ अशापध्दतीने घोषणा भाजपचे लोक देत होते. आता ती घोषणा मागे पडली असून आता ‘राष्ट्रामध्ये मोदी, राज्यात शिंदे’ ही नवीन घोषणा महाराष्ट्रात आली आहे. ही घोषणा भाजपाच्या लोकांना द्यावी लागणार आहे. हे भाजप नेत्यांना मान्य आहे का असा सवालही अजित पवार यांनी भाजपला केला आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नेहमी खुलासा करत असतात पण बावनकुळे तुमचा खुलासा मलाही आता ऐकायला आवडेल असा मिश्किल टोला लगावतानाच हा तुमचा पक्षातंर्गत प्रश्न आहे. तुम्ही म्हणाल ‘अजित पवारने नाक खुपसण्याची काय गरज आहे’ . ‘बरं!.. मी नाही नाक खुपसत’ परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांसंदर्भात जाहिरात आहे त्या सरकारमध्ये तुमचा पक्ष आज महत्वाचा संख्या असल्यामुळे तुमच्या पाठिंब्याच्या जोरावर त्याठिकाणी आहे आणि फडणवीसपेक्षा आता शिंदेंना जनता अनुकूल झाली आहे असे जाहिरातीमध्ये सांगण्यात आले आहे. भाजपला, त्यांच्या प्रवक्त्यांना, नेत्यांना हे मान्य आहे का? असा थेट सवाल अजित पवार यांनी केला आहे.

या सर्व्हेमध्ये शिंदेच्या बाजूने २६ टक्के कौल दाखवण्यात आला आहे आणि फडणवीस यांना २३ टक्के कौल दाखवला आहे. खरं तर अशाप्रकारच्या पानभर जाहिराती का यांना द्याव्या लागल्या आहेत कळायला मार्ग नाही. तो त्यांचा अधिकार आहे परंतु सरकारी जाहिरात असती तर मी सरकारच्या पैशाने अशाप्रकारची जाहिरातबाजी करण्याचे कारण नाही असा जाब विचारला असता परंतु पक्षाच्यावतीने जाहिरातबाजी केली आहे. मात्र महाराष्ट्रातील जनता इतकी दुधखुळी नाही की काय चाललं आहे आणि कशापद्धतीने चाललं आहे हे कळत नाही असा उपरोधिक टोलाही अजित पवार यांनी लगावला.

वास्तविक एका वृत्तपत्राने पाच टक्के इतकाच कौल काढला होता. परंतु त्यानंतर तो चक्क आकाशाला गवसणी घालायला निघाला आहे. त्यामुळे जाहिरात देणार्‍यांनी आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करण्याची नितांत गरज आहे अशी कोपरखळी अजित पवार यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर केली आहे.

या जाहिरातबाजीने शिंदे यांनी उलट स्वतः चे हसे करून घेतले आहे. तुम्ही जर इतके लोकप्रिय आहात तर मग उद्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा आणि जनतेच्या मैदानावर या. जनतेच्या मैदानावर जनता कुणाच्या पाठीशी किती आहे मविआच्या पाठीशी किती आहे, शिंदे गटाच्या व भाजपच्या पाठीशी किती आहे हे चित्र स्पष्ट पणे पहायला मिळेल असे जाहीर आव्हानही अजित पवार यांनी दिले.

देवेंद्र फडणवीस कोल्हापूरला का गेले नाहीत हा त्यांचा पक्षातंर्गत प्रश्न आहे. मात्र जाहिरात देण्यापाठीमागचे कारण तुम्ही बघा… मध्यंतरी दोन बाजुच्या क्लीप आपण बघितल्या वारकरी संप्रदाय आपल्याला आदराचा, प्रेरणास्थान देणारा, सन्मानाने आपण त्यांना वागणूक देणारा, अशापध्दतीचा हा समाज आहे. ते वारकरी देहू आणि आळंदीवरुन निघाल्यानंतर विशेषतः आळंदीच्या परिसरात जे काही झाले त्यामध्ये ते आता वारकऱ्यांनीच पोलिसांना ढकळलै असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि काही ठिकाणी लाठीचार्ज दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज एवढ्या घटना सातत्याने घडत आहेत. पुणे रस्त्यावर पेट घेतला त्यात स्फोट झाला, गाड्या जळाल्या कितीतरी लोकांना नाहक त्रास सहन करावा लागला. जातीय दंगली घडत आहेत. काही ठिकाणी क्लीप पोस्ट करत आहेत त्यातून जातीय तेढ निर्माण होत आहे. आज शेतकरी वृत्तपत्रात कांदा उत्पादकाला महाराष्ट्रात पैसे मिळत नाही परंतु चारपट पैसे तेलंगणात कांदा नेल्यानंतर मिळत आहेत. अशी बातमी आहे. तसे असेल तर हैदराबादच्या मार्केटमध्ये महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळत असतील तर सरकारने स्वतः हस्तक्षेप करावा, कांदा खरेदी करावा आणि हैदराबादच्या मार्केटला पाठवावा. दोन पैसे जिथे कुठे जास्त मिळतात तिथे पाठवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा कारण कांदा उत्पादक, कापूस उत्पादक, आणि माझा टोमॅटो उत्पादक असे अनेक प्रकारचे शेतकरी अडचणीत आहेत याची आठवणही अजित पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सरकारला करून दिली आहे.

सध्या राज्यातील कायदा व सुव्यवस्था अक्षरशः वेशीवर टांगली गेली आहे. नोकरभरती होत नाहीय असे तरुण भेटून सांगत आहे. अक्षरशः जनता महागाईने त्रासून गेली आहे. यावरून लक्ष विचलित करण्यासाठी नेहमीची पध्दत अशी होती की, पेपर उघडला की, पेपरची हेडलाईन बघतो आणि मग पुढच्या बातम्या बघतो परंतु इथे तर हेडलाईन नाही तर यांचेच फोटो बघायचे आणि यांचाच उदोउदो बघायचा हा जो काही केविलवाणा प्रयत्न चालला आहे तो खरोखरच महाराष्ट्रातील जनतेला अजिबात न आवडणारा आहे असेही अजित पवार म्हणाले.

कृषीमंत्र्यांनी वेगवेगळे ग्रुप केले आहेत. ग्रुप नव्हे गँग केल्या आहेत त्यामध्ये असे काही होऊ नये म्हणून माणसं पाठवत आहेत. त्यांना विचारत आहेत तुमचे बाहेर काढायचे की ठेवायचे ते सांगा. त्यात वेगळ्या पद्धतीने आम्ही शेतकऱ्यांना मदत करतोय हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. परंतु त्यातून इतके काळेबेरे ऐकायला मिळत आहे. त्यासंदर्भाची माहिती मागवली आहे असेही अजित पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना स्पष्ट केले.
दरम्यान आज खरोखरच काही मंत्र्यांना कशाचाच पायपोस राहिलेला नाही. वाटेलतसे बोलत आहेत. तो माझा पीएच नाही पुन्हा रेकॉर्डला तो पीए दिसतो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना खुप मोठ्याप्रमाणावर स्टाफ ठेवता येतो तो त्यांचा अधिकार असतो परंतु अलीकडच्या काळात मंत्र्यांना पण इतके ओएसडी, एवढे खाजगी सेक्रेटरी, एवढे पीए त्याची गिनतीच करता येऊ शकत नाही. अतिशयोक्ती नाही काही मंत्र्यांना त्यांच्या स्टाफची नावंही सांगता येणार नाही असा मिश्किल टोलाही अजित पवार यांनी लगावला.

राज्याच्या प्रमुखांनी, उपमुख्यमंत्री यांनी यामध्ये लक्ष दिले पाहिजे. त्याला काही नियम आहेत. आम्ही राज्यमंत्री असताना एक खाजगी सेक्रेटरी असायचा आणि तीन पीए असायचे आणि घरचे फोन बंदोबस्ताला पोलीस असतात त्यांनाच आपरेटर केले जायचे परंतु आज इतक्या मोठ्या प्रमाणावर सर्वांना स्टाफ आहे की, नक्की फाईल कुणाकडे आहे सांगता येत नाही. मग त्यातच यांचा वेळ जातो आणि लोकांची कामे खोळंबली आहेत. जाहिरातीवर इतका पैसा खर्च करण्याऐवजी त्यात सांगितले असते की, बियाण्यांचा दर हा होता, ही सवलत दिली आहे, हे काहीच सांगायला तयार नाही आणि नको तिथे उदोउदो चालला आहे याबाबत अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *