Breaking News

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या निर्णयाबरोबर कंत्राटी ग्रामसेवक, पुर्नगृह आदी घेतले महत्वाचे निर्णय

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले हे महत्वाचे निर्णय…

बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्य सचिवांना निर्देश, प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक

बोगस बियाणे विक्रेत्यांवर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात काही ठिकाणी बोगस बियाणे विक्रीच्या घटनांसंदर्भात चर्चा झाली. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्य सचिवांना हे निर्देश दिले.

राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यांत भरारी पथके तयार करून बियाणे विक्रीवर लक्ष ठेवावे. बियाणे विक्रेते योग्य बियाणे योग्य दरात विकताहेत की नाही, ते तपासावे. बोगस बियाणे विक्री करताना आढळलेल्यांवर कोणत्याही दबावाला बळी न पडता काटेकोर कारवाई करण्यात यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देशात म्हटले आहे.
…………….
सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी १५०० कोटी रुपयांस मंजुरी

गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधीत शेतकऱ्यांना १५०० कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
सुमारे १५.९६ लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील २७.३६ लाख शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येईल.
सततचा पाऊस ही राज्य शासनामार्फत नवीन आपत्ती घोषित करुन मदत देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या ५ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे शेतीपिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने व निकषानुसार मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर सुधारित केले आहेत. त्यानुसार जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टर ८५०० रुपये, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी १७ हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी २२५०० रुपये प्रति हेक्टर अशी २ हेक्टरच्या मर्यादेत ही मदत देण्यात येईल.
—–०—–
कंत्राटी ग्रामसेवकांचे मानधन वाढविले

कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात १० हजार रुपये एवढी वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या या ग्रामसेवकास ६ हजार रुपये दरमहिना मिळतात, आता ते १६ हजार एवढे मिळतील.
राज्यात सध्या २७ हजार ९२१ ग्रामपंचायती असून १८ हजार ६७५ नियमित ग्रामसेवकांची पदे आहेत. त्यापैकी १७ हजार १०० पदे भरली असून १५७५ पदे रिक्त आहेत. वर्ष २००० पासून ग्रामसेवकांची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतात. कृषी सेवक, ग्राम सेवक, शिक्षण सेवक यांच्या मानधनात वाढ झाल्यामुळे कंत्राटी ग्राम सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव होता. यापूर्वी वर्ष २०१२ मध्ये वाढ करण्यात आली होती. यासाठी १ कोटी ५७ लाख ५० हजार रुपये इतका आर्थिक भार पडेल.

—–०—–

मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता चार जिल्ह्यात १६ पुनर्वसनगृह होणार
मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता चार जिल्ह्यात स्वयंसेवी संस्थामार्फत १६ पुनर्वसनगृह स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
पहिल्या टप्प्यामध्ये नागपुर, पुणे, ठाणे व रत्नागिरी या ठिकाणी ही पुनवर्सनगृह स्थापन करण्यात येतील. या पुनर्वसनगृहांमध्ये १८ ते ५५ वयोगटातील तसेच ५५ वर्षांवरील वयोगटातील ज्येष्ठ अशा दोन्ही वयोगटातील पुरुष व महिलांसाठी प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण १६ पुनर्वसन गृहे सुरु करण्यात येतील. या पुनर्वसन गृहांच्या खर्चापोटी पाच कोटी ७६ लाख रुपयांच्या तरतुदीस देखील बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच पुढील टप्यामध्ये प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या शिफारशीनुसार मानसिक आजारमुक्त व्यक्तींची संख्या वाढल्यास, ती विचारात घेऊन आवश्यकतेनुसार पुनर्वसन गृहांच्या संख्येत वेळोवेळी वाढ करण्याच्या तरतुदीसही मान्यता देण्यात आली.
मानसिक आजारमुक्त व्यक्तींना पुढील उपचाराची गरज नसते किंवा ज्या मानसिकमुक्त व्यक्ती बेघर आहेत किंवा त्यांचे कुटुंबिय स्वीकारत नाहीत अशांसाठी ही पुनर्वसनगृहे असतील. पुनर्वसनगृहाने प्रवेश देण्यात आलेल्या व्यक्तीस विविध प्रकारचे कौशल्यपूर्ण प्रशिक्षण द्यावयाचे आहे. त्याचप्रमाणे त्यांचे पुनर्वसन करणे, समुपदेशन करणे, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करणे, त्यांचा निवास, भोजन, क्रीडा व मनोरंजन, स्वच्छता, संरक्षण आदी बाबींची जबाबदारी घ्यावयाची आहे. पुनर्वसनगृह चालविणाऱ्या स्वयंसेवी संस्थेस १२ हजार रुपये प्रती व्यक्ती प्रती महिना सहायक अनुदान देण्यात येईल. अशा संस्थांची निवड करण्यासाठी राज्य स्तरावर निवड समिती असेल.
—–०—–
लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा

लातूर येथे स्वतंत्र विभागीय पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या प्रयोगशाळेसाठी २ कोटी ५१ लाख रुपये खर्चास देखील मान्यता देण्यात आली. या प्रयोगशाळेसाठी ११ पदांना मंजुरी देण्यात आली आहे.

सध्या राज्यामध्ये लातूर विभाग वगळता नागपूर, अकोला, औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर), नाशिक, पुणे, कोल्हापूर, चिपळूण अशा ७ ठिकाणी विभागीय पशुरोग निदान प्रयोगशाळा आहेत. लातूर विभागामध्ये असलेल्या गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या यांची मोठी संख्या विचारात घेता या विभागासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा असणे गरजेचे होते. सध्या येथील पशुपक्षांमधील रोगांचे नमुने तपासणीसाठी औरंगाबाद किंवा पुणे येथे पाठविण्यात येतात. लातूर येथे ही प्रयोगशाळा स्थापन झाल्यास शेतकऱ्यांची गैरसोय दूर होऊन त्यांचे आर्थिक नुकसानही टळणार आहे.
—–०—–

स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमिनीकरिता उत्पन्न मर्यादा वाढविली

स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी म्हणून जमीन देण्याकरिता एकत्रित मासिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा १० हजार रुपयांवरून ३० हजार रुपये इतकी वाढविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

राज्यातील किमान मासिक वेतनामध्ये मोठी वाढ झालेली आहे. त्यानुसार स्वातंत्र्य सैनिकांच्या कौटूंबिक उत्पन्न मर्यादेत वाढ करणे आवश्यक होते. ज्या स्वातंत्र्य सैनिकांकडे किंवा त्यांच्या कुटुंबियांकडे निवासी जागा नाही त्यांना २५०० चौ. फू. मर्यादेत जमीन देण्यात येईल. त्यासाठी त्यांना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत स्वातंत्र्य सैनिक कक्षाची सहमती घेऊन महसूल विभागाकडे तसा प्रस्ताव दाखल करण्यात येईल.
——०——

पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये
जलदगती न्यायालयांना देखील मुदतवाढ
पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्यास त्याच प्रमाणे २३ जलदगती न्यायालयांना मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
पुणे येथे ५ कौटुंबिक न्यायालये कार्यरत आहेत. या न्यायालयांमधून ९०६५ प्रकरणे प्रलंबित आहेत. पुणे महापालिकेत नव्याने ३४ गावांचा समावेश झाल्याने न्यायालयात दाखल झालेल्या प्रकरणांत २५२० एवढी वार्षिक वाढ झाली आहे. या बाबी विचारात घेऊन ही अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्यास आणि ५२ पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली. यासाठी ४ कोटी ७२ लाख खर्च येईल.
राज्यात सध्या कार्यान्वित १६ अतिरिक्त न्यायालयांना व २३ जलदगती न्यायालयांना त्यांचा कालावधी संपल्यामुळे २ वर्षे आणखी मुदतवाढ देण्याचा निर्णयही आज घेण्यात आला. १४ व्या वित्त आयोगातंर्गत ही जलदगती न्यायालये व अतिरिक्त न्यायालये स्थापन करण्यात आली होती. जलदगती न्यायालयांमार्फत खून, बलात्कार, दरोडा, हुंडाबळी, अपहरण, अनैतिक मानवी वाहतूक, त्याचप्रमाणे वरिष्ठ नागरिक, महिला, बालके, दिव्यांग वगैरेंची दिवाणी प्रमाणे, भूसंपादन, संपतीचा वाद अशी प्रलंबित प्रकरणे चालविण्यात येतात. तर अतिरिक्त न्यायालयांमध्ये मोटार वाहन चलान, विमा दावे, चेक बाऊन्सिंग ही प्रकरणे चालविली जातात.
सध्या जलदगती न्यायालयात ३५ हजार ६८८ प्रकरणे तर अतिरिक्त न्यायालयात २३०१० प्रकरणे प्रलंबित आहेत.
—–०—–

चिमूर, शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालये
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तसेच अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या दोन्ही कार्यालयांसाठी प्रत्येकी ६ पदे निर्माण करण्यात येतील. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर, सिंदेवाही, नागभिड, ब्रम्हपुरी हे तालुके चंद्रपूर पासून दूर अंतरावर आहेत. त्याचप्रमाणे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा हरितपट्टा देखील असल्यामुळे चंद्रपूर जिल्हा दोन भागात विभागला गेला आहे. यामुळे जनतेची शासकीय कामासाठी पायपीट होते. तसेच विकास कामांनाही विलंब होतो. त्यामुळे चिमूर येथे हे कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अहमदनगर हा जिल्हा राज्यातला क्षेत्रफळाने सगळ्यात मोठा जिल्हा असून नागरिकांना महसूलशी संबंधित सर्व कामांकरिता जिल्हा मुख्यालयी जावे लागते. त्यामुळे शिर्डी येथे देखील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचा निर्णय घेण्यात आला.
—–०—–

विविध शहरांतील प्राधिकरणांना मुदतवाढ
प्रारुप विकास योजनांसाठी प्राधिकरणांना मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या संदर्भात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम-१९६६ च्या कलम २६ (१) मध्ये महानगरपालिका किंवा नियोजन प्राधिकरण असा मजकूर टाकण्यात येईल व अध्यादेश प्रसिद्ध करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
सध्या पुणे महानगर प्रदेशाची विकास योजना तयार करण्याची कार्यवाही पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सुरु आहे. महानगर प्रदेशाची लोकसंख्या १७ लाख १२ हजार एवढी असून ६ हजार ९०० चौ. कि.मी. क्षेत्र आहे. इतर नगर परिषदांप्रमाणे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास प्रारुप विकास योजनेस मुदतवाढ देण्यासाठी ६ महिन्याचा कालावधी अपुरा पडतो. राज्यातील नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर या शहरांकरिता देखील विकास प्राधिकरणे असून महानगरांची विकास योजना तयार करताना त्यांना देखील कालावधी कमी पडू शकतो ही बाब विचारात घेऊन विकास योजना तयार करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, … सरकार निवडणुकांची वाट पाहतेय का?

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी पूर्वीच्या घोषणेप्रमाणे ३१ मार्चपर्यंत कायम ठेवली आहे. ८ डिसेंबर २०२३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *