Breaking News

सुषमा अंधारे यांचा गुलाबराव पाटील यांना टोला, मी जर तीन महिन्याचं बाळ तर…

मी जर तीन महिन्यांचं बाळ, तर बाळाला काहीही करायचा अधिकार आहे. गुलाबभाऊ मला तीन महिन्यांचे बाळ म्हणत असतील तर बाळ जसा सर्व खोड्या करतो, त्या करण्याचा मला सर्व अधिकार आहे, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना हाणला. महाप्रबोधन यात्रेतील फलक चोरण्यावर ये डर मुझे अच्छा लगा, अशी टीकाही त्यांनी केली.

महाप्रबोधन यात्रेतील दुसर्‍या टप्प्यासाठी उपनेत्या अंधारे या मंगळवारी जिल्ह्यात आल्या. याअनुषंगाने जळगावात प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधत शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, मी वारंवार सांगत आहे, आमच्याकडे आमदारांमुळे शिवसैनिक नसतात, तर शिवसैनिकांमुळे आमदार असतात. त्यामुळे जिल्ह्यातील पाच आमदार गेले असले आणि त्यांच्यासोबत काही टेंडर, गुत्तेदारीच्या राजकारणातले काही लोक गेले असले, तरी याचा अर्थ जळगावमध्ये शिवसेनेची क्षती झाली असे आम्हाला अजिबात वाटत नाही. कारण, जळगावमध्ये जोपर्यंत इथले सर्वसामान्य शिवसैनिक तग धरून निष्ठेने उभे आहेत, तोपर्यंत आम्हाला चिंता करण्याची गरजच नाही. पाचोर्‍यात आदित्य ठाकरेंची सभा जळगावसाठी न भूतो न भविष्यती अशी झाली होती. जे पाच लोक गेलेले आहेत, सत्ता असतानाही त्यांना वाय प्लस सुरक्षा घेऊन फिरावे लागते आहे, यातच सर्वकाही उत्तर येते.

विरोधकांची सुरक्षा काढली आणि बंडखोरांना वाढविण्यात आलेल्या मुद्द्यावर त्या म्हणाल्या की, बंडखोरांनाच सुरक्षेची गरज आहे. कारण, विरोधकांच्या पाठीशी लोकबळ आहे. लोक त्यांना सांभाळून घेत आहेत. लोकांना माहिती आहे, सत्ताधार्‍यांना सुरक्षेची गरज आहे. सत्ताधार्‍यांनी सत्ता ही अत्यंत कुटीलपणे, कुटनीतीने आणि कपटकारस्थानाने मिळविलेली आहे आणि ही कपटकारस्थाने जनतेला आवडलेली नाहीत. त्यामुळे जनता अत्यंत संतप्त आहे. या संतप्त जनतेपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी, तसेच त्यांना काही करू नये, म्हणून घाबरलेल्या सरकारने ही सुरक्षा वाढवून घेतली आहे. कारण, यामुळे त्यांना लोकांचे पाठबळ नाही, असा घणाघातही अंधारे यांनी केला.

जळगाव ग्रामीण मतदारसंघातील पाळधीजवळ महामार्गावर लावलेल्या स्वागतफलक गायब केल्याच्या मुद्यावर अंधारे म्हणाल्या की, ये डर मुझे अच्छा लगा. मी या गोष्टी एन्जॉय करते. फलक पळविल्याने काय होतेय? तुम्ही फलक पळवताहेत, तुम्ही शिवसैनिक पळविणार आहात का? तुम्ही शिवसैनिकाचा विचार पळविणार आहात का? तुम्ही शिवसैनिकाशी असलेली आपुलकी आहे, जो आपलेपणा आहे, तो शिवसेनेचा जो मूळ विचार आहे, तो तुम्ही पळवू शकणार आहात का? त्यामुळे अशा छोट्या-मोठ्या गोष्टींचे गुलाबभाऊंनी चिल्लरचाळे करू नये, नाहीतर लोकच त्यांना विचारतील, कुठल्यातरी गाण्यासारखं… कसं काय पाटील बरं आहे का… गुवाहाटीला काहीतरी खोक्याचा कारभार केला म्हणे. असं त्यांनी करू नये, अशी टीका अंधारे यांनी केली.

बाळाला खोड्या करण्याचा अधिकार आहे. मग बाळ केस ओढतं, बाळ गालगुच्चे घेतं. बाळ आपल्या मोठ्या भावाच्या गालावर चापट्या मारतं, बाळच आहे ते. बाळाला काहीही करायचा अधिकार असतो, तर गुलाबभाऊ म्हणत असतील तर ही आमची छोटी बहीण आहे. बाळ आहे. ते सर्व मला बाळ म्हणून खोड्या करण्याचे अधिकार देताहेत. याकडे मी सकारात्मकतेने आणि खिलाडू वृत्तीने घेते, असेही त्या म्हणाल्या.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *