Breaking News

संजय राऊत म्हणाले, शिंदे गटाची नवी कार्यकारणी म्हणजे कॉमेडी सर्कस सीजन-२ फुटीर गटाला अधिकारच नसल्याचा लगावला टोला

सर्वोच्च न्यायालयात २० जुलै रोजी एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सुनावणी होत आहे. यापार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल विरोधात जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या ताब्यातील शिवसेना पक्षच हिसकावून घेण्याची तयारी सुरु झाली आहे. त्यादृष्टीकोनातून शिंदे गटाकडून उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणी बरखास्त करत आपल्या मर्जीनुसार नवी कार्यकारणी जाहिर केली. विशेष म्हणजे या कार्यकारणीत पक्षप्रमुख या पदावर उध्दव ठाकरे यांना तसेच ठेवत मुख्य नेते पदी एकनाथ शिंदे यांनी स्वत:ची नियुक्ती करून घेतली. यापार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून जाहिर करण्यात आलेल्या कार्यकारणीच्या कृतीला कॉमेडी सर्कस सीजन २ अशी खोचक टीका  केली आहे.

शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित करण्यात आल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटाकडून घोषित करण्यात आलेली कार्यकारिणी ही असंवैधानिक असल्याचेही ते म्हणाले.

शिंदे गट हा फुटीर गट आहे. हा गट कार्यकारिणी घोषित करू शकत नाही. शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. त्यांना शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित करण्याचा अधिकार नाही. शिवसेना आजही भक्कमपणे उभी असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेचे नेतेपद बाळासाहेबांनी तयार केले आहे. तसेच शिवसेना हा नोंदणीकृत राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांना आमची कार्यकारिणी बरखास्त करण्याची अधिकार नाही. याचा सेनेवर फरक पडणार नाही, असेही ते म्हणाले.

यावेळी खासदारांच्या बंडाबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. खासदार असे प्रयत्न करत असतील, तर कायद्याच्या पातळीवर त्याला आवाहन दिले जाईल, तसेच लोकसभेत आमचे मुख्य प्रतोद राजन विचारे असून शिंदे गटाकडून जो खासदारांचा आकडा देण्यात येत आहे, तो भ्रमीत करण्यासाठी असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्य सरकार हे असंवैधानिक आहे. मुख्यमंत्र्यांवर आमदारकीची टांगती तलवार आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका ही कायद्याच्या कसोटीवर पक्की आहे. त्यामुळे त्यांच्या मनात भीती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सतत दिल्ली का यावे लागते, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *