Breaking News

दुष्काळामुळे शेतकऱ्यांकडची वसूली थांबवा आणि नव्याने कर्ज द्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी

पुर्वीचे सरकार चारा छावण्यात शेतकर्‍यांची सरसकट जनावरे घ्यायचे. मात्र आज शेतकर्‍यांचे फक्त पाच जनावरे घेण्याचे बंधन आहे. तसेच प्रत्येक जनावरामागे फक्त ९० रुपये खर्च केले जातात. सध्या राज्यातील चारा छावण्यात अपुरा कडबा दिला जातोय. त्यासोबत ऊसाचे वाढे खायला दिल्याने जनावरांची जीभ कापली जाते. यासोबतच सरकारने सर्व प्रकारच्या वसुली तात्काळ थांबवावी. पिक कर्ज आता शेतकरी देवू शकत नाही. त्यामुळे पुढील काळात कर्जाचे पुर्नगठन करणे आणि पाऊस सुरु झाल्यानंतर शेतकर्‍याला बी-बियाणे, खत विकत घेण्यासाठी पुन्हा कर्ज स्वरुपात मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

लोकसभा निवडणूकीनंतर लगेचच राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहणी दौऱ्यानंतर पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत राज्य सरकारकडे करावयाच्या मागण्या आणि सूचनांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जूनमध्ये महाविद्यालय सुरु होणार आहेत. शैक्षणिक शुल्क माफ केल्यास विद्यार्थी वर्गाला दिलासा मिळू शकेल. या मागण्यांचा आराखडा बनवून सरकारकडे दिला जाईल. राज्याला या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

सहकारी संस्था, सीएसआर यातूनही शेतकर्‍यांना मदत दिली जावी. तसेच आमिर खानने सुरु केलेल्या वॉटर कपला जास्तीत जास्त लोकांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन करत राष्ट्रवादीची विद्यार्थी आणि युवक संघटना दुष्काळग्रस्त भागात काम करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

सरकारने दुष्काळी परिस्थिती गांभीर्याने घेतली नाही. पंतप्रधानांनी राज्यात सहा ते सात सभा घेतल्या. यात राजकीय टीका होतच राहिली. शरद पवारवर टीका करणे त्यांचा उद्देश असू शकतो. मात्र राज्य आणि राष्ट्रीयस्तरावर काय काम करणार? हे सांगण्याची संधी त्यांनी गमावल्याचा आरोपही त्यांनी केला.

निवडणूक आयोगाची काहीच अडचण नाही. आम्ही २०१४ साली निवडणूक आयोगाला फोन वर सांगायचो की, आम्हाला दुष्काळासाठी अमुकतमुक काम करायचे आहे. त्यानंतर एक – दोन तासात आम्हाला आयोगाची परवानगी मिळून जायची. कारण आयोग देखील या देशातीलच आहे. मात्र हे सरकार आयोगाच्या कोणत्या परवानगीसाठी थांबले आहे, माहीत नाही अशी जोरदार टिकाही त्यांनी केली.

लोकसभा निवडणूक झाल्या झाल्या मी दुष्काळ दौरा केला. त्यामुळे सरकार जागे झाले आणि त्यांनी बैठका घ्यायला सुरुवात केली. मी जर दौरा केला नसता तर तेही झाले नसते. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून आमच्या काळात केलेल्या उपाययोजना आणि आजच्या परिस्थितीत काय उपाययोजना केल्या पाहिजेत याचे निवेदन देणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

दुष्काळ निवारणासाठी काय काय उपाययोजना करता येतील याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज बैठक घेण्यात आली. या बैठकीत परतीचा पाऊस अनेक जिल्ह्यात पडलेला नाही. पर्जनछायेत महाराष्ट्रातला बराचसा भाग येतो. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात गंभीर दुष्काळ परिस्थिती आहे. पिण्याचे पाणी, रोजगार, चारा छावण्या या तीन उपाययोजना कराव्या लागतात. यासोबतच पिक जर वाया गेले तर त्याला मदत करावी लागते. विशेषत: फळबागांना विशेष मदत द्यावी लागते. कारण फळबागांचा फायदा मिळायला पाच ते दहा वर्ष जातात. त्यामुळे दुष्काळात फळबागायतदारांचे जास्त नुकसान होते या विषयावरही चर्चा झाली.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या चार टप्प्यात ६६.९५ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात एकूण मतदान ६६.९५% इतके नोंदवले गेले आहे, निवडणूक आयोगाने गुरुवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *