Breaking News

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘जितनी आबादी उतनी भागिदारी’… ओबीसी जागर यात्रेच्या समारोपप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांची काँग्रेसवर टीका

ओबीसींच्या हितांची चिंता जेवढी मोदी सरकारने केली, तितकी आजवर कधीच कोणत्याच सरकारने केली नाही, असे सांगतानाच आज काँग्रेस पक्ष ‘जितनी आबादी उतनी भागिदारी’ असा नारा देत असली तरी एकाच घरातून इतके का प्रधानमंत्री याचे उत्तर देणार का, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

भाजपाच्या ओबीसी जागर यात्रेचा समारोप वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे झाला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी बाबुसिंगजी महाराज, जितेंद्रजी महाराज, कबीरजी महाराज, यशवंतजी महाराज, केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, मंत्री अतुल सावे, खा. रामदास तडस, खा. डॉ. अनिल बोंडे, डॉ. संजय कुटे, आशीष देशमुख, संजय गाते, राजेंद्र पाटणी, निलय नाईक, दादाराव केचे, देवराव होळी आदी प्रमुख नेते उपस्थित होते.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मंडल आयोगाला विरोध करणारे काँग्रेस, उद्धव ठाकरेंचा पक्ष हेच होते. आज एक ओबीसी पंतप्रधान आहे आणि ओबीसींसाठी काम करणारा नेता उभा राहतो, तेव्हा या ओबीसी नेत्याला संपविण्यासाठी २५ पक्ष एकत्र आले. पण, एक सांगतो, ‘जो ओबीसी की बात करेगा, वही देश पे राज करेगा’. मोदीजी केवळ भाषणं करीत नाही, तर त्यांच्या योजनांचा लाभ हा खर्‍या अर्थाने एससी, एसटी, ओबीसींना मिळाला आहे. आज केंद्रात ६० टक्के ओबीसी, एससी, एसटी मंत्री आहेत. पीकविम्याचा ७१ टक्के एससी, एसटी, ओबीसींना लाभ झाला, पीएम किसान सन्मान निधीचे लाभार्थी ८० टक्के एससी, एसटी, ओबीसी आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेत ४५ टक्के लाभार्थी आहेत. विविध प्रकारच्या शिष्यवृत्तीत ५८ टक्के विद्यार्थी एससी, एसटी, ओबीसी आहेत. मुद्राचा लाभ मिळालेले ५१ टक्के एससी, एसटी, ओबीसी आहेत. राहुल गांधी सध्या ‘मोहब्बत की दुकान’ म्हणून फिरत आहेत. प्रेम हे दुकानात नाही, तर ते मनात असावे लागते. काँग्रेस प्रेमाचे दुकान काल नागपुरात दिसले, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले, काँग्रेसने आजवर जे मुख्यमंत्री दिले, त्यातील केवळ १७ टक्के ओबीसी होते. तर भाजपाने जितके मुख्यमंत्री दिले, त्यातील ३१ टक्के मुख्यमंत्री ओबीसी होते, असे सांगून देवेंद्र फडणवीस म्हणाले की, १९३१ नंतर एससी, एसटी वगळता कधीच जाती जनगणना झाली नाही. तत्कालीन गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी ७ मे २०११ रोजी संसदेत सांगितले की, आम्ही जाती जनगणना करणार नाही. हेही सांगितले गेले की, स्वातंत्र्यानंतर नेहरुंच्या काळात एकमताने जाती जनगणना करायची नाही, असे ठरले. आमचा जात जनगणनेला विरोध नाही. पण, २०११ मध्ये जेव्हा केंद्र सरकारवर दबाव आला, तेव्हा झालेल्या एसईसीसीच्या सर्वेक्षणात ५५०० जातींची संख्या ४६ लाखांवर पोहोचली, तर महाराष्ट्रातील ४९४ जातींची संख्या ४ लाखांच्या वर गेली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात आमचे सरकार आले तेव्हा ओबीसींसाठी वेगळे मंत्रालय तयार केले आणि त्याला निधी दिला. आज अनेक योजना या मंत्रालयामार्फत अंमलात आणल्या जात आहेत. ३६ वसतीगृह ओबीसींसाठी सुरु होत आहेत. मोदी आवास योजनेच्या माध्यमातून ओबीसींसाठी १० लाख घरांचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. प्रत्येक ओबीसी समाजघटकासाठी सरकारने काम सुरु केले. ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा देण्याचे काम केले. मेडिकलच्या राष्ट्रीय कोट्यात ओबीसींना २७ टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला. बारा बलुतेदारांसाठी विश्वकर्मा योजना सुरु केली. १३,००० कोटी रुपये त्यासाठी दिले, असेही म्हणाले.

मराठा, धनगर आरक्षण आम्ही देऊच. प्रत्येक समाजाला त्यांचे अधिकार देऊ. पण, असे करताना कुणाचे ओरबाडून घेणार नाही. काही लोक दुसर्‍यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही विरोधकांना महाराष्ट्र अशांत ठेवायचा आहे. पण, तो प्रयत्न आम्ही खपवून घेणार नाही. सोयाबीन शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे. गेल्याच मंत्रिमंडळ बैठकीत पंचनामे तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Check Also

सभागृहात दादाजी भुसे म्हणाले ते थोरवे माझे मित्र; थोरवे म्हणाले, भुसे अॅरोगंट

कल्याण आणि दहिसर येथील गोळीबाराच्या घटनेनंतर राज्याचे मंत्री दादाजी भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *