Breaking News

गॅस सबसिडी सोडा म्हणता आणि भाजपा नेत्यांना करोडो रुपये अनुदान म्हणून वाटता ! जनतेला गॅस सबसिडी सोडा असे सांगणारे पंतप्रधान भाजपा नेत्यांना अनुदान सोडण्यासाठी कधी सांगणार? – सचिन सावंत

पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने विरोधी पक्षांच्या घराणेशाही व भ्रष्टाचारावर तोंडसुख घेत असतात पण त्यांना स्वतःच्या पक्षातील घराणेशाही व भ्रष्टाचार दिसत नाही. किसान संपदा योजनेची लाभार्थी भाजपा नेते विजयकुमार गावित यांची मुलगी व आसामचे मुख्यमंत्री हेमंतकुमार विश्वसरमा यांची पत्नी आहेत. हा आर्थिक परिवारवाद मोदींना दिसत नाही का? शेतकरी मजूबत करण्यासाठीच्या योजनेतून भाजपाचे नेतेच मजबूत होत आहेत, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सचिन सावंत म्हणाले की, किसान संपदा योजनेतून कंपन्याना अनुदान दिले जाते. पण या योजनेतून मंत्री विजयकुमार गावित यांची मुलगी व आसामचे मुख्यमंत्री हेमंतकुमार विश्व सरमा यांची पत्नी यांना प्रत्येकी १० कोटी रुपयांचा लाभ झाला आहे. हा एकप्रकारचा परिवारवादच आहे. सरकारने सर्वसामान्य जनतेतून उद्योजक निर्माण केले पाहिजेत, अशी अपेक्षा असते पण इथे भाजपा नेत्यांचीच घरभरणी होत आहे.

एकीकडे नरेंद्र मोदी जनतेला गॅस सबसिडी सोडा म्हणतात आणि जनतेचे करोडो रुपये केंद्रीय योजनांच्या अनुदानाच्या रुपाने भाजपाच्या नेत्यांच्या नातेवाईकांना वाटतात. इथे राष्ट्रवाद आणि परिवारवाद मोदीजींना दिसत नाही. हा विरोधाभास भाजपाचा आणि मोदीजींचा खरा चेहरा दर्शवतो. आता जनतेला गॅस सबसिडी सोडा असे सांगणारे पंतप्रधान भाजपा नेत्यांना अनुदान सोडण्यासाठी कधी सांगणार, याची प्रतीक्षा असल्याचे सावंत पुढे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ अशी घोषणा केली होती. पण त्यांच्याच पक्षातील लोक भरपूर खातात. त्याकडे मोदींचे लक्ष का जात नाही? शेतकऱ्यांसाठी या योजनेचा लाभ होऊन त्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे. मात्र, मोदी सरकारच्या काळात शेतकरी तर दिवसेंदिवस संकटातच सापडत आहे. शेतकरी उपाशी आणि भाजपा नेत्यांचे नातेवाईक मात्र तुपाशी असा हा प्रकार असून शेतकऱ्यांच्या नावाखाली भाजपा नेत्यांचे नातेवाईकच लाभ उठवत आहेत. ‘कुंपणच शेत खाते’ असा हा प्रकार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

Check Also

पंकजा मुंडे यांची स्पष्टोक्ती, प्रीतमताईंना डावलून मी राजकारणात काम करणार नाही शिव-शक्ती परिक्रमा हे प्रदर्शन नाही तर खरीखुरी शक्तीच ; परिक्रमा पराक्रम ठरणार

मी देणारी आहे, घेणारी नाही. मी प्रीतमला देण्याच्या भूमिकेत आहे, मी तिची आई आहे, बाप …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *